scorecardresearch

शहर-ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये विचारांची देवाणघेवाण

शहरी आणि ग्रामीण भागांतील विद्यार्थ्यांमध्ये विचारांची देवाणघेवाण व्हावी, हा या कराराचा मुख्य हेतू आहे.

शहर-ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये विचारांची देवाणघेवाण

ठाण्यातील सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालय आणि उस्मानादाबाद जिल्ह्य़ातील उमरगा येथील आदर्श महाविद्यालय यांच्यात जून-२०१६ मध्ये एक सामंजस्य करार झाला. शहरी आणि ग्रामीण भागांतील विद्यार्थ्यांमध्ये विचारांची देवाणघेवाण व्हावी, हा या कराराचा मुख्य हेतू आहे. या करारान्वये प्राध्यापकांच्या विचारांचे आदानप्रदान, विद्यार्थ्यांच्या विचारांची देवाणघेवाण, व्यक्तिमत्त्व विकास शिबीर, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चर्चासत्रे असे उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. या उपक्रमाचा भाग म्हणून सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयातील विद्यार्थी आणि प्राध्यापक हे आदर्श महाविद्यालयाने आयोजित केलेल्या ग्रामीण विकास शिबिरात नुकतेच सहभागी झाले होते. दोन्ही महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी ग्रामीण स्वच्छता, वनराई बंधारे, अंधश्रद्धा निर्मूलन अशा प्रकारचे उपक्रम राबविले. २२ डिसेंबर ते २७ डिसेंबर या कालावधीत ज्ञानसाधना महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे शिबीर ठाणे जिल्ह्य़ातील शहापूर तालुक्यातील मौजे वंगणपाडा या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात आदर्श महाविद्यालयातील १० स्वयंसेवक आणि प्रा. सतीश रास्ते उपस्थित होते. या कार्यक्रमात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रशेखर मराठे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

या शिबिरात व्यक्तिमत्त्व विकास, आहार आणि आणि आरोग्य, अंधश्रद्धा निर्मूलनाचे प्रयोग, बचत गटाद्वारे महिला सक्षमीकरण असे विविध उपक्रम व चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. शिबिराचे नियोजन व स्वयंसेवकांच्या सहभागासाठी डॉ. धनंजय मुळजकर, डॉ. गणेश भगुरे, कार्यक्रम अधिकारी प्रा. सुरेश हलबांडगे,प्रा. सोनाली कोकणे, प्रा. सतीश रास्ते यांनी विशेष मार्गदर्शन केले.

(हृषीकेश मुळे)

वृक्षवल्ली आम्हा सोयरे

मुंबईमध्ये सुरु असलेल्या विकासाकामांचा फटका येथील वृक्षसंपदेला बसत असतानाच महाविद्यालयीन तरुणांना मुंबईतील पर्यावरण आणि मुख्य म्हणजे दुर्मिळ वृक्षांचे संवर्धनाचे महत्व समजून देण्यासाठी सोमय्या आयुर्विहारने अनोखा उपक्रम राबविला होता. शीव येथील सोमय्या आयुर्विहारच्या कॅम्पसमध्ये सोमय्या न्यासातर्फे बांधण्यात आलेल्या ‘वनस्पत्यम्’ या वैद्यकिय आयुवेैदिक वनस्पतींच्या उद्यानाला मुंबईतील विविध महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी भेट दिली. २४ डिसेंबर रोजी सकाळी आठ वाजता सुरु झालेल्या या उपक्रमामध्ये ६१ हून अधिक प्रजातीच्या दुर्मिळ औषधी वनस्पती पाहण्याची संधी उपस्थित विद्यार्थ्यांना मिळाली. जीएम रुग्णालयाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.उषा देसाई, सोमय्या आयुर्विहारच्या रिना व्यास यांनी एकत्र येऊन हा नाविन्यपूर्ण उपक्रम आयोजित केला होता.

वनस्पतीशास्त्र, आयुवेद, लॅण्डस्केप स्थापत्यशास्त्र आणि बागकाम या क्षेत्राचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ‘वनस्पत्यम्’ उद्यान ही महत्वाची जागा आहे. मुंबईमधील आयुवैदिक वनस्पतींसाठी राखीव असलेली ही एकमेव उद्यान आहे. सोमय्या व्यवस्थापनाने ही बाग सर्वासाठी खुली ठेवली आहे. बागेमध्ये असलेल्या खोकला आणि पडश्यासाठी वापरल्या जाणाऱ्या अडुळसा या वनस्पतीच्या माहिती घेऊन या फेरीला सुरुवात करण्यात आली. शिवाय केवळ हरडा ही वनस्पती पाहण्यासाठी सहभागी विद्यार्थी उत्सुक होते. घाटकोपर येथील आर. जे. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. उषा मुकुंदन महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसोबत या उपक्रमामध्ये सहभागी झाल्या होत्या. मुंबईसारख्या मेट्रो शहरातील हरित आरोग्य टिकून ठेवल्याबद्दल त्यांनी आयोजकांचे आभार मानले. बागेविषयी मी केवळ  ऐकून होते. पण, आज मला तो अनुभव घेण्याची संधी मिळाली. वैद्यकिय वनस्पतीशास्त्राचे शिक्षण घेणाऱ्या माझ्यासारख्या विद्यार्थ्यांना या उपक्रमाद्वारे बरेच काही शिकण्यासारखे मिळत आहे. शिवाय उद्यान्याची उभारणी आणि झाडांची निगा राखण्याकडे विशेष लक्ष दिले असल्याचे सेंट झेवियर्स महाविद्यालयात एमएससी टॅक्सॉनॉमीचे शिक्षण घेणारी विद्यार्थ्यांनी किरण शर्मा यांनी सांगितली. शिवाय खालसा महाविद्यालयातील माजी मायक्रॉबायोलॉजिस्ट डॉ. रानडे देखील या उपक्रमामध्ये सहभागी झाले होते. निवृत्तीनंतर विविध वनस्पतींच्या अभ्यास करण्याचा छंद जडला असून या उपक्रमामुळे वनस्पतीची ओळख होण्यास मदत झाली आहे. तसेच वनस्पतींच्या भोवती लोकांना सहजरीत्या फिरता यावे यासाठी पदपथ उभारण्यात आले आहेत.

वझे केळकरच्या मंथनमध्ये जागर मराठीचा

मराठी भाषेविषयी प्रेम असणाऱ्या व्यक्ती, विद्यार्थी आणि पालकांनी मंथन महोत्सवात सहभागी व्हायला हवे. अशा प्रकारचे उत्सव केवळ काही दिवसांपुरते मर्यादित राहायला नको. ती एक निरंतर सुरू राहणारी चळवळ व्हावी, असे प्रतिपादन अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी वझे-केळकर महाविद्यालयात व्यक्त केले. केळकर एज्युकेशन ट्रस्टच्या व्ही.जी. वझे महाविद्यालय पुरस्कृत मराठी भाषा आणि वाङ्मय मंडळाच्या वतीने आयोजित दोन दिवसीय आंतरशालेय आणि आंतरमहाविद्यालयीन महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या.

सोनाली कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना मराठी सिनेसृष्टीतील, चालू घडामोडींवर आधारित प्रश्न विचारले. या विचारलेल्या विविध प्रश्नांवर विद्यार्थ्यांनी उत्तरे दिली. या आंतरशालेय आणि आंतरमहाविद्यालयीन महोत्सवांत निरनिराळ्या स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवात विविध ५० महाविद्यालये आणि २१ पेक्षा जास्त शाळांनी भाग घेतला होता. त्यात एकूण दीड हजार विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यापैकी श्रीरंग विद्यालय मराठी माध्यमातून १२८ आणि के. सी. गांधी शाळा कल्याण येथून ११२ मुलांचा सहभाग होता. जिंगल स्पर्धा, जरा मराठी होऊ  द्या प्रश्नमंजूषा स्पर्धा, सहवास साहित्यिकांचा (आपल्याला भावलेल्या साहित्यिकावर वक्तृत्व स्पर्धा) नृत्य, गायन, चित्रकला स्पर्धा, स्वकाव्य स्पर्धा, लेखक तुमच्यातला (लघुकथा लेखन आणि लघुकथा कथन स्पर्धा) आणि नाटय़मंथन स्पर्धा अशा अनेक स्पर्धामध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाचा समारोप मराठी-हिंदी अभिनेते श्रेयस तळपदे यांच्या उपस्थितीत झाला. आपण सर्वानी मराठी भाषेचे महत्त्व सांगण्यापेक्षा मराठी भाषेचा गोडवा जगभरात पसरवू या. त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी अशा प्रकारे विविध स्पर्धामध्ये भाग घेतला पाहिजे, कारण अशाच स्पर्धामुळे तुम्हाला तुमच्यातील सुप्त गुण कळतील, असे मत श्रेयस तळपदे यांनी व्यक्त केले.  या महोत्सवासाठी विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.बी. शर्मा, उपप्राचार्या शुभांगी भावे यांनी मार्गदर्शन केले.

(हृषीकेश मुळे)

बांदोडकर विज्ञान महाविद्यालयात आकांक्षा महोत्सव

विद्या प्रसारक मंडळाच्या बा. ना. बांदोडकर विज्ञान महाविद्यालयात आकांक्षा फेस्टिव्हलचे इंद्रयुध नवीन वर्षांच्या पूर्वसंध्येला पार पडले.

पर्सनॅलिटी हंट, अ‍ॅक्टिंगची फॅक्टरी, समूह गायन, समूह नृत्याविष्कार, एकल गायन, एकल नृत्य, फॅशन शो, नाटय़छटा एकांकिका असा भरगच्च व भव्य शानदार सोहळा नवीन वर्षांच्या पूर्वसंध्येला पार पडला. यामध्ये अकरावीपासून पदवी, पदव्युत्तर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी चुरशीने भाग घेतला. या आगळ्यावेगळ्या वार्षिक समारंभाचे आयोजन सांस्कृतिक मंडळाचे समन्वयक डॉ. सुदेश राठोड आणि त्यांच्या सर्व शिक्षक विद्यार्थी समितीतील सभासदांनी मोठय़ा उत्साहाने केले होते. इंद्रधनुष्यामध्ये सात रंग असतात. त्यानुसार सात दिवस हा महोत्सव साजरा करण्यात आला. त्यातला खादी दिवस विशेष महत्त्वाचा होता. ग्रीटिंग कार्ड मेकिंग, रांगोळी, लव्ह लेटर रायटिंग, नेल आर्ट, मेहंदी, ब्रायडल मेकअप, कवितावाचन, पेपर क्विलींग, वादविवाद स्पर्धा या स्पर्धामध्ये विद्यार्थ्यांनी त्यांची चुणूक दाखवली. अ‍ॅक्टिंगची फॅक्टरी यामध्ये सामाजिक विषयांवरही भाष्य करण्यात आले. तसेच फॅशन शोमध्येही सामाजिक संदेश देण्यात आले. मिस्टर बांदोडकर आणि मिस बांदोडकर स्पर्धेत टॅलेंट हंट व जजेस राऊंड इत्यादी चाळणीमधून भूषण शेंडकर हा मिस्टर बांदोडकर आणि सदफ शेख ही मिस बांदोडकर म्हणून निवडली गेली. पर्यावरणाचे महत्त्व जाणून बांदोडकर विज्ञान महाविद्यालयाचा फेस्टिव्हल ६० डेसिबल्सपेक्षा कमी आवाजात साजरा झाला. त्यात प्लास्टिकचा वापर टाळण्यात आला.

(योगिता पडवेकर)

मराठीतील सर्व कॅम्पसकट्टा ( Campuskatta ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या