महाविद्यालयातील परीक्षांचा हंगाम सरण्याच्या शेवटच्या टप्प्यात आहे. काही दिवसांतच त्या संपतीलही आणि विद्यार्थ्यांच्या कानात भटकंतीचे वारे शिरेल. हिंडा-फिरा-खा अशी त्रिसूत्री बाळगत अनेक जण वर्षभराची आखीव, बांधलेली जीवनसरणी बरीचशी सैल करतील. मग उन्हाच्या चटक्यांचे कोणाला काही पडलेले नसेल. नाही तरी गेल्या शैक्षणिक वर्षांत परीक्षांचे चटकेही काही कमी लागलेले नाहीत. यासाठी काहींनी कार्यक्रमांची सुंदर आखणी केली आहे. यासाठी कुठेही गैरसोय अशी जागा सोडलेली नाही. फिरण्याच्या विविध अंगांनी भटकंतीचा विचार केला जाऊ लागला आहे. त्यामुळे फिरण्याचा आनंद तर मिळेलच पण त्रास अधिक होणार नाही.

गटनिहाय ठिकाणाची निवड केल्यास सर्वाच्या रुचीचा आणि आवडीचा विचार करावा लागेल. नाही तर बऱ्याचदा एखादाच विद्यार्थी सांगतो आणि सर्व जण माना हलवतात. काहींची निवडलेल्या ठिकाणाची तशी फारशी आवड शिल्लक राहिलेली नसते. त्यामुळे बऱ्याच जणांच्या पदरी निराशाच पडते. उदाहरणच घ्यायचे तर विद्यार्थ्यांच्या गटात इतिहासाबाबत रुची असल्यास ऐतिहासिक ठिकाण निवडून त्याला भेट देता येईल. निसर्ग सान्निध्य ही सर्वाची तशी आवडती जागा. तिथे जाऊन काही नवीन गोष्टी जाणून घेण्याची आवड अनेकांना असते. एखाद्या नैसर्गिक उद्यानाला वा ठिकाणाला भेट द्या, जिथे तुम्हाला हिंडण्याबरोबरच नवीन माहिती मिळू शकेल. मित्रांची संख्या अधिक असेल तर एक दिवसाची फिरस्ती करणे अधिक सोईस्कर ठरेल. सर्व मित्रमैत्रिणींना त्यासाठी भरपूर वेळ देता येईल.

फिरण्याच्या अंतरावर सामानाची विभागणी करा. त्याप्रमाणे कपडे निवडा. खेळीमेळीने भटकायला जाणेही आवश्यक आणि गरजेचे आहे तरच तुम्ही तिथे जाऊन त्या ठिकाणाचा आनंद घेऊ  शकता. आज मुंबईत आणि मुंबईबाहेर अशी बरीच ठिकाणे आहेत, जिथे तुम्ही एकदिवसीय भटकंतीसाठी जाऊ  शकता. अशाच काही ठिकाणांची थोडक्यात माहिती.

मंडपेश्वर लेणी

बोरिवलीतील माऊंट पोयसरजवळ दहिसर नदीकाठाजवळ या लेण्या आहेत. सुमारे आठव्या शतकात बांधलेल्या लेण्यांमध्ये शिवलिंगाचे मंदिर आहे. लेण्यांवरील बाजूस पोर्तुगीज चर्चचे काही अवशेष आहेत; तसेच बौद्ध भिक्षूंनी आणि पर्शियन लोकांनी दगडावर केलेली चित्रकला प्रमुख आकर्षण आहे. लेण्यांजवळच एक पाण्याची टाकी आहे, त्यात अनेक मासे आणि कासव पाहावयास मिळतात. मंडपेश्वर लेण्यांजवळच ‘इमॅक्युलेट कॉन्सप्शन’ चर्चही पाहण्यासारखे आहे. इतिहासात अभिरुची असणाऱ्यांनी आणि त्याचा अभ्यास करणाऱ्यांनी इथे नक्की जावे.

  • जाण्याचा मार्ग- बोरिवली/दहिसर(पश्चिम) स्थानकावरून बस वा रिक्षा
  • अंदाजे खर्च : २० ते ६० रुपये.

गिल्बर्ट हिल

भवन्स महाविद्यालय अंधेरी (पश्चिम) जवळ अद्वितीय गिल्बर्ट हिल आहे. संपूर्ण डोंगर ज्वालामुखी खडकापासून बनला आहे. तसेच या खडक स्तंभावरील छोटय़ाशा उद्यानात गावदेवी आणि दुर्गामाता मंदिरही आहे. येथून मुंबई उपनगराचे विहंगम दृश्य दिसते. हौशी छायाचित्रकार मित्रांना घेऊन जाण्याचे हे उत्तम ठिकाण आहे, शिवाय मुंबईत असल्याने इतिहास आणि संशोधनात आवड असणाऱ्यांनी येथे जरूर भेट द्यावी.

 

  • जाण्याचा मार्ग- अंधेरी(पश्चिम) स्थानकावरून बस वा रिक्षा
  • अंदाजे खर्च- २० ते ५० रुपये

महाराष्ट्र निसर्गोद्यान 

मुंबईत फिरण्यासारखी बरीच ठिकाण आहेत; पण याला जर निसर्गाची जोड दिली तर मुंबईच्या मध्यवर्ती विभागात असलेल्या आणि शीव स्थानकापासून काही अंतरावर असणारे महाराष्ट्र निसर्गोद्यान हे निसर्गप्रेमी विद्यार्थ्यांसाठी उत्तम ठिकाण आहे. जिथे निसर्गाच्या सान्निध्यात राहून निसर्ग अनुभवता येईल. तिथे तुम्हाला जैवविविधता अभ्यासता येऊ  शकते. झाडे, फुलपाखरे, पक्षी, कीटक यांच्या नानाविध प्रजाती या उद्यानात आहेत. या सर्वाची माहिती घेण्यासाठी मार्गदर्शकही येथे आहेत. कचराभूमीवर वर उभे असलेले हे निसर्गउद्यान वैविध्याने नटलेले आहे. इथे नक्षत्रवन असून विविध औषधी वनस्पती आहेत. पर्जन्यजल संधारणाचा वापर करून संपूर्ण निसर्गोद्यानाला पाण्याचा पुरवठा होतो, येथील वाटिकेत रोपे विकत घेता येतात. शिवाय येथे कलादालनही आहे. प्राणी व पक्षीप्रेमींसाठी महाराष्ट्र निसर्गोद्यान म्हणजे पर्वणीच आहे.

  • जाण्याचा मार्ग- मध्य रेल्वेच्या शीव रेल्वे स्थानकानजीक
  • अंदाजे खर्च- २० रुपये.

उत्तन किनारा- भाईंदर

भाईंदर स्थानकापासून हे ठिकाण लांब असले तरी कोळ्यांची मासेमारी आणि त्यांची निर्यात हे जवळून पाहता येईल. येथे दिवंगत मदर टेरेसा यांनी बांधलेले एक जुने चर्च आहे.

जाण्याचा मार्ग- पश्चिम रेल्वेवरील भाईंदर स्थानकापासून रिक्षा वा बस. याशिवाय स्वत:च्या वाहनाने उत्तनचा किनारा गाठता येईल.

  • अंदाजे खर्च : २५० ते ५०० रुपये.

गोराई डोंगर

गोराई डोंगर हा पालीमधील सुधागड गावातील एक ऐतिहासिक डोंगर आहे. या ठिकाणाचे वैशिष्टय़ म्हणजे हा डोंगर मुघल राजवटीत बादशहाच्या आधिपत्याखाली होता त्यामुळे इतिहासप्रेमी विद्यार्थ्यांनी येथे जाण्यास हरकत नाही, तसेच या डोंगरावर गिर्यारोहणही करता येईल आणि एक दिवसीय साहसी सहलीला जाता येईल.

जाण्याचा मार्ग : कर्जतपासून पाली येथे एसटी बसची सोय. पालीवरून सुधागड गावात जाण्यासाठी टमटम करून गोराई डोंगराच्या पायथ्याशी उतरायचे.

संकलन : अक्षय मांडवकर, प्रियंका मयेकर, पराग गोगटे, सुयश देशपांडे, मितेश जोशी, रसिका शिंदे, प्राची सोनवणे.