|| योगेश बोराटे

संस्थेची ओळख

तामिळनाडूतील कराईकुडी येथे वसलेले हे विद्यापीठ ओळखले जाते ते ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. आर. एम. अलगप्पा चेट्टियार यांच्या नावाने. त्यांनी सुरू केलेल्या शैक्षणिक संस्थेच्या पायावरच तमिळनाडू सरकारने १९८५ मध्ये अलगप्पा विद्यापीठाची स्थापना केली. मे, २०१७मध्ये ‘नॅकचे ए +’ मानांकन मिळवणारे तमिळनाडू राज्यातील हे एकमेव विद्यापीठ ठरले. यंदा वर्षांच्या सुरुवातीलाच या विद्यापीठाला स्वायत्त विद्यापीठाचा दर्जा मिळाला. यंदाच्या ‘एनआयआरएफ’च्या मानांकनामध्येही हे विद्यापीठ देशात २७व्या स्थानी आहे. २०१७ साली याच मानांकनात विद्यापीठ ९७व्या स्थानावर होते. म्हणजेच तब्बल ७० विद्यापीठांना मागे टाकत अलगप्पाने ही उसळी घेतली आहे. एनआयआरएफच्या मानांकनामध्ये विद्यापीठाने केलेल्या सुधारणेवरूनच या विद्यापीठाची प्रगती लक्षात येऊ शकते. विद्यापीठाच्या याच कामगिरीच्या आधारावर हे विद्यापीठ राष्ट्रीय उच्च शिक्षण अभियान योजनेंतर्गत १०० कोटींचे अनुदान मिळविण्यास पात्र ठरले आहे.

संकुले आणि सुविधा

कराईकुडी येथे वसलेल्या विद्यापीठाच्या साडेचारशे एकरांच्या निसर्गरम्य परिसरात विद्यापीठाचे विविध शैक्षणिक अभ्यासक्रम चालतात. विद्यापीठात ३९ विभाग, ९ स्वतंत्र केंद्रे आणि २ घटक महाविद्यालये आहेत. तामिळनाडूच्या शिवगंगा व रामनाथपुरम या जिल्ह्यांमधील चाळीसहून अधिक महाविद्यालये या विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रामध्ये येतात. विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थासाठी विद्यापीठ परिसरातच सर्व सोयींनी युक्तवसतिगृहे उभारण्यात आली आहेत. या १५वसतिगृहांमध्ये चारशेहून अधिक उपलब्ध खोल्यांमधून जवळपास बाराशे विद्यार्थ्यांच्या निवासाची सुविधा विद्यापीठाने विकसित केली आहे. वसतिगृहातील भोजन सुविधा ही विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींच्या निगराणीखाली चालते. वसतिगृहापासून विभागांपर्यंत जाण्यासाठी वाहतूक व्यवस्थाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. विद्यापीठाने कराईकुडीमधील मुख्य संकुलापासून जवळपास ६० किलोमीटर अंतरावर असणाऱ्या थोंडी येथे १३ एकरांमध्ये एक सॅटेलाइट कॅम्पसही सुरू केला आहे. थोंडी येथील संकुलामधून डिपार्टमेंट ऑफ ओशनोग्राफी अ‍ॅण्ड कोस्टल एरिया स्टडीजचे काम चालते.

विभाग आणि अभ्यासक्रम

सामाजिक तसेच औद्योगिक गरजा ओळखून विद्यापीठाने त्या त्या वेळी अभ्यासक्रमांमध्ये आवश्यक ते बदल केले आहेत. तसेच गरजेनुसार काही नव्या अभ्यासक्रमांचा समावेशही केला आहे. कला विद्याशाखेअंतर्गत विविध भाषा विभाग आहेत. यात डिपार्टमेंट ऑफ तमिळ, सेंटर फॉर तमिळ कल्चर, डिपार्टमेंट ऑफ इंग्लिश अ‍ॅण्ड फॉरेन लँग्वेजेस, डिपार्टमेंट ऑफ फाइन आर्ट्स यांचा समावेश होतो. स्कूल ऑफ सोशल सायन्सेसच्या अंतर्गत स्त्री अभ्यास केंद्र, सोशल वर्क, इकॉनॉमिक्स अ‍ॅण्ड रुरल डेव्हलपमेंट, हिस्ट्री, डिपार्टमेंट ऑफ लायब्ररी अ‍ॅण्ड इन्फम्रेशन सायन्स या विभागांचे कामकाज चालते. विद्यापीठामध्ये विज्ञान विद्याशाखेंतर्गत मॅथेमॅटिकल सायन्सेस, फिजिकल सायन्सेस, केमिकल सायन्सेस, कॉम्प्युटेशनल सायन्सेस, बायोलॉजिकल सायन्सेस व स्कूल ऑफ मरिन सायन्स या उपशाखांचा समावेश होतो. मॅथेमॅटिकल सायन्स विभागात डिपार्टमेंट ऑफ मॅथेमॅटिक्स आणि रामानुजन सेंटर ऑफ हायर मॅथेमॅटिक्स या केंद्रांचा समावेश आहे. फिजिकल सायन्सेअंतर्गत डिपार्टमेंट ऑफ बायोइलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड बायोसेन्सर्स हा एक वेगळा विभागही चालतो. केमिकल सायन्सेसअंतर्गत विद्यापीठाने विद्यार्थ्यांसाठी डिपार्टमेंट ऑफ एनर्जी सायन्सेस विभागांतर्गत वेगळे अभ्यासक्रम उपलब्ध करून दिले आहेत. कॉम्प्युटेशनल सायन्सेसमध्ये कॉम्प्युटेशनल लॉजिस्टिक्स नव्या विषयाचे अध्ययन करण्याची सुविधा विद्यापीठाने विकसित केली आहे. बायोलॉजिकल सायन्सेस उपशाखेंतर्गत बायोटेक्नॉलॉजी, अ‍ॅनिमल हेल्थ अ‍ॅण्ड मॅनेजमेंट, बायोइन्फॉमेटिक्स, बॉटनी, मायक्रोबायोलॉजी व बायोमेडिकल सायन्सेस या विषयांना वाहिलेले स्वतंत्र विभाग चालविले जातात. थोंडी येथील संकुलामध्ये स्कूल ऑफ मरिन सायन्सअंतर्गत ओशनोग्राफी अ‍ॅण्ड कोस्टल एरिया स्टडीजचा स्वतंत्र विभाग चालतो. जैविक व अजैविक स्रोत म्हणून सगळ्या जगाचे लक्ष आता महासागरांकडे वळले आहे. भारताला तिन्ही बाजूंनी समुद्रकिनारा लाभला आहे. सागरी संपदेचे रक्षण, तसेच अशा स्रोतांचा सुयोग्य वापर करण्यासाठी संशोधन, तंत्रज्ञान व उद्योग क्षेत्रात कुशल मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याच्या हेतूने या विभागाची स्थापना झाली आहे. व्यवस्थापनशास्त्र विद्याशाखेंतर्गत अलगप्पा इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट, डिपार्टमेंट ऑफ लॉजिस्टिक्स मॅनेजमेंट, डिपार्टमेंट ऑफ इंटरनॅशनल बिझनेस, डिपार्टमेंट ऑफ कॉमर्स, डिपार्टमेंट ऑफ कॉर्पोरेट सेक्रेटरिशिप, डिपार्टमेंट ऑफ बँकिंग मॅनेजमेंट, डिपार्टमेंट ऑफ टुरिझम अ‍ॅण्ड हॉटेल मॅनेजमेंट या विभागांमधून विद्यार्थ्यांना विविध अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यात आले आहेत. विद्यापीठाने १९९२ साली दूरशिक्षणासाठी म्हणून डिरेक्टोरेट ऑफ डिस्टन्स एज्युकेशन विभागाची सुरुवात केली. त्याअंतर्गत कला, शास्त्र, शिक्षणशास्त्र व व्यवस्थापन या शाखांधील पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम चालविले जातात. नावीन्यपूर्ण, रोजगारक्षम, सामाजिक संदर्भ असलेले अभ्यासक्रम हे या अभ्यासक्रमांचे वैशिष्टय़ं म्हणून विचारात घेतले जाते. अद्ययावत तंत्रज्ञानाचा खुबीने वापर करून विद्यापीठाने हे अभ्यासक्रम विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठीची यंत्रणा विकसित केली आहे. एसएमएस अलर्ट, विद्यार्थाचे ऑनलाइन प्रोफाइल, मोबाइल लìनग सुविधा ही त्यापकी काही उदाहरणे ठरतात. चीन, मलेशिया, वेस्ट इंडिज, अमेरिका, दक्षिण कोरिया आदी देशांमधील काही विद्यापीठांसोबत या विद्यापीठाने सामंजस्य करार केले आहेत. तसेच, विद्यापीठाने परदेशी विद्यार्थ्यांसाठीही खास वैशिष्टय़पूर्ण अभ्यासक्रम विकसित केले आहेत.

borateys@gmail.com