अत्यंत सर्जनशील आणि उत्तम वेतन देणाऱ्या अशा जाहिरात क्षेत्रात कामाच्या उदंड संधी निर्माण झाल्या आहेत. या क्षेत्रात स्वत:चे स्थान निर्माण करण्यासाठी तुमच्याकडे हवी केवळ अस्सल सर्जनशीलता आणि मेहनत घेण्याची अफाट क्षमता! अनेकांना खुणावत असणाऱ्या या जाहिरात क्षेत्राची कार्यपद्धती जाणून घेऊयात!
वृत्तपत्रांत, दूरचित्रवाणी वाहिन्यांवर, एफएमवर आणि अलीकडे तर चित्रपटांतूनही उत्पादनांच्या जाहिराती आपण वाचत, बघत आणि ऐकत असतो. रंजनाच्या स्वरुपात माहिती देत आपलं उत्पादन आणि सेवा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवणे हा जाहिरातीचा उद्देश असतो आणि त्यासाठी अधिकाधिक नाविन्यपूर्ण पद्धती शोधल्या जात असतात आणि
अवलंबल्या जात असतात.
आपलं उत्पादन अधिकाधिक विकलं जावं, या हेतूने अत्यंत सृजनशील पद्धतीने जाहिरात तयार केली जाते. पासष्ठावी कला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जाहिरात क्षेत्रात काम करणारी ही सारी सर्जनशील मंडळी तुमचं मन जडेल, तुम्ही लुब्ध व्हाल आणि मग ते उत्पादन हमखास विकते घ्याल यासाठी दिवसरात्र विचार करत असतात, त्या गोष्टीवर काम करत असतात.
एक जाहिरात तयार करणाऱ्या टीममध्ये चित्रकार असतात, शब्दांवर हुकूमत असलेले कॉपीरायटर असतात, स्पेस सेलिंगमध्ये तरबेज असलेली मंडळीही असतात. चित्र, शब्द, संगीत, संवाद, नाटय़ यांचा मेळ घालून साऱ्या कलाकारांचा समन्वय साधणारे दिग्दर्शकही असतात. अर्थातच जोडीला फोटोग्राफर्स, एडिटर्स, लाइटमन यांची मदत गरजेची असते. मुख्य म्हणजे लक्ष्य असलेल्या ग्राहकवर्गाची नस ओळखणारे आणि विविध माध्यमांवर होणाऱ्या खर्चाचा ताळमेळ घालणारे अनुभवी असे अकाऊंट एक्झिक्युटिव्हज् या संघाला सांभाळत असतात. अशा वेगवेगळ्या टीम्स एकाच कंपनीत वेगवेगळय़ा कंपन्यांसाठी काम करत असतात.
एखाद्या उत्पादनाची जाहिरात करायची ठरली की त्या कंपनीचा ब्रँड मॅनेजर विविध जाहिरात कंपन्यांना त्यांच्या कल्पना सादर करण्याचे निमंत्रण देतात आणि मग जाहिरात कंपन्या कामाला लागतात. जाहिरात कोणासाठी, वयोगट कोणता, ती कुठे पाहिली, वाचली जाईल याचे सर्वेक्षण सुरू होते. त्यानुसार चित्रकार कामाला लागतात. मॉडेल्सकडून विविध फोटोशूट करून होते. कॉपीरायटर ती संकल्पना मोजक्या, नेमक्या शब्दांत मांडतात. प्रिंट, डिजीटल मीडिया, होर्डिग्ज, जिंगल्स या प्रत्येक माध्यमाची शक्तिस्थाने वेगळी आणि काम करण्याची पद्धतही वेगळी असते. अशा विविध पद्धतींचा समन्वय साधत एक जाहिरात तयार होऊ लागते.
अनेकांच्या सर्जनशील संकल्पनांचा मेळ साधत तयार झालेली जाहिरात उत्पादक कंपनीचे मालक, ब्रँड मॅनेजर, मार्केटिंग मॅनेजर, सेल्स मॅनेजर यांच्यासमोर सादर केली जाते. त्यांच्या मान्यतेनंतरच त्या  जाहिरातीवर शिक्कामोर्तब होते आणि मग ती आपल्यापर्यंत पोहोचते.
आवश्यक कौशल्ये
जाहिरात क्षेत्राच्या या कार्यपद्धतीतून तुम्हाला यांतील प्रत्येक कामात आवश्यक ठरणाऱ्या कौशल्यांचा अंदाज आला असेल. जर तुम्हांला हे सर्जनशील क्षेत्र खुणावत असेल, तर त्यात प्रवेश करण्याचा गांभीर्याने विचार करायला हवा. या क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी हुन्नर असणे महत्त्वाचे. कौशल्य, अॅटिटय़ूड, तडफ, जिद्द, सातत्य या साऱ्यांचे एकत्रित मिश्रण या हुन्नर शब्दातून नेमके पोहोचते. निव्वळ क्रिएटिव्ह आर्टिस्ट नको, निव्वळ छान शब्दांची गुंफण करणारा कॉपी रायटर नको. मग कसा हवा? अनेकदा वाचलेल्या, ऐकलेल्या, पाहिलेल्या जाहिराती.. दीर्घकाळ आपल्या मनात रेंगाळत राहतात. त्याचे श्रेय त्यासाठी काम करणारा चित्रकार, कॉपीरायटर, लहानशा गोष्टी नजाकतीने कॅमेरात पकडणारा कॅमेरामन व त्याला मार्गदर्शन करणारा दिग्दर्शक यांना असते.
अत्यंत मोजक्या शब्दांत अथवा अत्यंत कमी वेळात व्हिज्युअल इफेक्ट साधणाऱ्या जाहिरातींच्या या निर्मिती क्षेत्रात आज प्रशिक्षणाच्या अनेक संधी उपलब्ध आहेत.
जाहिरात क्षेत्रात करिअर करण्यासाठी कमर्शियल आर्टिस्टचा रीतसर अभ्यासक्रम पूर्ण करावा लागतो. पदवी घेऊन या क्षेत्रातील कारकिर्दीला सुरुवात करता येते. भाषेची मनापासून आवड असेल, चटपटीत शब्दांत संकल्पनेची मांडणी करता येत असेल, शब्दांशी खेळायला आवडत असेल तर भाषा विषयात पदवी संपादन केलेले विद्यार्थी या क्षेत्रात कॉपीरायटर म्हणून येऊ शकतात. मास कम्युनिकेशनची पदवी वा पदव्युत्तर अभ्यासक्रम केलेल्यांना इथे विविध कामांत सामावून घेतले जाते. कॅमेरा, सिनेमॅटोग्राफी, संवाद, एडिटिंग इत्यादी कार्यक्षेत्रांतील संधी त्यांना खुल्या असतात.
स्पेस सेलिंगकरता वृत्तपत्रे तसेच इतर माध्यमांत स्वतंत्र विभाग कार्यरत असतात तर जाहिरात कंपन्यांमध्येही या कामाकरता विशेष विभाग असतो. या कामासाठी मार्केटिंगमध्ये एमबीए झालेल्या व्यक्तींचा विचार केला जातो. प्रामुख्याने वाणिज्य शाखेतील पदवीधर यांत सामावतात.
अकाऊंट एक्झिक्युटिव्ह या पदासाठी तीव्र स्पर्धा असते. उत्कृष्ट संस्थेतील एम.बी.ए., निव्वळ जाहिरातींच्या संदर्भात प्रशिक्षण देणाऱ्या अव्वल संस्थांतील एमबीए, एशियन स्कूल किंवा लिबरल आर्टस् मधील प्रशिक्षित उमेदवारांचा पुरेशा अनुभवानंतर या पदासाठी विचार केला जातो.
आज या क्षेत्रात बहुराष्ट्रीय कंपन्यांनी आपले बस्तान चांगलेच बसवले आहे.  त्यामुळे एका अर्थाने या क्षेत्रातील संधी आणि वेतनही वधारले आहे. मेहनत आणि हुशारीच्या जोरावर या क्षेत्रात मुसंडी मारण्यास उत्सुक असणाऱ्या उमेदवारांना आज या क्षेत्रात कित्येक संधी उपलब्ध आहेत. त्यामुळे कामाची सुरुवात एखाद्या लहानशा कंपनीत करूनही अल्पावधीत तुम्ही नामवंत कंपनीपर्यंत पोहोचू शकता.
 आजची जीवनशैली आणि वेगाने वाढणारा नवमध्यमवर्ग यामुळे या क्षेत्राला बरकत येणे स्वाभाविक आहे. अत्यंत सर्जनशील आणि उत्तम वेतन देणाऱ्या या जाहिरात क्षेत्रात आगामी वर्षांत उदंड संधी उपलब्ध असतील. या क्षेत्रात स्वत:चं स्थान निर्माण करण्यासाठी तुमच्याकडे हवी केवळ अस्सल सर्जनशीलता आणि मेहनत घेण्याची अफाट क्षमता!

port at vadhvan, vadhvan,
वाढवण येथील पर्यावरणस्नेही बंदराचा मार्ग मोकळा
Simran Thorat first woman merchant navy officer
शिक्षणासाठी पालकांनी जमीन विकली, पुण्याच्या सिमरन थोरातने मर्चंट नेव्ही क्षेत्रात मिळला ‘हा’ बहुमान
Loksatta kutuhal Limitations of learning
कुतूहल: सखोल शिक्षणाच्या मर्यादा
lokrang, shekhar rajeshirke, documentary making, journey, for, nature documentaries, family contribution,
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: माहितीपटांचा गृहोद्योग…