scorecardresearch

राजकीय पक्षाच्या जन्माची कहाणी..

राजकीय पक्ष म्हटलं की अनेकांच्या कपाळावर आठय़ा पडतात.

राजकीय पक्षाच्या जन्माची कहाणी..

राजकीय पक्ष म्हटलं की अनेकांच्या कपाळावर आठय़ा पडतात. पण देश चालवायचा तर पक्षांशिवायही पर्याय नाही. म्हणूनच राजकीय पक्ष कार्यकुशल, संघटन, व्यवस्थापन आणि जनहित या चार सूत्रांवर बांधला गेला तर त्यात देशाची नक्कीच प्रगती साधली जाते. या पक्षनिर्मितीची ‘आभासी पद्धत’ रुईया महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी अनुभवली  त्याची ही कहाणी..

उद्योजकता ही राजकीय पक्ष स्थापन करण्यातदेखील असते. या विचारावर आधारित ‘आभासी राजकीय पक्षपद्धती’ (mock political party system) ही संकल्पना तयार करून ती कशा पद्धतीने काम करते, याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. एखाद्या व्यक्तीला त्याचा स्वत:चा राजकीय पक्ष स्थापन करताना काय अडचणी येऊ  शकतात. त्या पक्षाची धोरणे काय असावीत, याचे आभासी चित्र निर्माण केले गेले. कार्यकुशल संघटन, व्यवस्थापन, नियोजन आणि जनहित या सर्वच बाजूंचा विचार सहभागी सदस्यांना करायचा होता. या आभासी संकल्पनेत रुईया महाविद्यालय म्हणजे देश मानला गेला. यात स्पर्धकांना विविधांगी विचार करून देशासाठी राजकीय पक्षांच्या संकल्पनेतून उत्तम समाजव्यवस्था निर्माण करण्याचे दायित्व देण्यात आले होते.

आरंभास ‘गुगल फॉम्र्स’द्वारे स्पर्धकांना त्यांच्या पक्षाचे राजकीय धोरण, नियोजन आणि पक्षनेते म्हणून त्यांची कर्तव्ये या संदर्भात प्रश्न विचारण्यात आले. त्यांनी निवडलेल्या पक्षाध्यक्षांनी त्यांच्या पक्षाचे प्रमुख पदाधिकारी (सचिव आणि खजिनदार) आणि कार्यकर्ते निवडले. या वेळी चार पक्ष स्थापन करण्यात आले. त्यानंतर प्रत्येक पक्षाला त्यांचे निवडणूक चिन्ह देण्यात आले. पक्षाने निवडलेल्या चिन्हांबद्दल घोषणा बनविल्या. पक्षाचे महत्त्व, त्याची कार्यपद्धती हे जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी ठरावीक प्रचार कालावधी दिला गेला. या कालावधीत कार्यकर्त्यांनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी म्हणजे देशातील जनतेला भेडसावणाऱ्या समस्या जाणून घेतल्या. निर्माण करण्यात आलेले चार पक्षांतील विविध घटक त्या समस्या कशा प्रकारे सोडवतील, याविषयी जनतेला आश्वासने देण्यात आली.

‘आभासी राजकीय पक्षपद्धती’ची निवडणूक २१ नोव्हेंबर रोजी पार पडली. या प्रकल्पातील समिती सदस्यांनी काही प्रमुख पदे भूषवली. यात देशाचे राष्ट्रपती, सुरक्षा प्रभारी, निवडणूक निर्णय अधिकारी, मतदान केंद्र प्रतिनिधी आणि सभापती अशा पदांवर नियुक्ती करण्याची सूचना करण्यात आली. या प्रक्रियेत प्रत्येक पक्षांमधून पंतप्रधानपदासाठी उमेदवार असलेल्या सदस्यांनी तीन मिनिटे भाषण केले. या भाषणात पक्षाच्या वतीने निवडण्यात आलेला पंतप्रधानपदाचा उमेदवार पदासाठी का योग्य आहे? तो या पदाच्या माध्यमातून देशाच्या उन्नतीसाठी काय करणार आहे? त्या संदर्भात तो ज्या पक्षाचा उमेदवार म्हणून निवडणुकीसाठी रिंगणात आहे त्या पक्षाची पुढील वाटचाल काय असेल? ते याबाबत काय विचार देशातील तरुण पिढीसमोर ठेवणार आहेत, याची थोडक्यात माहिती मांडण्यात आली. यानंतर निवडणूक प्रक्रिया पार पडली. यात उपस्थित ८२ सदस्यांनी मतदान केले आणि सभापतींनी पंतप्रधान घोषित केले. त्यानंतर त्यांचा शपथविधी झाला. या पूर्ण प्रक्रियेत सर्वच विद्यार्थी कमालीच्या उत्साहाने विचार मांडत होते. या प्रक्रियेतून विद्यार्थ्यांनी पक्षस्थापनेचा अनुभव घेतला. समाजात राजकीय पक्षांचे महत्त्व अधोरेखित करणे आणि देशातील एकंदर पक्षांबद्दल असलेली लोकांची मानसिकता बदलणे हा या प्रकल्पाचा उद्देश होता.

मराठीतील सर्व कॅम्पसकट्टा ( Campuskatta ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या