काही महत्त्वाच्या महाविद्यालयांत येत्या काळात साजरे होणारे वार्षिक महोत्सव आणि विलंबाने सुरू झालेल्या परीक्षा एकाच मोसमात येत असल्याने महोत्सवाच्या तयारीवर त्याचा परिणाम होणार असल्याने महोत्सवाच्या तयारीत स्वत:ला झोकून द्यायचे की दूर उभे राहून उदासीचे गाणे गायचे, अशा द्विधा मन:स्थितीत विद्यार्थी आहेतच, पण महोत्सवाच्या काळातच परीक्षा आल्याने महोत्सवांचीच ‘परीक्षा’ असल्याचे वारे सध्या अनेक शैक्षणिक संस्थांमध्ये वाहत आहे.

या परीक्षांच्या विलंबाला कारणही तसेच आहे. ते म्हणजे ‘ऑनस्क्रीन’ मूल्यांकनातील घोळ आणि त्यामुळे निकालांना झालेला उशीर. त्यामुळे महोत्सवांच्या टप्प्यात आनंद आणि जल्लोष साजरा करण्याचे क्षण हिरावून घेतल्याची भावना सध्या विद्यार्थ्यांच्या मनात आहे.

डिसेंबरच्या दुसऱ्या आठवडय़ात महोत्सवाची रणधुमाळी सुरू होईल. त्याची तयारी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवडय़ात सुरू होते. विद्यार्थ्यांच्या उत्साहाला उधाण येते. यंदा सर्वच शाखांतील दुसऱ्या आणि शेवटच्या वर्षांला शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांना नोव्हेंबरच्या पहिल्या आठवडय़ात सुरुवात होत आहे. महोत्सवाच्या प्रारंभिक तयारीचा कालावधी वाया गेला आहे. महोत्सवासाठी पूर्ण वेळ उपलब्ध होऊ शकलेल्या पहिल्या वर्षांतील विद्यार्थी उत्साहाने परिपूर्ण असले तरी अननुभवी असतात. त्यामुळे महोत्सवाची तयारी पूर्णावस्थेत नेण्यास तितकेसे सक्षम नसतात, ही वस्तुस्थिती आहे.

महोत्सव संकल्पना, व्यवस्थापन, प्रायोजक, संकलन आणि जनसंपर्क अशा पातळ्यांवर काम करणाऱ्या विद्यार्थी गटाची निर्मितीच झालेली नाही. मुख्य आर्थिक स्रोत म्हणून प्रायोजकांकडे पाहिले जाते. मात्र परीक्षांमुळे विद्यार्थ्यांना वेळ काढणे जवळपास अशक्य होऊन बसले आहे. त्यामुळे यंदा महोत्सवांचे आर्थिक गणित सांभाळायचे कसे, हा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर उभा आहे. त्यातही महोत्सव तयारीतून शिक्षक सोडल्यास महाविद्यालय प्रशासनाने काढता पाय घेतला आहे. त्यामुळे परिस्थिती आणखीनच बिकट झाली आहे.

दिवाळी काळात बरेच प्रायोजक महोत्सवांसाठी तयार होते. मात्र परीक्षांमध्ये गुंतलेल्या विद्यार्थ्यांमुळे प्रसिद्धीसाठीचा काळ फारच कमी मिळाला आहे. त्यामुळे प्रायोजकांनी माघार घेण्यास सुरुवात केली आहे. महाविद्यालयीन स्तरावर सांस्कृतिक प्रगतीपेक्षा शैक्षणिक आघाडीवर लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे महोत्सवांच्या तयारीवर अघोषित बंदी असल्याचे काही विद्यार्थ्यांनी सांगितले. महाविद्यालयांच्या व्यवस्थापनानेच महोत्सवाचा पाठिंबा काढून घेतल्याने अनेकांचा उत्साह मावळला आहे.

या साऱ्या गोंधळात चित्रपट आणि मालिकांमधील कलाकार तरी महोत्सवांमध्ये का सहभागी होतील, असा प्रश्न आहे. पदव्युत्तर आणि काही अन्य शाखांच्या परीक्षा महोत्सवांच्या काळातच सुरू होणार आहेत. त्यामुळे विद्यार्थीच येणार नसतील तर कलाकार तरी येऊन काय करणार, हा प्रश्न आहे. कलाकारांची गर्दी ही एकच अट असते. या अटीवरच ही मंडळी महोत्सवांना हजेरी लावतात.

त्यामुळे यंदा विद्यार्थीच नाहीत तर कलाकार मंडळींचे काय, असे एकूण चित्र आहे. परीक्षाही तितक्याच महत्त्वाच्या आहेत, पण महोत्सवही महत्त्वाचा आहे. पण तयारीच नाही अशी स्थिती आहे. महाविद्यालयातील वेगवेगळे विभाग स्वतंत्र महोत्सव साजरे करतातच, पण मोठय़ा महोत्सवाचे काय, हा मुद्दा आहेच, असे मत अनेक प्राध्यापकांनी व्यक्त केले.

विलंबाने परीक्षा सुरू झाल्याने मुलांबरोबरीनेच महोत्सवाची तयारी कशी करावी या पेचात आम्ही सापडलो आहोत. एका वर्षांच्या परीक्षेनंतर तातडीने दुसऱ्या वर्षांच्या परीक्षांची तयारी सुरू होते. त्यामुळे मनुष्यबळ कमी पडणारच आहे. यंदाच्या महोत्सवासाठी फारच कमी अवधी मिळणार आहे.

प्रा. गजेंद्र देवडा, साठय़े महाविद्यालय, माध्यम विभागप्रमुख

१० डिसेंबरला परीक्षा आणि दोन दिवसांनी वार्षिक महोत्सव सुरू होत आहे. अवघ्या एका दिवसात तयारी करणे शक्य नसल्याने परीक्षांमध्ये सुट्टय़ांच्या काळात तयारी सुरू आहे. गेल्या वर्षी नोटाबंदीचा फटका बसला. यंदा मात्र परीक्षांचे कारण सांगत प्रायोजक आर्थिक पाठबळ देण्यास नकार देत आहेत.

सायली वारंग, विद्यार्थी महोत्सव समन्वयक, सिडनहॅम महाविद्यालय

 

आयआयटीच्या तंत्रमहोत्सवात शालेय विद्यार्थ्यांना संधी

रोबो आणि विविध तंत्राविष्कार यांनी रंगणाऱ्या आयआयटी मुंबईतील तंत्रमहोत्सवात यंदा विशेष आकर्षण ठरणार आहे ते नवउद्योगांच्या विश्वचषकाचे. सॅनफ्रॅन्सिस्को येथे होणाऱ्या अंतिम फे रीत भारतातून कोणता नवउद्योग सहभागी होईल त्याची निवड या तंत्रमहोत्सवात होणार आहे. विजेत्याला अंतिम फेरीत दहा लाख अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक मिळवण्याची संधी मिळणार आहे. याचबरोबर शालेय विद्यार्थ्यांच्या कल्पनांना वाव देण्यासाठी इनोव्हेशन चॅलेंजचे आयोजन करण्यात आले आहे.

देशभरातील तंत्रप्रेमींचे आकर्षण असलेल्या आयआयटी मुंबईचा तंत्रमहोत्सव २९ ते ३१ डिसेंबर या कालावधीत रंगणार आहे. यामध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही तंत्राविष्कार अनुभवण्यास मिळणार आहे. तसेच विविध स्पर्धाचेही आयोजन करण्यात आले आहे. या वर्षी शालेय विद्यार्थ्यांनाही या महोत्सवात संधी देण्यात आली आहे. दोन टप्प्यांमध्ये या विद्यार्थ्यांची स्पर्धा होणार असून इस्रो आणि नॅशनल सायन्स ऑलिम्पियाडच्या सहकार्याने ही स्पर्धा पार पडणार आहे. पहिला टप्पा २४ ते २८ नोव्हेंबर या कालावधीत विद्यार्थ्यांनी ऑनलाइन परीक्षा द्यायची आहे. ही दहा प्रश्नांची कलचाचणी असून त्यात बहुपर्यायी प्रश्न विचारण्यात येणार आहेत, तर पहिल्या टप्प्यातील १५ विद्यार्थ्यांना २९ डिसेंबर रोजी दुसऱ्या टप्प्यासाठी आयआयटी संकुलात बोलावण्यात आले आहे. त्यांची तीन तासांची परीक्षा होणार आहे. यातून विजेत्यांची निवड करण्यात येणार आहे. या स्पध्रेत सहभागी होण्यासाठी http://www.techfest.org/innovationchallenge या संकेतस्थळावर भेट द्या.

या वर्षीचा हा तंत्रमहोत्सव मेक इन इंडिया, स्टार्टअप इंडिया, डिजिटल इंडिया या उपक्रमांना प्रोत्साहन देणारा असणार आहे. तसेच यामध्ये महिला सक्षमीकरणासाठी विशेष भर देण्यात आला आहे. याअंतर्गत देशभरातील चाळीस निमशहरे, शहरे आणि गावांमध्ये ४० लाख सॅनिटरी नॅपकिन्सचे वाटप केले जाणार आहे. तसेच महिलांना स्वसंरक्षणाचे धडे देण्यासाठी विशेष कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले आहे.

विभागीय फेऱ्या

तंत्रमहोत्सवात आयोजित केल्या जाणाऱ्या विविध स्पर्धाच्या विभागीय फेऱ्या यंदा मुंबई, जयपूर, हैदराबाद, भोपाळ आणि भुवनेश्वर येथे पार पडणार आहेत. या फेऱ्यांदरम्यान सर्व विद्यार्थ्यांना विविध कार्यशाळा आणि विविध विषयांवर मार्गदर्शन करणाऱ्या व्याख्यानांचे आयोजन करण्यात येणार आहे. या स्पर्धाच्या माहितीसाठी  www.techfest.org/ca.  या संकेतस्थळावर भेट द्या.