prashasanयूपीएससी परीक्षेचे गुणात्मक स्वरूप समजण्याकरिता गेल्या काही वर्षांतील प्रश्नपत्रिकांचे घटकनिहाय वर्गीकरण आणि विश्लेषण आवश्यक ठरते. ते कसे करावे, याविषयी..
शैक्षणिक वाटचालीमध्ये पदवी अभ्यासक्रम शिकत असताना प्रश्नपत्रिकांच्या विश्लेषणास अभ्यासक्रमाइतके महत्त्व दिले जात नाही. खरे तर प्रश्नाभिमुख अभ्यास एका अर्थाने परीक्षाभिमुखच असतो. मर्यादित जागांसाठी घेतल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात या घटकाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. नागरी सेवा परीक्षा त्याला अपवाद नाही. त्यामुळे या परीक्षेच्या तयारीमध्ये प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण अनेक अंगांनी फायद्याचे ठरते.
वास्तविक पाहता निव्वळ अभ्यासक्रमातून नागरी सेवा परीक्षेचे स्वरूप समजून येत नाही. अभ्यासक्रम हा एक मानक (Standard) घटक असतो. त्याला वास्तवाशी जोडण्याचे कार्य प्रश्नांच्या वर्गीकरणातून पार पडते. अभ्यासक्रमाला जमिनीवर आणण्याचे, त्यास चालू घडामोडींशी जोडण्याचे काम प्रश्नांद्वारे घडत असते, म्हणूनच अभ्यासक्रमाला परीक्षेच्या दृष्टीने समजून घेण्यात मागील प्रश्नांची भूमिका मोठी असते. या परीक्षेत यश संपादन करण्यासाठी पहिला लढा प्रश्नांशी द्यावा लागतो. प्रश्न समजून घेताना त्यातील अर्थाबरोबरच प्रश्न कोणत्या बाबींवर प्रकाशझोत टाकू इच्छितात, त्यांच्या गरजा काय आहेत, हेही तपासून पाहणे अत्यावश्यक आहे. प्रश्नांचे वर्गीकरण आणि नंतर त्यांचे विश्लेषण न करताच संदर्भग्रंथ आणि वृत्तपत्राकडे वळणे म्हणजेच अभ्यासाच्या पुढील टप्प्याकडे वळणे आत्मघातकी ठरू शकते. या प्रक्रियेमध्ये अभ्यासक्रम जेव्हा प्रश्नांना जोडून पाहिला जातो, त्या वेळीच या परीक्षेचा काहीसा अंदाज यायला लागतो. किंबहुना, या परीक्षेचे खरेखुरे स्वरूपच आपल्यासमोर यायला लागते. त्यानंतरच खऱ्या अर्थाने अभ्यासाची रणनीती ठरवणे फायद्याचे ठरते. थोडक्यात, नागरी सेवा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांची सुरुवातीपासूनच प्रश्नांसोबत मत्री झाली पाहिजे.
अभ्यासाला योग्य दिशा कशी द्यावी, संदर्भग्रंथांना आणि वृत्तपत्रांना, नियतकालिकांना कसे हाताळावे, त्यावर कात्री कशी चालवावी, संदर्भसाहित्यांचे वाचन करताना कोणता भाग वगळायचा आणि कोणता नाही, याविषयीची दृष्टी या प्रक्रियेतून मिळते. कमी कालावधीमध्ये निवडक संदर्भसाहित्यामधून तयारी करण्यासाठी प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण उपयोगी पडते. थोडक्यात, फाफटपसारा टाळून संदर्भसाहित्यातील ज्या भागांवर वारंवार प्रश्न विचारले जातात, त्या भागांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी विश्लेषणाची मदत होऊ शकते.  
प्रश्नपत्रिकांच्या विश्लेषणामुळे परीक्षेचा आकृतिबंध (pattern) आपल्या लक्षात तर येतोच; त्या बरोबरीने आकृतिबंधात सातत्य आहे की ही परीक्षा दरवर्षी कात टाकीत आहे, हे समजून घेता येते. त्यातून अभ्यासाच्या पुढील वाटचालीचा मार्ग आखणे सोपे जाते. प्रश्न अभ्यासक्रमावर आधारित आहेत की चालू घडामोडीवर आधारित आहेत याचा अंदाज घेता येतो. शेवटी प्रश्नपत्रिकांच्या विश्लेषणातून प्रश्न तयार करणाऱ्यांच्या तर्कापर्यंत पोहोचता येते; ज्याद्वारे चालू वर्षी कोणत्या घडामोडीवर आणि काय पद्धतीने प्रश्न विचारले जाऊ शकतात या विषयीचा अंदाज बांधता येऊ शकतो.
विद्यार्थ्यांनी बाजारातील कोणतेही तयार (readymade) वर्गीकरण आणि विश्लेषण केलेले प्रश्नसंच घेऊ नयेत, अन्यथा प्रश्नांसोबतचा प्रवास आपण हरवून बसू शकतो. त्यामुळे प्रश्नांसोबत होणारी आपली संवादप्रक्रिया थांबते. अभ्यासक्रम आणि त्यावरील प्रश्नांचे आकलन यातील अंतर वाढायला लागते. परिणामी, प्रश्न अधिक बोजड वाटू लागतात. अभ्यासक्रम आणि प्रश्न यांच्यातील अंतर कमी केल्याशिवाय या परीक्षेचे चित्र स्पष्ट होत नाही. त्यामुळे ही प्रक्रिया स्वत: राबवणे अधिक उपयुक्त ठरते.
त्यादृष्टीने सर्वप्रथम, यूपीएससीच्या वेबसाइटवरून मुख्य परीक्षेच्या मागील सात-आठ वर्षांच्या प्रश्नपत्रिका सोबत घ्याव्यात किंवा खासगी प्रकाशनाचे प्रश्नसंच जवळ बाळगावेत. त्यानंतर अभ्यासक्रमाचे सर्वसाधारण घटक पाडून ते स्वतंत्र, कोऱ्या कागदावर वरील बाजूला शीर्षकाच्या रूपात लिहावेत. उदा. भारतीय वारसा आणि संस्कृती, भारताची घटनात्मक आणि राजकीय प्रक्रिया, भारतातील आíथक विकास इत्यादी घटकांचे शीर्षक नोंदवल्यानंतर त्याखाली संबंधित घटकांतर्गत येणाऱ्या अभ्यासक्रमात दिलेले उपघटक  लिहून काढावेत. उपघटकांच्या खाली ज्या वर्षांपासून आपण प्रश्नांचे वर्गीकरण करणार आहोत, त्या प्रश्नपत्रिकेचे वर्ष तिथे नमूद करावे. त्यानंतर त्या प्रश्नपत्रिकेतील एकेक प्रश्न उचलून त्यांच्या वर्गीकरणाला सुरुवात करावी. एका प्रश्नपत्रिकेचे वर्गीकरण करून झाले की दुसरी, नंतर तिसरी अशा क्रमाने सात-आठ वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचे वर्गीकरण करावे. अशा तऱ्हेने संपूर्ण अभ्यासक्रम सुटा सुटा होऊन त्याचे खोलवर आकलन होऊ लागते.
घटकनिहाय विश्लेषण करताना असे जाणवते की, दोन किंवा तीन घटकांचा आधार घेऊन प्रश्न विचारले गेले आहेत. त्यामुळे अभ्यास करताना आंतरविद्याशाखीय दृष्टिकोन आत्मसात करण्याची गरज असते.
घटकनिहाय प्रश्नांचे वर्गीकरण झाल्यानंतर पुढील टप्प्यावर त्यातील उपघटक किंवा प्रकरणनिहाय प्रश्नांचे वर्गीकरण करायला सुरुवात करावी. संबंधित प्रकरणे आणि त्यावर विचारले गेलेले प्रश्न यांची एकत्रित मोट बांधावी लागते. विशिष्ट प्रकरणे आणि त्यावर विचारले गेलेले प्रश्न एका ठिकाणी आणल्यानंतर त्या दोन्हीतील आंतरसंबंध तपासायला मदत होते. त्यातून प्रकरणांचे उपयोजन कसे करावे याविषयीची आपली स्वतंत्र दृष्टी विकसित होऊ लागते आणि परीक्षेचे गुणात्मक स्वरूप नजरेसमोर येऊ लागते.
प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण ही अभ्यासाबरोबर समांतरपणे चालणारी द्वंदात्मक प्रक्रिया आहे. ‘स्मार्ट वर्क’च्या नावाखाली ‘शॉर्टकट वर्क’ करण्यातून वरील प्रक्रियेचे फायदे गमावून बसण्याची वेळ आपल्यावर येऊ शकते. त्यामुळे अभ्यासक्रमाबरोबरच प्रश्नपत्रिकांच्या विश्लेषणाला महत्त्व देऊन त्यादृष्टीने नियोजन आखावे आणि अभ्यासप्रक्रियेत या विश्लेषणाचा पुरेपूर उपयोग करावा.     
admin@theuniqueacademy.com

mpsc exam preparation guidance
MPSC मंत्र : अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा – इतिहास प्रश्न विश्लेषण
Dhananjay Chandrachud
‘एआय’मुळे नैतिक, कायदेशीर, व्यावहारिक प्रश्न! आधुनिक प्रक्रियांबरोबर होणाऱ्या एकत्रीकरणाकडे सरन्यायाधीशांचा इशारा
article about upsc exam preparation guidance upsc exam preparation tips in marathi
UPSC ची तयारी : भारतीय राज्यव्यवस्था मूलभूत संकल्पना, परिशिष्टे आणि सरनामा
upsc exam preparation guidance mpsc exam preparation tips in marathi
MPSC मंत्र : सामान्य विज्ञान