नोकरीमय कॅम्पस

महाविद्यालयातील तरुणाईचा हल्ली पदवीपेक्षाही पदव्युत्तर शिक्षणाकडे ओढा अधिक असतो.

रोजगाराच्या शोधातील तरुणाईला हल्ली आपल्या महाविद्यालयातच ‘प्लेसमेंट’ मिळू लागल्याने ही मंडळी हल्ली काहीशी निर्धास्त दिसू लागली आहेत. यामुळे मात्र शहरातील महाविद्यालयांचे स्वरूप हळूहळू बदलत असून विद्यार्जनाचे केंद्र या बिरुदाप्रमाणेच रोजगाराचे केंद्र अशी नवी ओळख महाविद्यालयांची होऊ लागली आहे. पूर्वी फक्त अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या दारात पोहचलेल्या बडय़ा कंपन्या आता वाणिज्य, व्यवस्थापन, कला आदी शाखा असलेल्या महाविद्यालयातही पोहचत असून लाखा-लाखांची ‘पॅकेजेस’ देण्यासही या कंपन्या पुढे-मागे पाहात नाहीत. यामुळे विद्यार्थीही आयत्याच चालून आलेल्या या संधीचे सोने करताना दिसत आहेत.

महाविद्यालयातील तरुणाईचा हल्ली पदवीपेक्षाही पदव्युत्तर शिक्षणाकडे ओढा अधिक असतो. त्यामुळे पदवी घेऊनच ते थांबत नाहीत तर पुढील शिक्षणासाठीही अनेक ठिकाणी धावाधाव करतात. मात्र गेल्या तीन-चार वर्षांपासून महाविद्यालयात आलेल्या कंपनीत नोकरी पत्करायची आणि दोन-तीन वर्षांचा अनुभव घेऊन त्या पैशात चांगल्या शिक्षणसंस्थेतून पदव्युत्तर पदवी संपादन करायची असा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा दृष्टिकोन दिसतो. एरव्ही अभियांत्रिकी व माहिती तंत्रज्ञान शाखा असलेल्याच महाविद्यालयांत जाणाऱ्या कंपन्यांनी आता आपला मोर्चा वाणिज्य, कला, व्यवस्थापन, फार्मसी आदी शाखा असलेल्या महाविद्यालयातही वळवला आहे. याचे कारण म्हणजे या कंपन्यांना पदवी पूर्ण करत आलेले नवखे विद्यार्थी स्वस्तात उपलब्ध होत आहेत. तर दोन-तीन वर्षांचा अनुभव गाठीशी घेऊन चांगले शिक्षण घेऊन पुन्हा चांगल्या पगाराची नोकरी मिळवायची असा कयास बांधून विद्यार्थी देखील मिळेल त्या पगारात नोकरी करताना दिसतात. त्यामुळे शिक्षणाबरोबरच व रोजगार निर्मितीच्या प्रक्रियेतही महाविद्यालयांनी शिरकाव केलेला दिसतो. महाविद्यालयांनीही आपल्या विद्यार्थी-प्राध्यपकांना यासाठी नव्या जबाबदाऱ्या दिल्या असून त्यांच्याकडेच ‘प्लेसमेंट’ प्रमुख म्हणून जबाबदाऱ्या देण्यात येतात. हे ‘प्लेसमेंट’ विविध कंपन्यांमध्ये जाऊन आपल्या महाविद्यालयात येण्याची विनंती करतात आणि मग महाविद्यालयात करिअर मेळाचे आयोजन होते. वित्तपुरवठा, बँका, विपणन, सल्लागार कंपन्या तसेच माहिती तंत्रज्ञान, औषध निर्मिती क्षेत्रातील कंपन्या यात आघाडीवर आहेत. डीलॉईट, अर्न्‍स अ‍ॅण्ड यंग, केपीएमजी, पीडब्ल्यूसी, डीएलएफ, गुगल इंडिया आदी कंपन्यांची नावे विद्यार्थ्यांच्या तोंडी सध्या रेंगाळत असून येथे नोकरी मिळावी यासाठी विद्यार्थी हरतऱ्हेची तयारी करत आहेत. याचे कारणही खास असून या कंपन्या ३ लाखांपासून अगदी १२ लाखांपर्यंतचे घसघशीत ‘पॅकेज’ विद्यार्थ्यांना देऊ करत आहेत. बाहेर नोकरी शोधण्यासाठी खूप धावपळ करावी लागते परंतु महाविद्यालयातच एखादी नोकरी मिळत असेल तर चांगलेच आहे. अंकुश गाढे या महाविद्यालयीन तरुणाची ही प्रतिक्रिया अत्यंत बोलकी आहे. तसेच कंपन्या देखील काम करण्याची इच्छा असलेल्या तरुणांना प्रशिक्षित करून नोकरी देतात आणि चांगला प्रशिक्षित झालेला हा विद्यार्थी कंपनी सोडून जाऊ नये यासाठी त्याला पदव्युत्तर पदवी घेण्यासाठी साहाय्यही करतात. त्यामुळे सध्या महाविद्यालयातच मिळणाऱ्या नोकरीकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढला असून ठाणे-मुंबईतील बहुतांश महाविद्यालयांत येत्या डिसेंबरमध्ये रोजगार मेळावे भरणार आहेत.

महाविद्यालयांनीही पारंपरिक अभ्यासक्रमाबरोबरच नोकरी कशी मिळवावी याचेही धडे विद्यार्थ्यांना वर्गात देण्यास सुरुवात केल्याने एकंदरीतच शिक्षणाला रोजगाराची जोड मिळाल्याचे वातावरण दिसते आहे. येत्या डिसेंबर महिन्यापासून हा रोजगाराचा झरा मुंबईतील बहुतांश महाविद्यालयांत वाहणार असून सध्या सुरू असलेल्या परीक्षांच्या काळातही विद्यार्थी नोकरीच्या मुलाखतीसाठी आपला खास ‘रेझ्युम’ करण्याच्या तयारीत गुंतलेली आहेत.

आम्ही पाचवी-सहामाही संपुष्टात आल्यानंतर कंपन्यांना निमंत्रित करतो. यासाठी आमच्या महाविद्यालयातील प्रत्येक शाखेला एक प्लेसमेंट प्रमुख नेमला असून ते या कंपन्यांकडे जातात. या वेळी अंदाजे २० कंपन्या महाविद्यालयात येऊन विद्यार्थ्यांची मुलाखत घेऊन त्यांच्याशी समूह चर्चा करतात. विद्यार्थ्यांना बाहेर नोकरीसाठी बरीच धावपळ करावी लागते. म्हणून येथे विद्यार्थी नोकरीसाठी प्रथम पसंती देतात. गेल्या वर्षी आमच्या विद्यार्थ्यांत ८४ विद्यार्थ्यांना नोकरी मिळाली तसेच साडेतीन लाख एवढे सर्वाधिक पॅकेज एका विद्यार्थ्यांस मिळाले. या कंपन्यांमध्ये काम केल्याने अनुभव मिळतो व त्या अनुभवाच्या जोरावर भविष्यात चांगल्या पगाराच्या नोकरीचा मार्ग विद्यार्थ्यांना खुला होतो.

योगी नाईक

सिडनेहॅम महाविद्यालय, प्लेसमेंट हेड

हल्लीची मुलांना चांगल्या शिक्षणाबरोबरच चांगला अनुभवही अपेक्षित आहे हेदेखील त्यांच्या लक्षात येऊ लागले आहे. यासाठी आम्ही महाविद्यालयात करिअर मेळाव्यांचे व रोजगार मेळाव्यांचे आयोजन करतो. पर्यटन, बँका, माहिती तंत्रज्ञान अशा वेगळ्या क्षेत्रातील कंपन्यांना आमच्याकडे बोलवतो. १० ते १२ हजार पगारापासून पुढील पगाराच्या नोकऱ्या विद्यार्थ्यांना मिळतात. अनेक विद्यार्थी तरीही नोकरी टाळून उच्च शिक्षणाचाही पर्याय निवडताना दिसतात. मात्र महाविद्यालयातच मिळणारी नोकरी स्वीकारणाऱ्यांचे प्रमाणही अधिक आहे. विद्यार्थ्यांना नोकरीची परीक्षा सोपी जावी यासाठी आम्ही रिझ्युमे, समूह चर्चा यांचे मार्गदर्शन करतो.

डॉ. कविता रेगे प्राचार्या, साठय़े महाविद्यालय

महाविद्यालयांमध्ये कंपन्यांना कमी पगार स्वीकारणारे व काम करण्याची इच्छा असणारे उदयोन्मुख उमेदवार मिळतात. भविष्यात कंपनीतर्फेच विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणाचा मार्गही खुला होतो. त्यामुळे कंपनीत शिकून तयार झालेला उमेदवार पुढील शिक्षण घेऊनही कंपनीतच राहतो व याचा कंपनीलाच फायदा होतो. आमच्या महाविद्यालयात दरवर्षी अशा मोठय़ा कंपन्या येतात आणि जवळपास ४०० विद्यार्थी यासाठी अर्ज करतात. या नोकऱ्यांना विद्यार्थ्यांची निवड व्हावी यासाठी आम्ही विद्यार्थ्यांची पूर्वतयारी करून घेतो. त्यांना रिझ्युमे कसा लिहावा तसेच मुलाखत आणि समूह चर्चेत कशी उत्तरे द्यावीत याचे प्रशिक्षण देतो. याच्या चाचण्याही त्यांच्याकडून करून घेतो. त्यामुळे विद्यार्थी हमखास कंपनीच्या पसंतीस उतरतात. तसेच सरसकट सगळ्यांनाच नव्हे तर ज्यांना नोकरी करण्याची इच्छा आहे अशांनाच आम्ही मुलाखतीला बोलावतो, त्यामुळे नोकरीसाठी अर्ज केलेला प्रत्येक जण नोकरीचा पर्याय निवडतो.

नवीन पंजाबी

एच. आर. महाविद्यालयाचे प्लेसमेंट संचालक

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व कॅम्पसकट्टा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Campus jobs