scorecardresearch

महोत्सवात ‘मग्न’

महोत्सवादरम्यान महाविद्यालयाच्या प्रांगणात दुकाने उभारण्याची संधीही विद्यार्थ्यांनाच देण्यात आली होती.

महोत्सवात ‘मग्न’

अंजुमन इस्लाम हॉटेल मॅनेजमेंट महाविद्यालयाचा ‘मग्न २०१७’ हा महोत्सव नुकताच महाविद्यालयात मोठय़ा उत्साहात साजरा झाला. १३ आणि १४ डिसेंबर रोजी या उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाला मुंबईतील महाविद्यालयांसह ठाणे, नवी मुंबई, विरार आणि वसईतील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी उपस्थिती दर्शविली होती. हॉटेल व्यवस्थापन प्रशिक्षण घेणारे विद्यार्थी आणि कला, वाणिज्य, विज्ञान तसेच अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्यांच्या कलागुणांची झलक या महोत्सवात पाहायला मिळाले. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याबरोबरच ‘अंजुमन’मधील विद्यार्थ्यांना व्यवस्थापनाचे धडे देण्यात आले. महोत्सव नियोजन, पाहुण्यांचे स्वागत, सेवा-सुविधा, माध्यम व्यवस्थापन, सुरक्षा या अभ्यासक्रमात असलेल्या भागावर प्रत्यक्षात काम करण्याची संधी हॉटेल व्यवस्थापनाचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना यावेळ मिळाली. याशिवाय महोत्सवादरम्यान महाविद्यालयाच्या प्रांगणात दुकाने उभारण्याची संधीही विद्यार्थ्यांनाच देण्यात आली होती.

मुलांची व्यावहारिक शिक्षणाची बाजू भक्कम करण्याबरोबरच त्यांच्यातील सामाजिक जाणीव जागृत ठेवण्यासाठीही या महोत्सवात प्रयत्न करण्यात आले. रक्तदान शिबीर हा त्यातील एक भाग होता. अभिनेते डॉ. गिरीश ओक, सुशांत शेलार, संग्राम समेळ, शेफ विनित भाटिया आदी मान्यवर मंडळींनी दृक्श्राव्य माध्यमातून विद्यार्थ्यांशी संवाद साधला. ‘अंजुमन इस्लाम’चे अध्यक्ष डॉ. झहीर काझी, उपाध्यक्ष मुस्ताफ अंतुले, सचिव यास्मिन सेफिउल्ला तसेच प्राचार्य डॉ. रुकसाना बिलिमोरिया आणि हरीश सुवर्णा यांनी या वेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यासाठी नायर हॉस्पिटल आणि हरकिशन दास रुग्णालयाचे यासाठी सहकार्य लाभले. शिबिरात एका दिवसांत १२४ युनिट रक्त जमा झाले. या वेळी तात्याराव लहाने महोत्सवाला भेट देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

बालपण आले देवा..

डी. जी. रुपारेल महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी लहान मुलांच्या शिक्षणाविषयी, त्यांच्या हक्कांविषयी समाजात जागरूकता निर्माण व्हावी यासाठी ३० नोव्हेंबर रोजी महाविद्यालयाच्या ‘स्वरसाधना’ या गटाने आगळ्यावेगळ्या पद्धतीने बालदिनाचे आयोजन केले होते. ‘पाटी पेन्सिल’ या संगीत कार्यक्रमाचे या प्रसंगी आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयातील संगीत विषयात रुची असणाऱ्या विद्यार्थ्यांनी ‘स्वरसाधना’ या गटाची स्थापन केली आहे. या वेळी या विद्यार्थ्यांनी बालगीते सादर केली. विद्यार्थ्यांना या वेळी बालपणाची आठवण झाली.

‘ससा तो ससा’, ‘सांग सांग भोलानाथ’, ‘किलबिल किलबिल पक्षी बोलती’ अशा जुन्या बालगीतांसोबतच ‘कार्टून नेटवर्क’वरील बच्चे कंपनीसाठी दाखवल्या जाणाऱ्या मालिकांमधील गाणीही या वेळी सादर करण्यात आली. या कार्यक्रमाला सुप्रसिद्ध गायिका वर्षां भावे यांची प्रमुख उपस्थित होती. त्यांनी संगीतबद्ध केलेली बालगीतेही सादर झाली. महाविद्यालयाचे प्राचार्य, शिक्षक मंडळी आणि विद्यार्थ्यांनी मोठय़ा संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित राहिले होते. कार्यक्रमात सादर झालेल्या बालगीतांमधून बालपण नव्याने अनुभवले. मोठे होण्यात,  प्रगती करण्यात आपण स्वत:ला गुंतवून घेतो, पण त्याच धकाधकीच्या आयुष्यात निरागस बालपणीचा सुवर्णकाळ आठवावा आणि आपण क्षणासाठी का होईना परत लहान होण्याची संधी या कार्यक्रमाने प्रेक्षकांना मिळाली.

अंधश्रद्धा निर्मूलन कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद

वडाळ्यामधील एस. आय. डब्लू. एस महाविद्यालयामध्ये अंधश्रद्घा निर्मुलन समितीच्या कार्यकर्त्यांनी युवक जागृती मोहिम आयोजित केली होती. १२ डिसेंबर रोजी ही मोहिम महाविद्यालयात पार पडली. महाविद्यालयातील मराठी सांस्कृतिक संघाच्या वतीने अंधश्रध्दा निर्मुलनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी समितीचे कल्याण शहर समन्वयक राजेंद्र कोळी, स्वप्नील शिरसाट, राहुल आरु आदी कार्यकारी मंडळी उपस्थित होती. यानिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. उषा अय्यर यांनी केले. तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख संगीता काशीद यांनी केले. याप्रसंगी महाविद्यालयाच्या उपप्राचार्या डॉ. दिपा रावले यादेखील उपस्थित होत्या. यावेळी समितीच्या कार्यकर्त्यांनी काही प्रात्याक्षिके उपस्थित विद्यार्थ्यांसमोर करुन दाखविली. या प्रात्यक्षिकांचे सादरीकरण करुन अंधश्रद्धेला विद्यार्थ्यांनी बळी पडू नये, असाही संदेश कार्यकर्त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. तसेच जागृतीपर गीताचे सादरीकरणही यावेळी करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूंत्रसंचालन निलेश कारभारी यांनी केले. यावेळी विद्यार्थ्यांनी दिलेल्या दिलेल्या प्रतिसादामुळे अंधश्रद्धा निर्मुलन विषयी जागरुकता करणे शक्य झाल्याचे समितीच्या कार्यकर्त्यांनी म्हटले.

झेवियर्समध्ये बौद्धिक

सेंट झेवियर्स महाविद्यालयाच्या मराठी वाडमय मंडळाने ‘नवे वर्ष..नवी वाटचाल’ या ब्रीदवाक्यासह ९४ व्या वर्षांत पदार्पण केले आहे. मंडळाने गेल्या ९३ वर्षांत कलेचे महत्व जाणून विद्यार्थ्यांमधील कलात्मकतेला प्रोत्साहन देण्यासाठी विविध मंच उपलब्ध करून दिले आहेत. महाविद्यालयात नववर्षांच्या स्वागतासाठी वैचारिक मंथनावर भर देण्यात आला आहे. यासाठी मंडळातर्फे ८ डिसेंबर रोजी ‘मराठी पाऊल पडते पुढे : एक बौद्धिक पर्वणी’ या चर्चासत्राचे आयोजन केले आहे. यात अतिरिक्त पोलीस आयुक्त रवींद्र शिसवे, सामाजिक कार्यकर्त्यां गौरी सावंत, प्रसिद्ध लेखक आणि वैज्ञानिक डॉ. बाळ फोंडके आणि प्रसिद्ध अभिनेता आणि दिग्दर्शक अनुराग वरळीकर यांना आमंत्रित करण्यात आले होते. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधण्यात आला.

समाजात प्रामाणिक राहणे हे अत्यंत गरजेचे आहे. तरुण पिढीकडे या प्रामाणिकपणाचा वारसा सोपविता आला पाहिजे. सरकारी क्षेत्रात कर्तव्यनिष्ठ अधिकाऱ्यांची गरज आहे. यासाठी स्पर्धात्मक परीक्षेत सहभागी होणाऱ्यांची संख्या वाढली पाहिजे. अशा अधिकाऱ्यांची फौज तयार करता आली तर प्रशासन आणि पोलीस विभागातील कार्यक्षमता नक्कीच वाढीस लागेल, असे मत रवींद्र शिसवे यांनी मांडले.

तृतीयपंथी समाजासाठी काम करणाऱ्या गौरी सांवत यांनी अनुभवकथन केले. आयुष्यात एक काळ अधिकच कठीण गेला. हलाखीच्या आणि संघर्षांच्या परिस्थितीत कसे वागायचे ते कळाले. त्यातूनच कणखर मानसिकता तयार झाली. पालन हा गुण फार महत्त्वाचा असतो. तो बाणविण्यासाठी जोडीला मोठी सहनशीलता लागते. ‘गायत्री’ या मुलीचा सांभाळ करताना जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा बदलला याचे वर्णनही त्यांनी केले.

वैज्ञानिक डॉ. बाळ फोंडके यांनी प्रेक्षकांचा विज्ञान आणि गणित विषयाबद्दल असलेला गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी विज्ञान आणि आपल्या दैनंदिन जीवनातील साम्य प्रेक्षकांसमोर मांडले. शेवटी अभिनेता आणि महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी अनुराग वरळीकर याने प्रेक्षकांशी संवाद साधला. महाविद्यालयाने त्यांचे व्यक्तिमत्त्व घडविण्यासाठी कशी मदत केली याबद्दल त्याने उपस्थितांना सांगितले.

तसेच प्रत्येक भूमिका जगण्याचा अनुभव हा केवळ अभिनेत्याला मिळतो, असे सांगून करत असलेल्या कामाबद्दल त्याने समाधान व्यक्त केले.

व्हीजेटीआयमध्ये टेक्नोवान्झा

तंत्रवेडय़ा विद्यार्थ्यांचे माहेरघर असणाऱ्या व्ही.जे.टी.आय. महाविद्यालयाचा ‘टेक्नोवान्झा’ हा तांत्रिक महोत्सव पुन्हा एकदा भेटीला आला आहे. यंदाच्या महोत्सवात आगळ्यावेगळ्या अशा ‘ड्रोन रेसिंग’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘इंडियन ड्रोन रेसिंग लीग’च्या सहकार्याने ही स्पर्धा प्रथमच या महोत्सवात पार पडणार आहे. २६ ते २८ डिसेंबर रोजी महाविद्यालयाच्या विस्तृत प्रांगणात हा तांत्रिक महोत्सव मोठय़ा उत्साहात साजरा होणार आहे. दरवर्षी साजऱ्या होणाऱ्या या महोत्सवात मुंबई आणि राज्यातील विविध शहारांमधील तांत्रिक महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेणारे विद्याथ्र्यी मोठय़ा संख्येने उपस्थित राहतात. रोबोवॉर, रोबोसुमो, रोबोमेझ, मोन्सटर अरेना आणि व्हीआरसी म्हणजे व्हीजेटीआय रोबो चॅलेंज यांसारख्या अनेक स्पर्धा दरवर्षी आयोजित करण्यात येतात. या स्पर्धाची रंगत अनुभवण्यासाठी विद्यार्थ्यांप्रमाणेच महाविद्यालयातील शिक्षकगणही या स्पर्धाच्या वेळी आवर्जून उपस्थित राहतात. यंदाच्या वर्षी विशेष करून शालेय विद्यार्थ्यांमध्ये तंत्रज्ञानाचे वेड लावण्यासाठी प्रयत्न करण्यात आले आहेत. यासाठी छोटय़ा तंत्रवेडय़ांना प्रोत्साहन देण्यासाठी मेकर्स स्क्वेअर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये सिव्हिल, मॅकेनिकपासून रासायनिक आणि भौतिक प्रकल्पाचाही समावेश करण्यात आला आहे. याशिवाय आयसी इंजिन, स्मार्ट सिटी प्रोजेक्ट, अ‍ॅक्वा बॉट, रोबो सॉकर यांसारख्या स्पर्धाचे आयोजनही करण्यात आले आहे. तसेच तांत्रिक मार्गदर्शनाने समुद्ध करणाऱ्या मार्गदर्शक तज्ज्ञांनी विविध विषयांवर केलेले विश्लेषण ऐकण्याची संधी ही विद्यार्थ्यांना या महोत्सवाच्या माध्यमातून मिळणार आहे. याबाबत माहिती लवकरच जाहीर केली जाणार आहे. मुख्य म्हणजे यंदाच्या स्पर्धासाठी  ‘मुंबईचा डब्बेवाला’ ही संकल्पना राबविण्यात आली आहे. तांत्रिक प्रगतीच्या उद्देशाबरोबरच सामाजिक बांधिलकीची जाणीवही महोत्सवादरम्यान ठेवली गेली आहे. प्रतिज्ञा या मोहिमेअंतर्गत गरजू लोकांना कपडे देण्याचा कार्यक्रम राबविण्यात आला. येत्या काही दिवसात सफाई कर्मचाऱ्यांच्या मुलांना आणि अनाथ मुलांना मदत करण्याचा मानस विद्यार्थ्यांचा आहे.

मराठीतील सर्व कॅम्पसकट्टा ( Campuskatta ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: College festivals dhoom

ताज्या बातम्या