16 January 2021

News Flash

सैन्यदलातील संधी

ऑगस्ट महिन्यात होणाऱ्या नॅशनल डिफेन्स अ‍ॅकेडमी आणि नेव्हल अ‍ॅकेडमी परीक्षेचे अर्ज आज ३ जूनपर्यंत भरता येतील. उमेदवारांची अर्हता, परीक्षेचे स्वरूप, अभ्यास कसा करावा, आणि त्यानंतर

| June 3, 2013 02:57 am

ऑगस्ट महिन्यात होणाऱ्या नॅशनल डिफेन्स अ‍ॅकेडमी आणि नेव्हल अ‍ॅकेडमी परीक्षेचे अर्ज आज ३ जूनपर्यंत भरता येतील. उमेदवारांची अर्हता, परीक्षेचे स्वरूप, अभ्यास कसा करावा, आणि त्यानंतर उपलब्ध होणारी संधी याविषयीचे मार्गदर्शन-
भा रतीय सैन्यदलातील अधिकारीपदासाठी सर्वोत्तम प्रशिक्षण संस्थांपैकी एक असलेल्या नॅशनल डिफेन्स अ‍ॅकेडमी आणि नेव्हल अ‍ॅकेडमीच्या प्रवेशपरीक्षेसाठी पात्र उमेदवारांकडून केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. आज – ३ जून ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. ही परीक्षा ११ ऑगस्ट २०१३ रोजी घेण्यात येणार असून यासाठी राज्यात मुंबई व नागपूर ही दोन केंद्रे आहेत.
नेव्हल अ‍ॅकेडमीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना चार वर्षांसाठी इंडियन नेव्हल अ‍ॅकॅडमी, एझिमाला, केरळ येथे प्रशिक्षणासाठी पाठवले जाते. येथून प्रशिक्षण पूर्ण केलेल्या १०+२ कॅडेट एन्ट्री स्कीमच्या कॅडेटस्ना बी.टेक्. पदवी बहाल केली जाते. नॅशनल डिफेन्स अ‍ॅकेडमी (खडकवासला, पुणे)चा प्रशिक्षण कालावधी तीन वर्षांचा असतो. येथून प्रशिक्षण पूर्ण केलेल्या आर्मीच्या कॅडेट्सना इंडियन मिलिटरी अ‍ॅकेडमी, देहराडून येथे एअर फोर्सच्या कॅडेट्सने एअर फोर्स अ‍ॅकेडमी, हैदराबाद तर नौदलाच्या कॅडेट्सना इंडियन नेव्हल अ‍ॅकेडमी, एझिमाला येथे पुढील प्रशिक्षणासाठी पाठवले जाते.
संबंधित अ‍ॅकेडमीतून प्रशिक्षण पूर्ण केलेले कॅडेट्स आर्मीत लेफ्टनंट किंवा नौदलात सबलेफ्टनंट किंवा हवाई दलात फ्लाइंग ऑफिसर (वैमानिक) या पदावर रुजू होतात.
उपलब्ध जागा :
एनडीए- ३०० (भूदल- १९५, नौदल- ३९, हवाई दल- ६६)
नेव्हल अ‍ॅकेडमी (१०+२ कॅडेट एन्ट्री स्कीम) : ५५
वयोमर्यादा : अविवाहित पुरुष, जन्म २ जुलै १९९५ ते १ जानेवारी १९९८ दरम्यान असावा.
शैक्षणिक पात्रता : ११ ऑगस्टच्या परीक्षेसाठी यंदा बारावीत प्रवेश घेणारे तसेच बारावीची परीक्षा दिलेले विद्यार्थी पात्र आहेत, याची नोंद घ्यावी.
नॅशनल डिफेन्स अ‍ॅकेडमीच्या भूदल शाखेसाठी १०+२ पॅटर्ननुसार कोणत्याही शाखेतून (कला, विज्ञान, वाणिज्य) बारावी उत्तीर्ण.
नॅशनल डिफेन्स अ‍ॅकेडमीच्या हवाईदल आणि नौदल शाखेसाठी तसेच नेव्हल अ‍ॅकेडमीच्या १०+२ पॅटर्ननुसार बारावीला गणित, भौतिकशास्त्र हे विषय आवश्यक.
परीक्षा शुल्क : अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीतील उमेदवारांना अर्ज करण्यासाठी शुल्कमाफी आहे. इतर सर्व उमेदवारांसाठी फी रु. १००/- स्टेट बँक अफ इंडियाच्या कुठल्याही शाखेत रोख किंवा स्टेट बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ बिकानेर आणि जयपूर, स्टेट बँक ऑफ हैदराबाद, स्टेट बँक ऑफ म्हैसूर, स्टेट बँक ऑफ पतियाला, स्टेट बँक ऑफ त्रावनकोरची नेट बँकिंग सुविधा वापरून किंवा व्हिसा, मास्टर, क्रेडिट, डेबिट कार्ड वापरून भरायची आहे.
अर्ज करण्याची पद्धत : परीक्षेसाठी अर्ज ऑनलाइन पद्धतीने www.upsconline.nic.in या संकेतस्थळावर ३ जून २०१३ पर्यंत करता येतील.
परीक्षेचे टप्पे :
१. लेखी परीक्षा- लेखी परीक्षा बहुपर्यायी स्वरूपाची आहे. या परीक्षेसाठी विषय, वेळ आणि गुण खालीलप्रमाणे आहेत-
गणित – १२० प्रश्न, अडीच तास, गुण – ३००
सामान्य ज्ञान – १५० प्रश्न, अडीच तास, ६०० गुण
गणिताच्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न अकरावी आणि बारावीच्या (विज्ञान शाखा) अभ्यासक्रमावर आधारित असतात.
सामान्य ज्ञान या प्रश्नपत्रिकेत खालील विषय समाविष्टअसतात –
भाग १ : इंग्रजी गुण २००
या भागात उताऱ्यावरील प्रश्न, व्याकरणातील चूक ओळखणे, समानार्थी व विरुद्धार्थी शब्द ओळखणे व वाक्यातील शब्द योग्य क्रमाने लावणे इ. प्रकारचे प्रश्न विचारले जातात.
भाग २ : गुण ४००
यात पुढील विषय समाविष्ट असतात- भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, इतिहास, स्वातंत्र्य चळवळ इ., भूगोल, चालू घडामोडी.
शास्त्र विषयांचा अभ्यास करताना मूलभूत संकल्पना समजून घेणे लाभदायक ठरते. इतिहास, स्वातंत्र्य चळवळ इ. आणि भूगोलाच्या अभ्यासासाठी एन.सी.ई.आर.टी.चे पाठय़पुस्तक अभ्यासावे. चालू घडामोडीवर आधारित प्रश्नामध्ये क्रीडा, पुरस्कार, पुस्तके, भारतीय व जागतिक राजकारणातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच पर्यावरणावर आधारित प्रश्न विचारले जातात.
भाग २ साठी असलेल्या विषयांपैकी  सर्व विभागांवर सर्वसाधारणपणे प्रत्येकी २५, १५, १०, २० आणि १० टक्के या प्रमाणात प्रश्न विचारले जातात. गणिताच्या प्रश्नपत्रिकेत व सामान्य ज्ञानाच्या प्रश्नपत्रिकेतील भाग २ मधील प्रश्न इंग्रजी व हिंदी भाषेत असतात. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी त्या प्रश्नाला असलेल्या गुणांच्या एक तृतीयांश वजा केले जातात.
दुसरा टप्पा :
सर्व्हीसेस सिलेक्शन बोर्ड मुलाखत व मेडिकल बोर्ड
लेखी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना सव्‍‌र्हिसेस सिलेक्शन बोर्ड (एसएसबी) मार्फत मुलाखतीसाठी बोलाविण्यात येते. एसएसबी मुलाखतीत उमेदवारांच्या व्यक्तिमत्त्वाचे अतिशय बारकाईने परीक्षण करण्यात येते.

भूदल व नौदलासाठी एसएसबी मुलाखत ही दोन टप्प्यांमध्ये घेतली जाते, तर हवाईदलासाठी तीन टप्प्यांत घेतली जाते. हवाईदलामधील वैमानिक निवडीचा पहिला टप्पा म्हणजे पायलट अ‍ॅप्टिटय़ूड बॅटरी टेस्ट, पुढील टप्पे- भूदल, नौदल व हवाईदलासाठी समसमान असतात.
पुढील टप्प्यांत उमेदवारांची प्राथमिक निवड चाचणी घेण्यात येते. यालाच स्क्रिनिंग टेस्ट म्हणतात. यात बुद्धिमत्ता चाचणी, दाखविलेल्या चित्रावरून गोष्ट लिहिणे व त्यावर आधारित गटचर्चेचा समावेश असतो.
या चाचणीत उत्तीर्ण झालेले उमेदवारच पुढील टप्प्यासाठी पात्र ठरतात. बाकीचे उमेदवार त्याच दिवशी घराकडे परतीचा प्रवास सुरू करतात.

शिल्लक राहिलेल्या उमेदवारांच्या पुढील चार दिवसांत मानसशास्त्रीय चाचण्या, व्यक्तिगत मुलाखत, सामूहिक चाचण्या- गटचर्चा, सांघिक नियोजन, मैदानातील सांघिक व व्यक्तिगत चाचण्या तसेच दिलेल्या विषयावर तीन मिनिटे बोलणे इ. चाचण्या होतात. पाचव्या दिवशी निकाल जाहीर केला जातो. यात उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची वैद्यकीय मंडळामार्फत वैद्यकीय चाचणी घेण्यात येते. यानंतर उमेदवारांची अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येते. या प्रकारे निवड झालेल्या उमेदवारांना संबंधित अ‍ॅकेडमीत २ जुलै २०१४ रोजी सुरू होणाऱ्या प्रशिक्षणासाठी प्रवेश दिला जाईल.
एस.एस.बी. मुलाखतीच्या वास्तव्यादरम्यान मुलांना आपापसांत बोलण्यासाठी तसेच परीक्षा घेणाऱ्या सैन्याधिकाऱ्यांशी बोलण्यासाठी इंग्रजी भाषेचा वापर करावा लागतो. येथे जे उमेदवार इंग्रजीत आपले विचार स्पष्टपणे व आत्मविश्वासाने मांडू शकतात, त्यांची अंतिम निवड होण्याची शक्यता जास्त असते. एसएसबी मुलाखतीच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांनी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या सर्वागीण विकासाकडे लक्ष द्यायला हवे. इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळवणे, नियमित व्यायाम करून आपली कार्यक्षमता वाढवणे, सांघिक खेळ खेळून नेतृत्व गुण व खिलाडूवृत्ती विकसित करणे, नियमित वृत्तपत्रे वाचणे तसेच वेळोवेळी व्यक्तिमत्त्व विकासाच्या शिबिरांत सहभागी होणे इत्यादींचा लाभ होऊ शकतो.
औरंगाबाद येथील सव्‍‌र्हिसेस प्रीपरेटरी इन्स्टिटय़ूट येथे निवड झालेले विद्यार्थी दोन वर्षे एनडीए प्रवेश परीक्षा व मुलाखतीची तयारी करतात. सातारा सैनिक स्कूल येथे सहावीपासून तर आरआयएमसी, देहरादून येथे निवड झालेले विद्यार्थी आठवीपासून एनडीएची तयारी करतात. इतर विद्यार्थी जेव्हा एनडीए लेखी परीक्षेला व मुलाखतीसाठी जातील, तेव्हा त्यांची स्पर्धा वर नमूद केलेल्या संस्थांमधील विद्यार्थ्यांशी असते. त्यामुळे इतर विद्यार्थ्यांनी एनडीए लेखी परीक्षा व मुलाखतीसाठी लवकरात लवकर तयारी सुरू केल्यास एनडीएमध्ये प्रवेश मिळविण्याचे स्वप्न साध्य होऊ शकते.
सध्या शाळेत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी आतापासूनच गणित, विज्ञान, इंग्रजीच्या अभ्यासासोबतच सांघिक खेळ व व्यक्तिमत्त्व विकासाकडे लक्ष दिल्यास भविष्यातील त्यांचा एनडीएसाठीचा प्रवास सोपा होऊ शकतो.
विद्यार्थीमित्रांना सैन्यदलातील करिअरसाठी अनेक शुभेच्छा!      
harshal_aherrao@yahoo.co.in

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 3, 2013 2:57 am

Web Title: an opportunity in indian army
टॅग Indian Army,Nda
Next Stories
1 स्पर्धापरीक्षेच्या रिंगणात
2 संशोधक तुमच्या-आमच्यातला
3 तयारी एमबीएची!
Just Now!
X