scorecardresearch

माध्यम महोत्सवातून ‘नेतृत्वतलाश’

‘डिजिटल वर्ल्ड’ या संकल्पनेला ये दुनिया मायाजाल अशा आकर्षक घोषवाक्याची जोड देण्यात आली आहे.

माध्यम महोत्सवातून ‘नेतृत्वतलाश’

राजकीय, सामाजिक आणि आर्थिक नेतृत्वाची बिजे महविद्यालयीन जीवनातच पेरली जातात. हे बीज सकस पद्धतीने रोवल्यास त्याचे एका मोठय़ा वृक्षात रूपांतर होऊन पुढे देशाला विविध क्षेत्रात भक्कम नेतृत्व मिळू शकते. मुंबईत विविध महाविद्यालयांचे महोत्सव येऊ  घातले आहेत. परीक्षांना सोमोरे जाऊन विद्यार्थी महोत्सवांच्या तयारीला लागले आहेत. त्यांचा या तन-मन-धन ओतून काम करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या धडपडीविषयी आणि येऊ  घातलेल्या महोत्सवांविषयी..

माध्यम महोत्सव

गेल्या पाच वर्षांपासून ‘चित्रशताब्दी’, ‘माध्यमांची जत्रा’, ‘बायोस्कोप’, ‘माध्यमगड’, ‘पुस्तकोत्सव’ अशा नानाविध संकल्पना राबवून अल्पावधीतच यशस्वी झालेला साठय़े महाविद्यालयाचा बीएमएम विभागाचा माध्यम महोत्सव यंदाही जोशात साजरा केला जाणार आहे. यंदाचा महोत्सव हा डिजिटल चाहत्यांसाठी पर्वणी ठरणारा आहे. ‘डिजिटल वर्ल्ड’ या संकल्पनेला ये दुनिया मायाजाल अशा आकर्षक घोषवाक्याची जोड देण्यात आली आहे. डिजिटल माध्यमांचे महत्त्व अधोरेखित करणे या महोत्सव आयोजनामागील मुख्य हेतू आहे. सध्याचे युग हे डिजिटल युग असल्याने तरुण पिढी त्यामध्ये मोठय़ा प्रमाणात गुंतली आहे. त्यामुळे या विषयासंदर्भात तरुणांमधील उत्सुकता अधिक वाढविण्याकरिता निरनिराळ्या डिजिटल स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच चर्चासत्र नानाविध कार्यक्रमांचा आनंद विद्यर्थ्यांना घेता येणार आहे. १८ आणि १९ डिसेंबर या कालावधीत साजऱ्या होणाऱ्या या महोत्सवात मुंबई, मुंबई उपनगरांसह ठाणे विभागातील महाविद्यालयांना आमंत्रित करण्यात आले आहे.

तलाश

जय हिंद महाविद्यालयाचा ‘तलाश’ हा महोत्सव विद्यार्थ्यांच्या भेटीला येणार आहे. यंदा महोत्सवाचे १८ वे वर्ष असून २ ते ५ डिसेंबर या कालावधीत हा महोत्सव पार पडणार आहे. महाविद्यालयाच्या व्यापार व्यवस्थापन विभागाच्या विद्यार्थ्यांतर्फे या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सहभागी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या विकासाबरोबरच आयोजक विद्यार्थ्यांचा सर्वागीण विकास घडवणे हा या महोत्सवाचा आयोजनामागील मुख्य हेतू आहे. वेगवेगळे सामाजिक विषय हाताळणे हे ‘तलाश’चे विशेष आकर्षण असते. ‘२०१४ ते २०१६ पर्यंत रस्ते सुरक्षा’ या विषयावर तलाशच्या टीमतर्फे जनजागृती करण्यात आली आहे. याकरिता हेल्मेट्सचे वाटप, ड्राइव्ह फॉर सेफ्टी आणि रस्त्यांवर होणाऱ्या अपघातांबाबत पथनाटय़ाद्वारे जनजागृती या प्रकारच्या मोहिमा गेल्या तीन वर्षांत राबविण्यात आल्या आहेत. यंदाच्या वर्षी दिवाळीत अनाथ मुलांकरिता कलाकुसरीच्या वस्तू बनविण्याच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. हिंदी चित्रपटसृष्टीतील बडे कलाकार यंदाच्या महोत्सवात उपस्थित राहणार आहेत.

स्पोर्ट जॅम

हिवाळी हंगामात शारीरिक व्यायामाचे महत्त्व पटवून देण्यासाठी सिडनहॅम महाविद्यालयाने ‘स्पोर्ट जॅम’ या आंतरमहाविद्यालयीन महोत्सवाचे आयोजन केले आहे. महाविद्यालयाचा जिमखाना विभाग या महोत्सवाची सूत्रे हाताळणार आहे. शैक्षणिक आणि सांस्कृतिक विषयांप्रमाणे विद्यार्थ्यांमध्ये खेळाचे महत्त्व रुजविण्याचा हेतू या महोत्सवाच्या आयोजनामागील आहे. ४ आणि ५ डिसेंबर रोजी महाविद्यालयाच्या प्रांगणात हा महोत्सवातील आकर्षक खेळांच्या स्पर्धा पार पडतील. यामध्ये बुद्धिबळ, कॅरम, टेबल टेनिस, वेट लिफ्टिंग यांसारखे बंदिस्त जागेत खेळल्या जाणाऱ्या खेळांचे आणि िरग फुटबॉल, बॅटमिंटन, क्रिकेट, ट्रेजर हंट अशा मैदानी खेळांच्या स्पर्धा रंगणार आहेत. विद्यार्थ्यांबरोबरीनेच महाविद्यालयातील शिक्षकांसाठी आणि शिक्षकबाहय़ कर्मचाऱ्यांसाठीही विशेष स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे महोत्सवात सहभागी होणाऱ्या संघात एक तरी मुलगी असणे बंधनकारक राहणार आहे. खेळांमधील मुलींचा सहभाग वाढविण्याच्या हेतूने हे बंधन घालून देण्यात आले आहे. याशिवाय आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धामध्ये महाविद्यालयाचे प्रतिनिधित्व करून घवघवीत यश संपादित केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार या महोत्सवाअंती करण्यात येणार आहे.

उत्कर्ष

‘गेम ऑफ थ्रोनर्स’ या संकल्पनेवर यंदाचा ‘उत्कर्ष’ हा सोमय्या महाविद्यालयाचा वार्षिक महोत्सव बेतला आहे. आपल्या वेगवेगळ्या संकल्पनांसाठी उत्कर्ष महोत्सव ओळखला जातो. तरुणांमध्ये प्रसिद्ध असलेल्या ‘गेम ऑफ थ्रोनर्स’ या अमेरिकन टेलिव्हिजन मालिकेवर यंदाच्या महोत्सवाची संकल्पना आधारलेली आहे. त्यामुळे मालिकेमध्ये दाखविण्यात आलेल्या हाऊस या विषयावर आयोजलेल्या विविध स्पर्धा यंदाच्या महोत्सवाचे विशेष आकर्षण आहे. तसेच सादरीकरण, खेळ, साहित्य, फाइन आर्ट यांमधील विविध स्पर्धा पार पडतील. सुमारे ४२ आणि त्याहूनही अधिक महाविद्यालयांचा सहभाग यंदाच्या महोत्सवामध्ये असणार आहे. ७ ते ९ डिसेंबर या कालावधीत महोत्सवांची धामधूम सोमय्यामध्ये असणार आहे.

दालमिया लायन्स उत्सव

२८ व्या ‘दालमिया लायन्स उत्सवा’ची घोषणा दालमिया महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी केली असून २१ आणि २२ डिसेंबर रोजी मोठय़ा उत्साहात हा महोत्सव साजरा होणार आहे. ‘मुंबई : आय एम पॉसिबल’ अशी यंदाच्या महोत्सवाची संकल्पना आहे. मुंबई शहर अशी संकल्पना घेऊन शक्य तेवढय़ा नागरिकांमध्ये प्राथमिक जबाबदाऱ्यांसंबंधी जनजागृती करण्याचा विद्यार्थ्यांचा मानस आहे. महोत्सव यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे विद्यार्थी सज्ज असून गेल्या दोन महिन्यांपासून महोत्सवाच्या तयारीला सुरुवात करण्यात आली आहे. नृत्य, गायन, फॅशन शो, वेशभूषा आणि इतर कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. मुंबईतील तब्बल १२० महाविद्यालये या महोत्सवामध्ये सहभागी होणार आहेत.

मराठीतील सर्व कॅम्पसकट्टा ( Campuskatta ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Media festival collage festival

ताज्या बातम्या