News Flash

‘मास मीडिया’अभ्यासक्रमाविषयी..

बी. एम.एम. अर्थात मास मीडिया पदवी अभ्यासक्रम हा आव्हानात्मक आणि सृजनशीलतेला वाव देणारा अभ्यासक्रम आहे.

| July 7, 2014 01:02 am

बी. एम.एम. अर्थात मास मीडिया पदवी अभ्यासक्रम हा आव्हानात्मक आणि सृजनशीलतेला वाव देणारा अभ्यासक्रम आहे. हा बारावीनंतर तीन वर्षांचा पूर्ण वेळ अभ्यासक्रम असून तो सहा सत्रांमध्ये विभागलेला आहे. हा अभ्यासक्रम बी.एम.एम. (जाहिरात) किंवा बी.एम.एम. (पत्रकारिता)असा विषय घेऊन पूर्ण करता येतो.
एखाद्या गोष्टीचा प्रसार-प्रचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत कमीत कमी खर्चात, अतिशय परिणामकारकरीत्या करायचा असेल तर जाहिरात व त्यासाठी करायचे प्लानिंग, प्रिंटिंग, कॉपी रायटिंग आणि व्यवस्थापन करू शकणाऱ्या व्यावसायिकांची आवश्यकता असते. यात सृजनशीलतेची तसेच व्यवस्थापन कौशल्याची आवश्यकता भासते. याचाच अर्थ असा की, क्रिएटिव्ह डिझाइन्स तयार झाल्यानंतर त्याचे मीडिया प्लानिंग, छपाई, आर्थिक तरतूद, जाहिरातीचे मीडिया प्लानिंग व रिलीज
या गोष्टीही महत्त्वाच्या ठरतात.
या अभ्यासक्रमाच्या पहिल्या दोनही वर्षांच्या म्हणजेच पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या सत्राच्या परीक्षा महाविद्यालये घेतात. या अभ्यासक्रमातील जाहिरात तसेच पत्रकारितासंबंधीचे विषय शिकवण्यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांची नेमणूक केली जाते. या अभ्यासक्रमात प्रामुख्याने पुढील विषय असतात- प्रभावी संवादकौशल्य, संगणक, सामाजिकशास्त्र, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, संगणकशास्त्र, विपणन, व्यवस्थापनाचे मानसशास्त्र तसेच भाषाकौशल्यांचाही परिचय करून देण्यात येतो. चौथ्या सत्रामध्ये आधुनिक समाज, प्रसारमाध्यमे, ग्राहक, ब्रँडची उभारणी यासंबंधी सविस्तर माहिती दिली जाते.
मास मीडिया अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षांत जाहिरात अथवा पत्रकारितेत स्पेशलायझेशन करता येते. जाहिरात विषय निवडणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी या अभ्यासक्रमादरम्यान जाहिरात संस्था तसेच प्रिंटिंग प्रेस यांची क्षेत्रभेट आयोजित केली जाते. या क्षेत्रभेटींमध्ये विद्यार्थ्यांना तिथल्या कामकाजाची माहिती मिळते. या अभ्यासक्रमासंबंधित विषयांच्या चर्चासत्राचे आयोजन केले जाते. शेवटच्या सत्रात विद्यार्थ्यांना एक आपला ग्राहक निश्चित करून त्यांच्यासाठी लोगो डिझाइन, स्टेशनरी डिझाइन्स, वर्तमानपत्रासाठी जाहिरात, मासिकासाठी जाहिरात, फोल्डर, पॅकेजिंग, टीव्ही. जाहिरात बनवणे यासारख्या गोष्टी शिकाव्या लागतात. जाहिरात कॅम्पेन तयार करताना, वा दरम्यानच्या चर्चेमधून विद्यार्थ्यांना खूप काही शिकता येते. या व्यवसायाची जवळून ओळख होण्याकरता हा उपक्रम उपयुक्त ठरतो. विद्यार्थ्यांच्या प्रोजेक्टचे परीक्षण मुंबई विद्यापीठातर्फे नेमलेले बाह्य़ परीक्षक करतात. विद्यार्थ्यांना प्रकल्पासंबंधात प्रश्नही विचारले जातात.
हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना जाहिरात एजन्सीमध्ये अकाऊंट एक्झिक्युटिव्ह, मीडिया प्लानर, कॉपी रायटर, स्टुडिओ मॅनेजर, मॉडेल कोऑर्डिनेटर, फोटोग्राफर अशा विविध प्रकारच्या कामाची
संधी मिळू शकते.
अंतिम वर्षी पत्रकारितेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमादरम्यान पत्रकारितेच्या विविध अंगांची सविस्तर ओळख करून घ्यावी लागते. बातमीदारी, बातम्यांची निवड व संपादन, पेजमेकिंग यासोबतच पेपर खरेदी, प्लािनग, प्रिंटिंग, सप्लाय या सर्व गोष्टी जाणून घ्याव्या लागतात.
पाचव्या सत्रात म्हणजेच तिसऱ्या वर्षांतील पहिल्या सत्रात विद्यार्थ्यांना प्रोजेक्ट वर्कमध्ये वर्तमानपत्र बनवण्याचा अनुभव मिळतो. त्याकरता बातम्या मिळवून त्याचे संपादन करणे, पेजमेकिंग करणे आदी कामांचा प्रत्यक्ष अनुभव मिळतो. या प्रकल्पाचे परीक्षण मुंबई विद्यापीठाचे बाह्य़ परीक्षक करतात.
हे दोन्हीही विषय विद्यार्थ्यांसाठी आव्हानात्मक आहेत. यात करिअरच्या सुरुवातीला शिकाऊ उमेदवार म्हणून नोकरीची संधी मिळू शकते. बी.एम.एम. (पत्रकारिता) या विषयातील पदवीधरांना प्रसारमाध्यमांमध्ये तसेच वेगवेगळ्या प्रकाशन संस्थांमध्ये काम करण्याची संधी मिळते तर बी.एम.एम. (जाहिरात) अभ्यासक्रम पूर्ण करणारे विद्यार्थी जाहिरात संस्थांकडे वळू शकतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 7, 2014 1:02 am

Web Title: about mass media study
Next Stories
1 करिअरमंत्र
2 सैन्य परीक्षांचे प्रशिक्षण
3 कामगिरीचे व्यवस्थापन