विश्वासाचा नियम हा बहुधा सगळ्या मानसिक नियमांतील महत्त्वाचा नियम आहे. हा नियम असं सांगतो की, तुम्ही ज्यावर खात्रीने विश्वास ठेवता, ते तुमचे वास्तव बनते. तुम्ही जे बघता त्यावर तुम्ही विश्वास ठेवू शकत नाही. तुमचा ज्यावर आधीच विश्वास असतो, तेच तुम्ही बघता. खरे तर तुम्ही जगाकडे समजुती, दृष्टिकोन, पूर्वग्रह आणि मनात आधीच असलेल्या समजांच्या भिंगातून बघता. तुम्ही जे आहात असे तुम्हाला वाटते ते तुम्ही नसता तर तुम्ही जो विचार करता ते तुम्ही असता.
तुमच्या आयुष्यातील सगळ्या सुधारणा तुमच्याबद्दलच्या आणि तुमच्या शक्यतांबद्दलच्या समजुती बदलण्यातून उगम पावतात. तुम्ही काय करू शकता आणि तुमच्यासाठी काय शक्य आहे, याबाबतच्या समजुती बदलण्यातून तुमच्या व्यक्तिगत वाढीचा उगम होतो.
विसाव्या शतकातील मानवी क्षमतेच्या क्षेत्रातील सर्वात मोठा शोध म्हणजे बहुधा आत्मसंकल्पनेचा शोध. आयुष्यात तुम्ही जे काही करता किंवा मिळवता, तो प्रत्येक विचार, भावना किंवा कृती ही तुमच्या आत्मसंकल्पनेने नियंत्रित आणि निर्धारित केली जाते. तुमची आत्मसंकल्पना ही तुम्ही करत असलेल्या प्रत्येक गोष्टीतील तुमच्या कामगिरीची पातळी आणि परिणामकारकता ठरवते.
गोल्स – ब्रायन ट्रेसी, अनुवाद – गीतांजली गीते, साकेत प्रकाशन, पृष्ठे २५४, मूल्य – २२५.