आपली विविध मते व्यक्त करण्यासाठी किंवा विविध संदेश पाठविण्यासाठी केला जाणारा समाजमाध्यमांचा वापर हा अनेकदा काही जणांना कंटाळवाणा होतो; मात्र याच समाजमाध्यमांचा वापर करून सध्या विविध वर्ग चालविले जातात. मुंबईत अनेक महाविद्यालये व खुल्या प्रशिक्षण वर्गाचा यात समावेश आहे.
महाविद्यालयांच्या सूचना फलकाची जागा हळूहळू समाजमाध्यमे घेऊ लागली आहेत. ही प्रक्रिया तशी जुनी असली तरी आता प्रशिक्षण वर्गही या माध्यमांतून सुरू होऊ लागले आहेत. यात महाविद्यालयीन शिक्षकांपासून ते विविध विषयांच्या प्राध्यापकांपर्यंतचा समावेश आहे.
मुंबईतील बहुतांश महाविद्यालयांचे ‘फेसबुक’चे पान आहे. यातही महाविद्यालयांमधील विविध विभागाची स्वतंत्र पानेही आहेत. यातून महाविद्यालयातील महत्त्वाच्या घडामोडी विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविल्या जातात. यामुळे एकाच महाविद्यालयातील दुसऱ्या विभागाच्या विद्यार्थ्यांलाही महाविद्यालयात अमुक एका विभागात नेमके काय सुरू आहे. महाविद्यालयात नवीन काय येणार आहे याचा अंदाज येतो. याचबरोबर या पेजेसवर सध्या महाविद्यालयात होणाऱ्या कार्यक्रमांच्या ध्वनिचित्रफिती (व्हिडीओ) ‘शेअर’ केले जातात. इतकेच नव्हे तर प्राध्यापकांची महत्त्वाची व्याख्यानेही या पानांवर पाठवली जातात. त्या वेळी उपस्थित नसलेले आणि महाविद्यालयाबाहेरील विद्यार्थी या व्याख्यानांचा लाभ घेऊ शकतात, तसेच विद्यार्थ्यांनाही त्यांना हवे तेव्हा त्या गोष्टी पाहण्याची संधी मिळते. फेसबुकपाठोपाठ महाविद्यालयीन संवादासाठी सध्या ‘व्हॉट्सअ‍ॅप’ महत्त्वाची भूमिका बजावतो.
या ‘व्हॉट्सअ‍ॅप’च्या माध्यमातून प्रत्येक विषयाचा वेगवेगळा समूह असून तेथे त्या संबंधित विषयाच्या प्राध्यापकांपासून ते विभागप्रमुखांपर्यंत सर्वाचा समावेश असतो. यामुळे तेथे विद्यार्थ्यांना व्याख्यानांच्या वेळापासून ते एखाद्या विषयावरील अभ्यासात्मक चर्चा करणेही शक्य होते. याचे पुढचे पाऊल म्हणजे नुकत्याच संपलेल्या सत्रात साठय़े महाविद्यालयातील प्रा. गजेंद्र देवडा यांनी पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांना विविध विषयांचे नोट्स लक्षात ठेवणे सोपे जावे यासाठी विषयानुरूप व्हॉइस नोट्स पाठविल्या. या सर्व नोट्स विद्यार्थ्यांनी डाऊनलोड करून घेतल्या आणि त्या त्यांना पाहिजे त्या वेळेला आणि पाहिजे तितक्या वेळेला ऐकल्या. याचा फायदा या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या काळात नक्कीच झाला.
प्रा. देवडा यांच्या या प्रयोगामुळे विद्यार्थी खूश झाले असून त्यांनी लिखित स्वरूपातील नोट्स लक्षात ठेवण्यापेक्षा ऐकलेल्या नोट्स लक्षात ठेवणे अधिक सोपे जाते, अशी प्रतिक्रिया दिली. विद्यार्थी समाजमाध्यमांवर अधिक वेळ घालवत असतील तर त्यांनी तो वेळ त्यांचा सत्कारणी लागावा आणि त्यांचा अभ्यास अधिक सोपा व्हावा, या उद्देशाने हा प्रयोग केला व तो यशस्वी झाल्याचे प्रा. देवडा सांगतात.
समाजमाध्यमाचा वापर करून देशभरातील सीएचे प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी प्रा. जिग्नेश छेडा यांनी एक फेसबुक पान तयार केले आहे. यामध्ये त्यांचे मुंबईत विविध ठिकाणी होणारी व्याख्याने चित्रित करून ती पोस्ट केली जातात. या माध्यमातून सीए शिक्षणातील अनेक प्रश्नांची उत्तरे मिळवणे विद्यार्थ्यांना सोपे होत आहे. जिग्नेश छेडा यांच्या व्याख्यानामुळे आम्हाला आमच्या अभ्यासात अधिक मदत होत असल्याची प्रतिक्रिया सीएच्या अंतिम परीक्षेस पात्र विद्यार्थी समीर धुळप याने दिली.
आयआयटीची खुली शिक्षणप्रणाली
तुम्ही वाणिज्य शाखेतून पदवीधर आहात. मात्र तुम्हाला आता संगणक प्रोग्रामिंगमध्ये रस वाटतोय. सध्याच्या शिक्षणपद्धतीमध्ये तुम्ही वाणिज्य शाखेचे असल्यामुळे तुम्हाला हे शिक्षण घेण्यापासून रोखले जात आहे. पण आता हे शिक्षण तुम्हाला घरबसल्या आणि तेही मोफत घेऊ शकत आहात. यासाठी सलमान खानसारख्या तरुणाने सुरू केलेल्या ऑनलाइन अकादमीची मदत आपल्याला होतेच. मात्र आपल्याच देशातील सर्वोत्तम प्राध्यापक असलेल्या तंत्रशिक्षण संस्थेतील अर्थात आयआयटी मुंबईतील http://www.iitbombayx.in  या संकेतस्थळामुळेही आपल्याला हे शक्य होणार आहे. गेल्या वर्षी आयआयटी मुंबईतील काही प्राध्यापकांनी एकत्र येऊन खुल्या शिक्षणाचे व्रत हाती घेतले. ‘ज्याला जे हवे ते शिकायची मुभा मिळावी’ हा उद्देश डोळय़ांसमोर ठेवून जगभरात ऑनलाइन शिक्षणाची पद्धत आकारास येऊ लागली. ही संकल्पना परदेशात चांगलीच रूढ झाली. देशातही ही संकल्पना रूढ व्हावी आणि जास्तीत जास्त लोकांना शिकता यावे यासाठी विविध स्तरांवर प्रयत्न सुरू होते. यामध्ये आयआयटी मुंबईचाही समावेश होता. सुरुवातीला शिक्षकांना प्रशिक्षण देण्याच्या उद्देशाने आयआयटी मुंबईतील संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी विभागाने ‘मॅसिव्ह ओपन ऑनलाइन कोर्सेस’ (मूक) ही संकल्पना आणली. या संकल्पनेआधारे देशभरातील १० हजार शिक्षकांना प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्ट समोर ठेवण्यात आले. यानुसार देशभरातील शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणाचा अनुभव आल्यानंतर यादरम्यान संग्रहित करण्यात आलेली व्याख्यानेआंतरराष्ट्रीय खुल्या ऑनलाइन प्रशिक्षण संकेतस्थळावर अद्ययावत करण्यात आली. या अभ्यासक्रमांना जगभरातील हजारो विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. हा प्रतिसाद लक्षात घेऊन हे अभ्यासक्रम देशातील विद्यार्थ्यांना त्यांच्या भाषेत उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू झाल्याचे प्रा. डॉ. दीपक फाटक यांनी स्पष्ट केले. यासाठी एडेक्सच्या सहकार्याने  www.iitbombayx.in  हे संकेतस्थळ सुरू करण्यात आले.
यामध्ये आयआयटीच्या प्राध्यापकांनी विकसित केलेल्या अभ्यासक्रमांचा समावेश आहे. याचबरोबर आयआयटीच्या विविध विभागांनी यूटय़ूब वाहिनी सुरू करून त्याद्वारे अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी माहितीचे दालन खुले करून दिले आहे. गणित, संगणक विज्ञान यांसारखे विषय आघाडीवर आहेत. यामुळे आता समाजमाध्यमांचा
वापर केवळ फावल्या वेळेचा उद्योग नसून तो स्वत:च्या प्रगतीचा एक भाग होऊ लागला आहे. याची सुरुवात बडय़ा संस्थांमध्ये झाली होती, ती आता पारंपरिक अभ्यासक्रमांमध्येही दिसू लागली आहे.