X

‘आयआयटी’चा तंत्रमहोत्सव

यंदा या महोत्सवात काही स्पर्धाच्या प्राथमिक फेऱ्या मुंबईसह भारतातील प्रमुख शहरांत होतील.

आशियातील सर्वात मोठा विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा महोत्सव म्हणून ओळखला जाणारा ‘आयआयटी मुंबई’चा ‘टेकफेस्ट’ जाहीर झाला. २९ ते ३१ डिसेंबर या कालावधीत हा महोत्सव आयआयटी कॅम्पसमध्ये रंगणार आहे. १९९८ साली या महोत्सवाला आरंभ झाला. गेल्या २० वर्षांच्या कालावधीत या महोत्सवात अनेक संकल्पना साकारल्या गेल्या. या महोत्सवात आजवर एक लाख ६० विद्यार्थी सहभागी झाले आहेत. देशातील अडीच हजार महाविद्यालये आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील ५०० परदेशी तांत्रिक महाविद्यालये यात सहभागी होत असतात. ‘युनेस्को’ने या महोत्सवावर शिक्कामोर्तब केले आहे.

यंदा या महोत्सवात काही स्पर्धाच्या प्राथमिक फेऱ्या मुंबईसह भारतातील प्रमुख शहरांत होतील. ‘टेक्नॉरायॉन’ या संकल्पनेंतर्गत मेकॅनिकल बॉट्स, लाइन फॉलोवर आणि प्रोग्रामिंग या स्पर्धाच्या प्राथमिक फेऱ्या विविध शहरांत होणार आहेत.

२४ सप्टेंबर रोजी मुबंई, हैद्राबाद आणि भोपाळ, तर ४ ऑक्टोबर रोजी जयपूर येथे या तिन्ही स्पर्धाच्या प्राथमिक फेऱ्या होणार आहेत. प्राथमिक फेऱ्यांमध्ये प्रत्येक शहरांमधून निवडलेल्या तीन संघांना अंतिम फेरीसाठी ‘आयआयटी मुंबई’ येथे आमंत्रित केले जाईल. गेल्या वर्षी या स्पर्धेत ३० हजार विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. अंतिम फेरीत जिंकलेल्या संघाला ४२ लाखांचे पारितोषिक बहाल केले जाईल. याशिवाय प्राथमिक फेरीतून अंतिम फेरीत पोहोचलेल्या प्रत्येक संघाला एक लाख ५१ हजारांचे बक्षीस दिले जाईल. आजवर या स्पर्धेत ४०० संघांनी नावनोंदणी केली आहे.

युगागमनचा राग

विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव देण्याच्या उद्देशाने, तसेच भारतीय संस्कृती आणि परंपरांची ओळख व्हावी या उद्देशाने ९ सप्टेंबर विवेकानंद महाविद्यालयात ‘रागा २०१७’ हा कार्यक्रम पार पडला. विवेकानंद एज्युकेशन सोसायटीच्या कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयांतील प्राध्यापिका आणि बीएमएम विभागाच्या प्रमुख प्रा. शिखा दत्ता यांच्या कल्पनेतून हा कार्यक्रम साकारण्यात आला होता. ‘युगागमन’ या संकल्पनेवर यंदाचा कार्यक्रम होता.

हिंदू संस्कृतीतील सत्य, त्रेता, द्वापार आणि कलियुग या चार युगांत मानवी स्वभावात व भारतीय संस्कृतीत कसकसे बदल होत गेले, याचा पट मांडण्यात आला. भारताचे हजारो वर्षांचे सांस्कृतिक सातत्य आणि इतिहासाचे विविध लक्षवेधी टप्पे, याशिवाय नृत्य, हस्तकला आणि संगीत क्षेत्रांत संस्कृतीने कसे नवे रूप धारण केले याचे चित्र ‘रागा’मध्ये मांडण्यात आले. विद्यार्थ्यांमधील गायन, नृत्य आणि संगीतकलेला या कार्यक्रमाच्या माध्यमातून नवे व्यासपीठ उपलब्ध होऊ

शकले, असे शिखा दत्ता यांनी सांगितले. ‘माईम’ कार्यक्रमात कृष्णाला वंदन करून भारतीय संस्कृतीतील भक्ती रस दाखविण्यात आला.  भांगडा नृत्यातून वीर रसाची उत्पत्ती कशी झाली. दुर्गादेवीला वंदन करण्यासाठी गरबा नृत्य सादर करण्यात आले.

Outbrain