‘भारती विद्यापीठ स्कूल ऑफ फोटोग्राफी’ (बीव्हीएसपी)च्या वतीने आयोजित केलेल्या छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन छायाचित्रकार रफीक सय्यद, कल्पना शाह यांच्या हस्ते झाले. ‘टाओ आर्ट गॅलरी’ आणि ‘बीव्हीएसपी’चे संचालक राजन चौगुले ‘बीव्हीएसपी’चे (अ‍ॅकेडेमिक) प्रमुख भारत भिरंगी हे या वेळी उपस्थित होते. संस्थेतून प्रशिक्षण घेऊन बाहेर पडलेल्या १३५ विद्यार्थ्यांची निवड प्रदर्शनासाठी करण्यात आली होती. ‘टाओ आर्ट गॅलरी’मध्ये हे प्रदर्शन भरविण्यात आले होते. यात फॅशन, पोटर्र्ेचर, स्टिल लाइफ, ऑटोमोबाइल, प्रवास यावर आधारित छायाचित्रांचा समावेश होता. या प्रदर्शनाबद्दल रफीक सय्यद यांनी कौतुक केले. कला जोपासण्यासाठी वेड आणि त्याबद्दलचे अपार प्रेम असावे लागते, असे सय्यद म्हणाले. विद्यार्थ्यांच्या या कामाचे एक विशेष कॉफी टेबल बुक सय्यद आणि कल्पना शाह यांना राजन चौगुले यांनी भेट दिले.

चिपळूण येथील विद्यार्थी आशुतोष जोशी याला याप्रसंगी ‘बेस्ट क्लिक ऑफ दि इयर २०१७’ या पुरस्कार जाहीर झाला. विद्यार्थ्यांना छायाचित्रणात कौशल्य प्राप्त करण्यासाठी त्यांची संस्था ही अत्याधुनिक साधने, तंत्रज्ञान, उपकरणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रशिक्षित शिक्षकांनी समृद्ध असणे आवश्यक असते, असे राजन चौगुले यांनी या वेळी सांगितले.

जगाचे भविष्य काय?

‘अथर्व कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग’चा ‘टेकिथॉन’ महोत्सव २५ ते २९ सप्टेंबर या कालावधीत उत्तरोत्तर रंगत गेला. ‘अथर्व’च्या विद्यार्थ्यांचे वेगळेपणाचे वैशिष्टय़ यंदाही चमकदार होते. ‘फ्युचरोपिया’ या संकल्पनेवर भविष्यकाळात तंत्रज्ञान कशी वळणे घेईल आणि त्यातून अधिकाधिक सोयीसुविधा कशा जीवनात प्रवेश करतील, त्यातून मानव कसा समृद्ध होत जाईल, याचे चित्र मांडण्यात आले. तंत्रज्ञानातील मुबलक साधनांचा योग्य वापर आणि संशोधन या आधारावर विद्यार्थ्यांनी जगाचे भविष्य जाणण्याचा प्रयत्न केला.  यासाठी विद्यार्थ्यांनी दोन महिने मेहनत घेतली. यात शिक्षकांचाही मोठा वाटा होता. ‘नेमबाजी’ हे या महोत्सवाचे विशेष आकर्षण ठरले. ‘सेंटर मॉडेल’मधील ‘फ्युचर हाऊस’ सर्वाच्याच चर्चेचा विषय ठरला. तंत्रज्ञानाच्या माहितीसोबतच इथे आंतरमहाविद्यालयीन स्पर्धाही घेण्यात आली. यंत्रमानवाच्या आधारे युद्ध, वेब डिझायनिंग, लॅन गेमिंग, लेजर टॅग, निऑन स्पोर्टस् असे विविध खेळ महोत्सवात पार पडले. दुसऱ्या दिवशी ट्रेजर हंट, निऑन गेम्स, लॅन गेमिंग, झोर्ब बॉल या खेळांमध्ये उत्साही सहभाग नोंदवला. तंत्रविषयक कार्यशाळा व परिसंवादाचीही पर्वणी विद्यार्थ्यांसाठी होती.

स्वच्छ भारताचे क्षितिज

विलेपार्ले येथील मिठीबाई महाविद्यालयाचा ‘क्षितिज’ हा वार्षिक महोत्सव यंदा ७ ते १० डिसेंबर या कालावधीत होणार आहे. सांस्कृतिक आणि सामाजिक विषयांवरील विविध उपक्रम या महोत्सवात होणार आहेत. या महोत्सवाचा प्रारंभिक उपक्रम सप्टेंबरमध्येच सुरू करण्यात आला. याद्वारे कर्करोगग्रस्त रुग्णांच्या आशा पल्लवित करण्यासाठी विशेष कार्यक्रम झाला. ‘लाइफ विन्स फाऊंडेशन’ आणि टाटा मेमोरियल हॉस्पिटल, परळ यांनी मिळून हा उपक्रम राबवला. याचा पुढील भाग म्हणून ‘क्षितिज’च्या ‘स्वच्छ आणि हरित भारत’ हा उपक्रम हाती घेतला आहे. यासाठी ७ किलोमीटरच्या मॅरेथॉनचे आयोजन १० डिसेंबर रोजी जुहू येथे करण्यात आले आहे. या मॅरेथॉनची नोंदणी ७ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. संपर्क- ९७७३९९७१५७. या उपक्रमाबाबत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजपाल हंडे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.