सध्या अभियांत्रिकी अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. ही प्रवेश प्रक्रिया कशी आहे, कोणते टप्पे असतील, शाखा कशी निवडावी, याबाबतचे मार्गदर्शन या लेखांच्या माध्यमातून मिळणार आहे. ही प्रवेश प्रक्रिया सुरू कशी झाली आणि कशी बदलत गेली त्यापासून या प्रवासाची ओळख करून घेणार आहोत प्रा. अभय अभ्यंकर यांच्याकडून..

आपल्याला आता आपण दिलेल्या पसंतीनुसार एका महाविद्यालयात प्रवेश मिळालेला असेल. अनेक तास वाट पाहून मिळालेला हा आनंद खचितच महत्त्वाचा आहे. यामुळे आपण आता अभियंता होणार हेसुद्धा नक्की झाले आहे. असे असतानाही या लेखाचे प्रयोजन काय?.. आपण एकदा मागे वळून पाहू. सामाईक प्रवेश परीक्षेचा (सीईटी) निकाल लागला तो दिवस. या वर्षी निकाल फारसा बरा लागला नाही आणि त्यामुळे कटऑफ खाली येणार अशी वदंता घेऊन आपण खूश झालो. परंतु, जरी १५० गुणांकरिता ३०० विद्यार्थी आणि १०० गुणांवरील सुमारे ३००० विद्यार्थी या प्रवेशप्रक्रियेमध्ये सहभागी झाले नाहीत तरी यावर्षी गुणानुक्रमाप्रमाणे (मेरीट) कट ऑफ वर गेले. जर आपण गेल्या वर्षीचे कट ऑफ गुणानुक्रमानुसार पाहिले तर सीओईपीपासून सर्व सरकारी आणि खासगी महाविद्यालयात साधारण असेच चित्र आहे.

प्रथम फेरीत काही मोजके विद्यार्थी प्रवेश ‘फ्रीज’ करतील. मात्र आज बहुतांश विद्यार्थ्यांचा कल हा प्रथम फेरीत मिळालेल्या प्रवेशासाठी ‘फ्लोट’ किंवा ‘स्लाईड’ यांपैकी पर्याय वापरून पुढील फेरीत जाण्याकडे राहील, ते योग्यही असेल. जर आपण फ्लोट किंवा स्लाईड पर्याय निवडला आणि पुढील फेरीत आपण दिलेल्या पर्यायांपैकी आधीच पर्याय मिळाला तर आता मिळालेली जागा जाऊन आपल्याला ती नवीन जागा मिळेल. मात्र महाविद्यालयांचे पसंतीक्रम देताना मिळालेल्या महाविद्यालयाच्या वरचे पर्याय आता नकोसे वाटत असतील, तर ‘फ्रीज’ पर्याय निवडण्याशिवाय पर्याय नाही.

हा सर्व विचार करताना पुढील फेरीत किती जागा उपलब्ध असतील, हे पाहणे महत्त्वाचे आहे. दुसऱ्या फेरीनंतरच्या जागा वाटपामध्ये आपल्याला फारसा फायदा होणार नाही. तिसरी फेरी मात्र निर्णायक ठरेल. त्या वेळी रिकाम्या जागा वाढतील. मात्र, शेवटच्या फेरीत अचानक चांगला पर्याय मिळू शकतो, असे कुणाकडून ऐकले असल्यास त्यावर अवलंबून राहू नका. आपल्याला कदाचित आपल्या पर्यायाच्या क्रमात एक-दोन जागा पुढे जाणे शक्य होईल, पण त्याची खात्री देता येत नाही. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण प्रथम फेरीमध्ये दिलेले पर्याय बदलू शकतो. नवीन पर्याय टाकू शकतो. पर्याय काढून टाकू शकतो त्याचप्रमाणे खालील पर्याय वर घेऊ शकतो. अर्थात, आपल्याला आधी जो पर्याय मिळाला आहे आणि ज्याला आपण फ्लोट किंवा स्लाईड केले आहे, तो मात्र या नवीन पर्यायाच्या यादीमध्ये राहतो आणि तो कायमच शेवटचा पर्याय म्हणून असतो. पर्याय क्रम बदलावा का? या प्रश्नाचे उत्तर देणे फार अवघड आहे. परंतु, जर नवीन यादी करणार असाल तरी परत या वर्षीच्या प्रथम फेरीचे कट ऑफ आणि रिकाम्या जागा या दोन्हींचा नीट अभ्यास करा. जर आपल्याला कोणताच पर्याय मिळाला नसेल तर मात्र अतिशय काळजीपूर्वक पर्याय देणे आवश्यक आहे. आपल्याला प्रवेश नक्की मिळेल परंतु कट ऑफ प्रथम फेरीपेक्षा दुसऱ्या फेरीत खाली येतील असे गृहीत धरू नका. कट ऑफ तिसऱ्या फेरीत थोडेसे खाली येऊ शकतील.

चौथी फेरी ही फक्त सरकारी व अनुदानित महाविद्यालयांसाठी आहे. परंतु, तिसऱ्या फेरीमध्ये मिळालेल्या महाविद्यालयात प्रवेश निश्चित करावा. (महाविद्यालयात प्रवेश निश्चित करण्यासाठी २५ ते २९ जुलै हा कालावधी आहे.) आणि त्यानंतर चौथ्या फेरीत भाग घ्यावा. अर्थात ज्यांचा प्रवेश अगदी थोडक्यात चुकला असेल त्यांनी हा प्रयत्न करावा. ही फेरी ३१ जुलै ते १ ऑगस्ट होणार आहे. या फेरीसाठीच्या रिकाम्या जागा ३१ जुलै रोजी जाहीर होतील. यानंतर प्रश्न येतो की विना-अनुदानित खासगी महाविद्यालयांमध्ये ज्या जागा रिकाम्या राहतील त्यांचे काय? या जागा भरण्याचा अधिकार त्या त्या महाविद्यालयांना दिलेला असतो. प्रवेशाची अंतिम तारीख १४ ऑगस्ट आहे. त्या तारखेनंतर कोणत्याही विद्यार्थ्यांला प्रवेश मिळणार नाही.

प्रथम फेरीबद्दल काही निरीक्षणे व कारणे

गेल्या वर्षीपेक्षा कट ऑफ मेरिट वाढले, कारण अखिल भारतीय जेईई परीक्षेतील गुणानुसार जागा धरल्या गेल्या, ज्या गेल्या वर्षी सीईटीनुसार भरल्या गेल्या होत्या. गेल्या वर्षीप्रमाणेच यंत्र व संगणक शाखांकडे अनेक विद्यार्थ्यांचा ओढा दिसून येतो. या शाखांसाठी असलेला ओढा केवळ मूलभूत शाखा आणि करिअरमधील विविध संधी या दोन कारणांसाठी आहे, तर संगणक शाखेला चांगली नोकरी आणि इंटरनेटमधील प्रगती या कारणांसाठी असावी. एकूणच आवड कशात आहे याचा निर्णय न घेता आल्यामुळे बहुसंख्या विद्यार्थी या दोन शाखा निवडताना दिसतात. परंतु बाकी शाखा मात्र आवड जाणून अथवा भावी संधीचा विचार व मार्गदर्शन लाभल्यामुळे घेतल्या जात आहेत. अनेक विद्यार्थ्यांना प्रथम फेरीत कोणताही पर्याय मिळाला नाही अथवा अपेक्षेपेक्षा फारच खालचा पर्याय मिळाला असेल, तर त्याचे कारण चुकीचे आणि कमी पर्याय भरणे हे असण्याची शक्यता अधिक आहे. त्यांना गेल्या वर्षीचे कट ऑफ समजले नाहीत. त्यांनी स्टेट मेरिट क्रमांकाऐवजी स्वत:चा चुकीचा म्हणजेच स्वत:च्या विद्यापीठातील अथवा कॅटेगरीचा मेरिट क्रमांक पाहून पर्याय निवडला असण्याचीही शक्यता आहे.