सैनिक शाळा, सातारा येथील प्रवेश पात्रता परीक्षा
सैनिक शाळा, सातारा येथे प्रवेश पात्रता परीक्षेद्वारा ६ वी आणि ९ व्या इयत्तेमध्ये २०१३-२०१४ सत्रामध्ये प्रवेश देण्यासाठी खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक विद्यार्थी उमेदवारांकडून प्रवेश अर्ज मागविण्यात येत आहेत.
आवश्यक पात्रता : इयत्ता ६ वीत प्रवेश घेण्यासाठी अर्जदार विद्यार्थ्यांचा जन्म २ जुलै २००२ ते १ जुलै २००३ च्या दरम्यान तर ९ वीत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचा जन्म २ जुलै १९९९ ते १ जुलै २००० च्या दरम्यान झालेला असावा व अर्जदार विद्यार्थी सध्या अनुक्रमे पाचव्या व आठव्या इयत्तेत शिकत असावेत.
उपलब्ध जागांची संख्या व तपशील : सहाव्या इयत्तेसाठी प्रवेश संख्या ६० ते ६५ च्या दरम्यान असून ९ व्या इयत्तेत उपलब्ध प्रवेश संख्या पाच ते १० आहे. उपलब्ध जागांपैकी १५ टक्के जागा अनुसूचित जातीच्या, ६५ टक्के जागा अनुसूचित जमातीच्या तर २५ टक्के जागा माजी कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी राखीव आहेत.
निवड प्रक्रिया : अर्जदारांपैकी पात्रताधारक विद्यार्थ्यांना लेखी निवड परीक्षेसाठी बोलाविण्यात येईल. ही निवड परीक्षा राज्य स्तरावरील निर्धारित परीक्षा केंद्रांवर घेण्यात येईल व त्यामध्ये राज्यातील नगर, औरंगाबाद, कोल्हापूर, लातूर, मुंबई, नागपूर, पुणे व सातारा या परीक्षा केंद्रांचा समावेश असेल. इयत्ता नववीसाठीची प्रवेश परीक्षा केवळ सातारा केंद्रावरच घेण्यात येईल.
लेखी निवड परीक्षेत निर्धारित गुणांक मिळविणाऱ्या उमेदवारांना मुलाखत व शारीरिक क्षमता चाचणीसाठी बोलाविण्यात येऊन त्याआधारे त्यांना संबंधित इयत्ता व अभ्यासक्रमामध्ये प्रवेश देण्यात येईल.
अर्ज व माहितीपत्रक : अर्ज व माहितीपत्रक घरपोच हवे असल्यास सर्वसाधारण गटाच्या विद्यार्थ्यांनी ४२५ रु.चा (राखीव गटातील उमेदवारांनी २७५ रु.चा) प्राचार्य, सैनिक शाळा- सातारा यांच्या नावे असणारा व सातारा येथे देय असणारा डिमांड ड्राफ्ट विनंती अर्जासह संस्थेच्या कार्यालयात पाठवावा. अर्जदाराने माहितीपत्रक मागविताना त्यांना अपेक्षित माध्यम (मराठी व इंग्रजीचा) स्पष्ट उल्लेख करावा व विनंती अर्जासह ३०x२६ सेंटीमीटर्स आकाराचा, २० रु. चे टपाल तिकीट लावलेला कापडी लिफाफा अवश्य जोडावा.
अर्ज पाठविण्याचा पत्ता व शेवटची तारीख : विहित नमुन्यातील संपूर्ण भरलेले व आवश्यक ते कागदपत्र आणि लिफाफ्यासह असणारे अर्ज प्राचार्य, सैनिक शाळा, सातारा यांच्याकडे पाठविण्याची शेवटची तारीख १० डिसेंबर २०१२.
ज्या विद्यार्थ्यांना शालेय अभ्यासक्रमापासून सैनिकी अभ्यास करून याच क्षेत्रात आपले पुढील करिअर करायचे असेल अशांनी या संधीचा जरूर विचार करावा.             

झेवियर्स अ‍ॅप्टिटय़ूड टेस्ट
(एसएटी- २०१३)
झेवियर असोसिएशन ऑफ मॅनेजमेंट इन्स्टिटय़ूटतर्फे व्यवस्थापन क्षेत्रातील विविध पदव्युत्तर अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश देण्यासाठी घेण्यात येणाऱ्या झेवियर अ‍ॅप्टिटय़ूड टेस्ट (एसएटी-२०१३) या प्रवेशपात्रता परीक्षेसाठी खाली नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक पदवीधर विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
आवश्यक शैक्षणिक पात्रता- अर्जदार विद्यार्थ्यांनी १० जून २०१३ पर्यंत पदवी घेतलेली असावी. जे विद्यार्थी २०१२-१३ या शैक्षणिक वर्षांत पदवी परीक्षेला बसणार असतील तेसुद्धा या अभ्यासक्रम प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करू शकतात, मात्र त्यांच्या पदवी परीक्षेचा निकाल जून २०१३ पर्यंत लागायला हवा.
निवड प्रक्रिया- अर्जदारांपैकी पात्रताधारक विद्यार्थ्यांची ६ जानेवारी २०१३ रोजी राष्ट्रीय स्तरावर प्रवेश परीक्षा घेण्यात येईल. ही प्रवेश परीक्षा देशांतर्गत निवडक परीक्षा केंद्रावर घेण्यात येईल व त्यामध्ये महाराष्ट्रातील मुंबई, नागपूर व पुणे या परीक्षा केंद्राचा समावेश असेल.
प्रवेश प्रक्रिया- प्रवेश परीक्षेत प्राप्त गुणांकांच्या आधारे त्यांना झेवियर असोसिएशन ऑफ मॅनेजमेंट इन्स्टिटय़ूट्स अंतर्गत असणाऱ्या जमशेदपूर, चेन्नई, बंगळुरू, जबलपूर, मुंबई, त्रिची, तिरुवल्ला, विजयवाडा, सिकंदराबाद, मंगलोर, रांची व भुवनेश्वर इ. ठिकाणी कार्यरत असणाऱ्या संस्थांमध्ये व्यवस्थापनविषयक संबंधित पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश देण्यात येईल.
विशेष सूचना- वर नमूद केलेल्या शैक्षणिक संस्थांशिवाय विविध व्यवस्थापनविषयक शैक्षणिक संस्थांमधील पदव्युत्तर अभ्यासक्रमात प्रवेश मिळण्यासाठीसुद्धा संबंधित विद्यार्थ्यांने एसएटी-२०१३ मध्ये मिळविलेल्या गुणांकाचा उपयोग होऊ शकतो.
अर्जाची नोंदणी- अर्जाची नोंदणी करण्यासाठी अर्जदारांनी ऑनलाइन पद्धतीने ते सर्वसाधारण गटातील असल्यास ९५० रु. (राखीव गटातील उमेदवारांसाठी ६५० रु.) भरणे आवश्यक आहे. ही रक्कम संबंधित विद्यार्थी आयडीबीआय बँकेच्या कुठल्याही शाखेत रोखीने भरू शकतात अथवा वर नमूद केल्याप्रमाणे असणाऱ्या रकमेचा ‘एसएलआरआय-जमशेदपूर, अकाऊंट एसएटी’ यांच्या नावाने असणारा डिमांड ड्राफ्ट विनंती अर्जासह संस्थेच्या कार्यालयात पाठवू शकतात.
अधिक माहिती व तपशिलासाठी संपर्क- यासंदर्भात अधिक माहिती व तपशिलासाठी एसएटी ऑफिस, एसएलआरआय, सी. एच. एरिया (ईस्ट), जमशेदपूर येथे संपर्क साधावा अथवा संस्थेच्या http://www.xlni.edu या संकेतस्थळाला भेट द्यावी.
अर्ज करण्याची पद्धत व शेवटची तारीख- संगणकीय पद्धतीने संस्थेच्या  http://www.xatonline.net.in  या संकेतस्थळावर अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० नोव्हेंबर २०१२.
नव्याने पदवी घेणाऱ्या ज्या विद्यार्थ्यांना व्यवस्थापन क्षेत्रात पदव्युत्तर पात्रतेसह आपले करिअर सुरू करायचे असेल अशांना या अभ्यासक्रमाचा विचार करता येईल.