13 December 2017

News Flash

आम्ही यू-टय़ूबर

समाजमाध्यम हे महाविद्यालयीन तरुणांचे व्यक्त होण्याचे हक्काचे व्यासपीठ आहे.

मितेश जोशी-अक्षय मांडवकर | Updated: April 21, 2017 3:34 PM

 

समाजमाध्यम हे महाविद्यालयीन तरुणांचे व्यक्त होण्याचे हक्काचे व्यासपीठ आहे. फेसबुक, ट्विटर या माध्यमांतून लिखाणाद्वारे विद्यार्थी व्यक्त होत असतात, तर काही जण कलाकृतीद्वारे यूटय़ूबवर व्यक्त होतात. सध्या यूटय़ूब हे माध्यम नवख्या कलाकारांसाठी जादूई बनले आहे. सिनेमा, टेलिव्हिजननंतर मोठय़ा प्रमाणावर यूटय़ूबवरील मालिकांना लोकांची पसंती मिळत आहे. त्यामुळे अनेक जण कलाकृती यूटय़ूबवर प्रसारित करतात आणि जम बसवतात. मग यात महाविद्यालयीन विद्यार्थी आघाडीवर नसतील तरच नवल! व्यक्तिगत आवडींना मूर्त रूप देऊन यूटय़ूब माध्यमाद्वारे ते समाजापर्यंत पोहोण्याचा प्रयत्न करीत आहेत. अशाच काही महाविद्यालयीन ‘यू-टय़ूबर’ यांचा कामाचा घेतलेला आढावा.

ऑनलाइन शॉपिंगच्या टिप्स

हल्लीच्या धावपळीच्या जीवनात फॅशन क्षेत्रात मुलींसोबतच मुलांमध्येही सुप्त अशी स्पर्धा आहे. ती कधी तरी उघडउघडही दिसते. ऑनलाइन शॉपिंग करताना चुका टाळण्यासाठी आणि ग्राहकांची होणारी फसवणूक थांबवण्यासाठी रोहन, मयूर व गिरीश हे तीन युवामित्र एकत्र आले व त्यांनी ‘फोर वाइज डुडस’ या नावाने यूटय़ूब चॅनेलची नोव्हेंबर २०१५ साली सुरुवात केली. सुरुवातीला चॅनल प्रसिद्ध होण्यासाठी काही काळ जावा लागला, पण आज आमचे चॅनेल १६ हजार लोक बघतात, आम्ही दिलेल्या टिप्स अमलात आणतात आणि त्याचप्रमाणे ऑनलाइन शॉपिंग करतात, असे रोहन सांगतो. फॅशन विश्वानेही कात टाकली आहे. मुलांनी फॅशनमध्ये मागे राहू नये, या उद्देशाने चालू करण्यात आलेले चॅनेल महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसमोर सादर करताना व त्यांना नव्या गोष्टी सांगताना आम्हाला खूप आनंद होतो, असे गिरीश याने आवर्जून नमूद केले.

स्वप्नाची पूर्ती 

रुपारेल महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण झाल्यानंतर स्वत:च यूटय़ूब चॅनल आणि निर्मितीचे स्वप्न उराशी बाळगलेल्या अथर्व चव्हाण याने ‘अथर्व चव्हाण प्रॉडक्शन’ या नावाने स्वत:च यूटय़ूब चॅनेल यंदापासून सुरू केले. स्वप्न आणि ते पूर्ण करण्यासाठी घेतलेले अथक परिश्रम अथर्वला यूटय़ूबच्या व्यासपीठावर पोहोचण्यात मदतगार ठरले आहेत. अथर्वच्या निर्मितीचा आता दुसरा सीझन प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

हसवण्याचा धंदा

निकुंज लोटिया याने जे जे स्कूल ऑफ आर्टस्मधून ‘हॉटेल मॅनेजमेंट’चा कोर्स पूर्ण केला. त्याला लिखाण, अभिनय आणि इतरांची नक्कल करण्याची मनापासून आवड होती. हा छंद मनाशी जोपासत पूर्ण करण्यासाठी त्याने खूप मेहनत घेतली. महाविद्यालयात असताना निकुंज याच्या विनोदी स्वभावाची झलक पाहायला मिळाली आणि त्याचे सारे मित्र खूश झाले. अंगचा विनोद जोपासण्यासाठी निकुंजने २०१५ साली ‘बी यू निक’ या नावाने यूटय़ूब चॅनेलची सुरुवात केली. ‘आमचा तरुणाईला हसवण्याचा धंदा’ या हेतूने चालू झालेल्या

या चॅनलने दोन वर्षांत इतकी भरारी घेतली की, या चॅनलचा प्रत्येक व्हिडीओ दोन कोटी तरुण पाहतात. अर्थात निकुंजच्या विनोदावर सर्व जण पोट धरून हसतात.

वाचन चळवळ

वाचनानंदात रममाण होण्यासाठी ‘एसआयईएस’ महाविद्यालयाची विद्यार्थिनी वैदेही गांगण हिने वर्षभरापूर्वी यूटय़ूब चॅनेल सुरू केले. वैदेही ही एक युवा लेखिका आहे. तिचे एक पुस्तकही प्रकाशित झाले आहे. तिच्या याच पुस्तकातील काही कथा

लघू चित्रपटाच्या स्वरूपात बघायला मिळतात. लवकरच इतर ksmitten curvel पुस्तकांमधीलदेखील काही निवडक, ज्ञानरंजक कथा आपल्याला तिच्या या यूटय़ूब चॅनेलमध्ये बघायला मिळणार आहेत. ज्ञानदानाचे हे काम करताना खूप मेहनत घ्यावी लागते.

परीक्षेच्या काळात अभ्यास व चॅनेल हा दुहेरी ताण सांभाळताना दोहोंची तितकीच समान पातळीवर काळजी घ्यावी लागते, असे वैदेही सांगते.

वाहतुकीतील गमती

डहाणूकर कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना ‘हार्दिक भाटकर’ या कॉलेज तरुणाचा अपघात झाला. कारण होतं वाहतुकीचे न पाळलेले नियम. अपघात झाल्यामुळे दोन महिने घरात बसून काढावे लागले. त्या दोन महिन्यांत यूटय़ूब चॅनेलच्या माध्यमातून लोकांमध्ये विशेषकरून कॉलेज तरुणांमध्ये वाहतुकीबाबतचे गांभीर्य निर्माण करावी अशी त्याच्या मनात भावना जागृत झाली व अपघातातून पूर्ण बरे झाल्यावर जुलै २०१६ मध्ये हार्दिकन ‘rev it upया नावाने यूटय़ूब चॅनल चालू केले. हार्दिकच्या या यूटय़ूब चॅनलमध्ये आपल्या वाहतुकीचे नियम का गरजेचे असतात? तसेच रस्त्यावर बाइक व गाडी चालवणाऱ्याची मानसिकता, रिक्षा व बाइकवाल्यांची क्षुल्लक कारणावरून होणारी भांडणे अगदी मनोरंजक पद्धतीने बघायला मिळतात.

भावभावनांचे विश्व

रुईया कॉलेजमध्ये शिकता शिकता शब्दांशी मैत्री झाली आणि हर्षदा संसारे कवयित्री झाली. पण या कविता केवळ वहीतच बंदिस्थ न राहता त्या जगाच्या कानाकोपऱ्यांपर्यंत पोहोचाव्यात, ज्याला एकटे वाटत असेल, ज्यांना पोरकेपणाची भावना मिळत असेल, ज्याला आत्महत्या करण्याची भावना मनात येत असेल त्यांची ती भावना माझ्या कविता ऐकून व वाचून नष्ट व्हावी या उद्देशाने रुईया कॉलेजच्या हर्षदा संसारे या विद्यार्थिनीने ambivert  या नावाने स्वत:च यूटय़ूब चॅनलची ऑक्टोबर २०१६ मध्ये नांदी केली. तिच्या या चॅनलमध्ये दर महिन्याच्या पहिल्या व तिसऱ्या गुरुवारी तिने रचलेल्या कविता बघायला मिळतात, तसेच दुसऱ्या व चौथ्या गुरुवारी सामाजिक समस्या विनोदी रूपात अनुभवायला मिळतात. कॉलेज तरुणांना संघटित करण्याचे कार्य मी माझ्या या चॅनलच्या माध्यमातून करीत आहे असे हर्षदा सांगते. तिचे हे यूटय़ूब चॅनल १२००० लोक पाहतात.

First Published on April 15, 2017 12:34 am

Web Title: youtube accessing by college student