भाजप सत्तेत आल्यापासून विरोधी पक्षनेते वेगवेगळे विषय घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जात आहे. मात्र काही दिवसांपासून मोदींच्या पदवीवरून सुरू असलेला गोंधळ अनावश्यक आहे असे काही विद्यार्थ्यांना वाटते. शिक्षणामुळे विद्वत्ता सिद्ध होत नसली तरी मोदींच्या खोटय़ा पदवी प्रमाणपत्राच्या प्रकरणामुळे जनतेच्या मनात त्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल शंका निर्माण झाली असल्याचे तरुणांना वाटते.

काही दिवसांपूर्वी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शैक्षणिक पदवीबद्दल आम आदमी पार्टीच्या नेत्यांनी शंका व्यक्त केली होती. मोदींची पदवी बनावट असल्याचे सांगून या नेत्यांकडून केलेला आरोप अनावश्यक होता असे मला वाटते. पंतप्रधान म्हणून त्यांचे शिक्षण हे महत्त्वाचे नसून काम करण्याची पद्धत योग्य आणि जनतेच्या विकासासाठी असणे गरजेचे आहे. मात्र आप आणि काँग्रेस नेत्यांकडून भाजपविरुद्ध आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत, जे देशाच्या विकासासाठी धोकादायक आहे. देशाचे सर्वच पंतप्रधान खूप शिकले होते असे नाही, इंदिरा गांधीही कमी शिकल्या होत्या, मात्र त्यावरून त्यांच्या कारकीर्दीवर शंका निर्माण करणे चुकीचे ठरेल.
– गंधार पंडित, साठे महाविद्यालय

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पदवी खोटी असल्याचे काही पक्षांकडून आरोप केले जात आहेत. मुळात नोकरीसाठी शिक्षणाची अट दिली जात असताना देशाचा कारभार ज्यांच्या हाती दिला जातो त्यांना शिक्षणाची अट का असू नये? मोदींची पदवी खरी की खोटी हा मुद्दा काही लोकांसाठी दुय्यम असला तरी ही बाब फक्त त्या शिक्षणापुरती सीमित राहत नाही. जर मोदींचे पदवी प्रमाणपत्र खोटे असेल तर वेळीच त्यावर कारवाई करावयास हवी, कारण खोटे प्रमाणपत्र दाखविणे हा भ्रष्टाचाराचाच प्रकार असल्याचे मला वाटते. म्हणूनच आज आपल्या देशाचा शिक्षण विभाग सांभाळण्यासाठी सुशिक्षित उमेदवार नसल्याचे दुर्दैव आहे.
– श्रद्धा भालेराव, एसएनडीटी विद्यापीठ
कुठल्याही क्षेत्रामध्ये शिक्षण असेल तरच ती व्यक्ती संबंधित कार्यासाठी सक्षम असेल असे म्हणणे म्हणजे त्या व्यक्तीवर अन्याय आहे, कारण बरीच विद्वान माणसे ही शिक्षणापेक्षा अनुभवाच्या जोरावर यश संपादित करतात. मात्र एकीकडे याच देशात आरक्षणाच्या विरोधात मेरिटचा प्रश्न उभा करून सक्षमतेचा दाखला दिला जात असेल आणि दुसरीकडे देशाचे पंतप्रधान उच्चशिक्षित असल्याचा दावा करीत आपल्या योग्यतेसाठी खोटय़ा प्रमाणपत्रांचा संदर्भ देत असतील, तर जगाच्या पाठीवर देशाचे नेतृत्व करीत असलेल्या मोदींच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उभे राहते. आपण विशिष्ट पदासाठी सक्षम आहोत हे आपल्या कृतीतून आणि कार्यातून दाखवावे. मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून अभिव्यक्तिस्वातंत्र्य, असहिष्णुता, देशभक्त आणि देशद्रोही यावर सामाजिक आणि राजकीय अंगांनी चर्चा सुरू असताना खोटय़ा प्रमाणपत्रांचा मुद्दा विरोधकांनी चव्हाटय़ावर आणून जनतेच्या विश्वासावर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.
प्रबोध माणगांवकर, मुंबई विद्यापीठ