जयहिंद महाविद्यालयाच्या व्यवस्थापन विभागाचा ‘तलाश’ हा महोत्सव डिंसेबर महिन्यात भेटीला येणार आहे. या महोत्सवाचा उद्घाटन समारंभ विद्यार्थ्यांनी नुकताच साजरा केला. ‘तलाश’ हा मुंबईतील व्यवस्थापन शिक्षण विभागाचा सर्वात मोठा महोत्सव असून १८ वर्षांपासून या महोत्सवाचे आयोजन केले जात आहे. यंदाच्या वर्षी हा महोत्सव अधिक भव्य स्वरूपात साजरा करण्याचा विद्यार्थ्यांचा मानस आहे. तीनदिवसीय या महोत्सवात उद्योग आणि व्यापार व्यवस्थापनाशी निगडित अनेक खेळ, स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत. याशिवाय चित्रपट आणि मालिका क्षेत्रातील कलावंत यंदा तलाशच्या मंचावर उपस्थित राहणार आहेत. महोत्सवाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या उद्घाटन संभारंभात देशातील ३० हून अधिक नामवंत महाविद्यालये सहभागी झाली होती. १५ ऑक्टोबर रोजी कार्टर रोड, वांद्रे येथे सायंकाळी ७ ते रात्रौ ११ दरम्यान हा सोहळा पार पडला. यात अनेक सामाजिक विषयांवर भाष्य आणि प्रत्यक्ष कृती असे या उद्घाटन समारंभाचे स्वरूप असते. २०१४ मध्ये ‘बाइक रॅली’च्या माध्यमातून रस्ते सुरक्षिततेसाठी ‘तलाश टीम’कडून हेल्मेट्सचे वाटप करण्यात आले.

२०१५ मध्ये लक्झरी वाहनाची रॅली ‘ड्राइव्ह फॉर सेफ्टी’ आयोजित करण्यात आली होती. सप्टेंबर २०१६ ला ‘स्ट्रीट क्रुसेड’ या समारंभाद्वारे रस्त्यांवर होणारे अपघात व त्याची कारणे याबाबत फलकांद्वारे माहिती देऊन तसेच सिग्नलवर पथनाटय़ाद्वारे लोकांना रस्ते सुरक्षेबाबत जागरूक केले गेले. यंदा दिवाळीच्या पाश्र्वभूमीवर लहान मुलांसाठी कागदी बनविण्याच्या मार्गदर्शनपर कार्यशाळेचे आयोजन उद्घाटन समारंभात करण्यात आले होते. या प्रसंगी लहान मुलांनी मोठय़ा संख्येने कागदी कंदील व मातीचे दिवे बनविले.

अग्निपंखांत बळ

बदलापूरच्या आदर्श कला आणि वाणिज्य महाविद्यालयात मराठी भाषा वाङ्मय मंडळातर्फे डॉ.अब्दुल कलाम यांच्या जयंतीच्या निमित्ताने वाचक प्रेरणा दिवस साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी वाचावे कसे या विषयावर यानिमित्त कार्यक्रम घेण्यात आला. या वेळी डॉ.अब्दुल कलाम यांच्या जीवनातील प्रसंग आणि त्यांचे मौलिक विचार सांगून विद्यार्थ्यांनी वाचक संस्कृती कशी जपावी यावर मार्गदर्शन करण्यात आले. डॉ. कलामांचे देशासाठी असणारे आणि युवकांना आवाहन करणारे संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात आले. कलाम यांचा वैयक्तिक कामापेक्षा सांघिक कामगिरीवर भर असायचा. सहकाऱ्यांच्या उत्तम गुणांच्या देशाच्या वैज्ञानिक आणि संपूर्ण प्रगतीसाठी उपयोग करून घेण्याची कला त्यांच्यामध्ये होती, अशी माहिती महाविद्यालयाच्या प्राचार्या. डॉ. वैदेही दप्तरदार यांनी विद्यार्थ्यांना दिली. या वेळी त्यांनी विद्यार्थ्यांना कलाम यांचे दोन लेख वाचून दाखवले. तसेच या कार्यक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनीही कलामांच्या मौलिक विचारांचे आणि कविता, नाटक, कादंबरी, वृत्तपत्र या प्रकारातील निवडक लेखांचे वाचन केले. या कार्यक्रमात नितेश पाटील, दर्शन गुजरे, तेजश्री चावण, रसिका मुंगे, रेणुका शेलवले, अनुजा मुलीक या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

मानसी जोशी

परदेशी पाहुण्यांचा दीपोत्सव

मुंबई विद्यापीठात शिक्षण घेत असलेल्या परदेशी विद्यार्थ्यांना समृद्ध भारतीय सण संस्कृतीचे दर्शन यंदा घडले. विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने ‘दीपोत्सवा’त परदेशी विद्यार्थ्यांना दिवाळी आणि भारतीय संस्कृतीची ओळख करून देण्यात आली.

फोर्ट परिसरातील संकुलात हा दीपोत्सव झाला. या कार्यक्रमात विविध कलागुण सादर करण्यात आले. शास्त्रीय संगीत उपशास्त्रीय गायन, गझल आणि जोडीला पाश्चात्त्य संगीताचा भारतीय संगीताशी मिलाफ कलाकारांनी घडवून आणला. या वेळी शोभेच्या दारूची आतषबाजी करण्यात आली. विशेष म्हणजे फराळावर परदेशी पाहुण्यांनी मनमुराद ताव मारला. याप्रसंगी मुंबई विद्यपीठाचे प्रभारी प्रकुलगुरू डॉ. धीरेन पटेल, प्रभारी कुलसचिव डॉ. दिनेश कांबळे, संचालक डॉ. अनिल पाटील,  प्रभारी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ.सुनील पाटील, प्रभारी वित्त आणि लेखा अधिकारी विजय तायडे व अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. भूतान, अफगाणिस्तान, व्हिएतनाम, सुदान, नायजेरिया, कोंगो आणि नेपाळमधील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.