अमेरिकेच्या फ्लोरिडा इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीच्या सुवर्णमहोत्सवी वर्षांनिमित्त जगभरातील गुणवान विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण मिळावे याकरता १.५ दशलक्ष डॉलर किमतीच्या वार्षिक शिष्यवृत्त्या देण्याचे या विद्यापीठाने घोषित केले आहे.
याअंतर्गत अलीकडेच दिल्लीस्थित भविता चौहान आणि गीतिका चौहान या दोन भारतीय विद्यार्थिनींना या मानाच्या शिष्यवृत्ती मिळाल्या. दोघीही या विद्यापीठात बॅचलर ऑफ सायन्स इन कॉम्प्युटर सायन्स शिकत आहेत. या विद्यापीठात २००हून अधिक भारतीय विद्यार्थी शिकत असून शिकणारे सर्वाधिक विद्यार्थी असलेल्या पहिल्या पाच देशांमध्ये भारताचा समावेश होतो. या विद्यापीठात २००हून अधिक पदवी, पदव्युत्तर आणि डॉक्टरल अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. या अभ्यासक्रमांची आणि त्याकरता उपलब्ध असलेल्या शिष्यवृत्तींची माहिती देण्यासाठी विद्यापीठाच्या इंटरनॅशनल रिक्रुटमेंट विभागाच्या असोसिएट डायरेक्टर सारा नोप्पेन यांनी मुंबई आणि दिल्लीसह भारतातील विविध शहरांना भेट दिली. विद्यापीठाच्या उपलब्ध शिष्यवृत्तींसाठी http://scholarship.fiu.edu या वेबसाइटला भेट द्यावी.