आर्किटेक्चरमध्ये करिअर करू इच्छिणाऱ्यांना पाच वर्षे कालावधीच्या पदवी अभ्यासक्रमाव्यतिरिक्त आर्किटेक्चरल असिस्टंटशिप पदविका हा तीन वर्षे कालावधीचा अभ्यासक्रम पूर्ण करण्याचा पर्याय उपलब्ध आहे. त्याविषयी..

विज्ञान विषयासहित दहावी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांला आर्किटेक्चरल असिस्टंटशिप पदविका या एकूण सहा सत्रांमध्ये विभागलेल्या अभ्यासक्रमासाठी राज्य तंत्रशिक्षण महामंडळाने मान्यता दिलेल्या शैक्षणिक संस्थेत प्रवेश घेता येतो. या आर्किटेक्चरल असिस्टंटशिप (एए) अभ्यासक्रमाला एआयसीटीईची मान्यता असून तंत्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्यामार्फत महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण महामंडळाच्या वतीने हा अभ्यासक्रम राज्यातील अनेक केंद्रांतून चालविला आहे.

आर्किटेक्चरल असिस्टंटशिप पदविका. (एए)

शैक्षणिक अर्हता: किमान ३५ टक्के गुण मिळवून विज्ञान विषय घेऊन दहावी एस.एस.सी. परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांला त्याचा अ‍ॅप्टिटय़ूड बघून या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळू शकतो.

प्रवेश पद्धती: या अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची थेट मुलाखत घेऊन तसेच आयसीटीईच्या प्रवेश पद्धतीनुसार केंद्रीय प्रवेश पद्धतीच्या एकूण तीन फेऱ्यांमधून प्रवेश प्रक्रिया पूर्ण केली जाते. अर्थातच थेट मुलाखत ही केंद्रीय प्रवेश पद्धतीच्या प्रक्रियेनंतरच घेण्यात येते. त्याद्वारे निवडक विद्यार्थ्यांना गुणानुक्रमाप्रमाणे प्रवेश दिला जातो. तंत्रशिक्षणाचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी आवश्यक ते सर्व निकष प्रवेशाच्या वेळी सर्व शैक्षणिक संस्थांमधून लावले जातात.

‘एए’ कोणासाठी? : आर्किटेक्चरमध्ये करिअर करण्याची इच्छा आहे, परंतु शिक्षण केवळ दहावीपर्यंतच झालं आहे. त्यामुळे पदवी अभ्यासक्रमासाठी आवश्यक अर्हता नसल्यामुळे आर्किटेक्चरला प्रवेश न मिळालेले या अभ्यासक्रमाची निवड करू शकतात. ज्यांना १०+२ शिक्षणपद्धतीनुसार पाच वर्षांचा आर्किटेक्चरचा पदवी अभ्यासक्रम करण्यासाठी दहावीनंतर किमान सात वर्षे शिक्षण घ्यावं लागणार आहे, परंतु वैयक्तिक, कौटुंबिक, आर्थिक, मानसिक मर्यादा तसेच जबाबदाऱ्या या दोन्हींमुळे ते शक्य होणार नसेल; अशा विद्यार्थ्यांसाठी दहावीनंतर अवघ्या तीनच वर्षांत एकूण सहा सत्रांमध्ये परीक्षा उत्तीर्ण होऊन ‘एए’ हा अभ्यासक्रम पूर्ण करता येऊ शकतो.

प्रवेश प्रक्रियेचा प्रारंभ : दहावी एस.एस.सी. बोर्डाकडून अंतिम परीक्षेचा निकाल जाहीर केल्यावर ‘एए’ च्या प्रवेशाची प्रक्रिया सुरू होते.

अभ्यासक्रमाचा कालावधी : सहा सत्रांमध्ये विभागलेल्या ‘एए’चा अभ्यासक्रम तीन वर्षे पूर्णवेळ ‘ई’ स्कीमध्ये राबविला जातो. यामध्ये साधारणपणे विद्यार्थ्यांच्या संपर्क सत्राचे ३२ घडय़ाळी तास एका आठवडय़ामध्ये पूर्ण केले जातात. ज्यामध्ये सुमारे १३ तास थिअरी तर १९ तास प्रॅक्टिकल्स याप्रमाणे पहिल्या सत्रासाठी नियोजित केले जातात. प्रत्येक सत्रातील या तासांची विभागणी त्या त्या सत्रातील विषयानुरूप ठरविली जाते. पण एकूणच प्रॅक्टिकल्सवर जास्त भर दिला जातो.

परीक्षा पद्धती : उन्हाळी व हिवाळी अशा दोन परीक्षा महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण महामंडळाच्या परीक्षा विभागाकडून घेतल्या जातात. समसंख्येतील सत्र परीक्षा जसे २/४/६ या उन्हाळी परीक्षा म्हणून समजल्या जातात तर विषम संख्येतील सत्र परीक्षा जसे १/३/५ या हिवाळी परीक्षा म्हणून समजल्या जातात. साधारणपणे तीन ते चार आठवडय़ांमध्ये या परीक्षांचे निकाल परीक्षा विभागाकडून जाहीर केले जातात.

 ‘एए’ या अभ्यासक्रमातील विषय : सहा सत्रांमध्ये विभागलेल्या अभ्यासक्रमात प्रत्येक सत्र साधारणपणे १६ आठवडय़ांचं असतं आणि प्रथम सत्रापासून अतिशय प्राथमिक विषयांपासून अभ्यासक्रमाची सुरुवात होते. यात प्रथम सत्रासाठी- इंग्लिश, बिल्डिंग मटेरिअल्स, सव्‍‌र्हेईंग, आर्किटेक्चरल ग्राफीक भाग १, आर्किटेक्चरल ड्रॉईंग भाग-१, व्हिज्युअल ड्रॉईंग भाग-१, तसेच कॉम्प्युटर फंडामेंटल्स हे विषय असतात. दुसऱ्या सत्रात- कम्युनिकेशन स्किल्स, बिल्डिंग कन्स्ट्रक्शन, लेव्हलिंग, अप्लाईड मेकॅनिक्स, डेव्हलपमेंट ऑफ लाइफ स्किल्स भाग-१ तसेच प्रथम सत्रातील सर्व भाग-१चे विषय भाग-२मध्ये अभ्यासक्रमाचे असतात. एकूणच विद्यार्थ्यांला एखादा तज्ज्ञ आर्किटेक्टला साहाय्यक म्हणून करण्यासाठी सक्षम बनविले जाते. हा अभ्यासक्रम http://www.msbte.com. या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

‘एए’च्या माध्यमातून काय शिकाल? : आर्किटेक्चरल ग्राफिक्स या विषयांतर्गत टू डायमेन्शनल ड्रॉइंग व्हिज्युअलाइज करता येणे, निरनिराळे भौमितिक फॉम्र्स ड्रॉ करणे, आवश्यक स्केलमध्ये बसवून एखादे ऑबजेक्ट ड्रॉ करणे, आर्किटेक्चरल ड्रॉइंगच्या माध्यमातून आर. सी. सी. व लोड बेअरिंग स्ट्रक्चरमधील ड्रॉइंगच्या साह्य़ाने फरक समजू शकणे. एखाद्या लाइन ड्रॉइंग अथवा स्केच डिझाइनवरून ड्रॉइंग तयार करणे. अँथ्रोपोमेट्रीची मूलतत्त्वे आर्किटेक्चरच्या दृष्टिकोनातून शिकू शकतील. याद्वारे त्यांना ड्रॉइंग प्रेझेंटेशनची स्किल्स डेव्हलप करता येतील. निरनिराळ्या अ‍ॅक्टिव्हिटिज तसेच सक्र्युलेशन लक्षात घेऊन बबल डायग्राम तयार करण्याचे शिकू शकतील. याद्वारे आर्किटेक्चरल ड्रॉइंग तयार करण्याच्या निरनिराळ्या पद्धती समजू शकतील. परस्पेक्टिव्ह आणि सायोग्राफी अभ्यास यातून करता येईल. परस्पेक्टिव्ह ड्रॉ करण्याच्या विविध पद्धतींद्वारे त्याच्या प्रेझेंटेशन स्किल्सही ड्रॉइंग रेंडर करण्याच्या दृष्टीने शिकता येईल.

बिल्डिंग कन्स्ट्रक्शनअंतर्गत निरनिराळ्या स्टेअरकेसेस, रूफ्स, सस्पेंडेड फ्लोअर्स इत्यादींचा तांत्रिक अभ्यास याद्वारे होऊ शकतो. या सर्व गोष्टींसाठी त्यांच्या कन्स्ट्रक्शनल डिटेल्स व त्यांची ड्रॉइंग्ज तयार करता येऊ शकतात. विविध फ्लोअर वॉल फिनिशेस, साइजेस इत्यादीचा अभ्यास याद्वारे होऊ शकतो. यात बिल्डिंगच्या फाऊंडेशन, फूटिंग तसेच इतर आरसीसी स्ट्रक्चरल पार्टस्विषयी सखोल ज्ञान मिळते. याशिवाय वॉटर प्रूफिंग, डॅम्प प्रूफिंग इत्यादींच्या प्रॉपर्टीजसहित सविस्तर माहिती शिकता येते. मटेरिअल्सची स्ट्रेंथ अभ्यासण्याच्या दृष्टीने निरनिराळ्या स्ट्रक्चरल मेंबर्सचे डिझाइन करणे, स्ट्रक्चरमधील उणिवा जाणून घेणे व त्या टाळणे, सतत बदलणाऱ्या हवामानाचा स्ट्रक्चरवर तसेच त्याच्या मटेरिअलवर होणारा परिणाम अभ्यासणे. स्टील स्ट्रक्चरच्या डिझाइनसंबंधीचा तसेच स्ट्रक्चरल जॉइंट्स सखोल अभ्यास करणे. विविध प्रकारच्या स्ट्रक्चरसाठी वापरल्या जाणाऱ्या स्टीलचा साइजेस व प्रॉपर्टीजच्या दृष्टीने अभ्यास करणे.

सव्‍‌र्हे करण्याचं ज्ञान अवगत करणे, सव्‍‌र्हेसाठी वापरल्या जाणाऱ्या इन्स्ट्रमेंटची माहिती करून ती वापरणे. टाऊन प्लानिंगच्या संबंधित

 

विषयाचा अभ्यास करून विविध प्लान मंजुरीच्या नियमांचा अभ्यास करून त्याद्वारे ड्रॉइंग तयार करणे, व्यावसायिक पातळीवर ऑफिसमध्ये काम करताना पार पाडावी लागणारी विविध कार्ये शिकून अवगत करून घेणे. अशा अनेक विषयांचा अभ्यास ‘एए’च्या माध्यमातून विद्यार्थी करू शकतो.

सत्र परीक्षेच्या दृष्टीने करावा लागणारा अभ्यास : संपर्क सत्रांसाठी जास्तीत जास्त उपस्थिती तसेच प्रॅक्टिकल असाइनमेंट वेळेवर पूर्ण केल्यास केवळ थिअरीचा थोडा जास्त अभ्यास करणे आवश्यक असते. अर्थातच केवळ दहावी-एसएससीच्या शैक्षणिक अर्हतेवर या अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची पात्रता ठरवलेली असल्याने त्या विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता, आकलनशक्ती, मानसिक स्तर लक्षात घेऊन विषयांची आखणी तसेच भाषेची मांडणी केलेली आहे. त्यामुळे परीक्षेची वाट न बघता दररोज सातत्याने केलेला अभ्यास ‘एए’च्या परीक्षेसाठी पुरेसा ठरतो.

अभ्यासक्रमाद्वारे व्यावसायिक शिक्षण : प्रथम सत्रापासूनच ‘एए’च्या अभ्यासक्रमाद्वारे व्यावसायिक शिक्षण उपलब्ध केलेले आहे. जसे सव्‍‌र्हेइंग कम्युनिकेशन स्किल्स, लेव्हलिंग, डेव्हलपमेंट ऑफ लाइफ स्किल्स, प्रोफेशनल प्रॅक्टिस यांसारख्या विषयांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ते मिळत जाते.

‘एए’ नंतरचे शैक्षणिक पर्याय: आर्किटेक्चरल असिस्टंटशिपचा पदविका अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर आर्किटेक्चरच्या ‘नाटा’ अथवा एमएच-सीईटी (आर्किटेक्चर) या प्रवेश परीक्षेसाठी त्या विद्यार्थ्यांला पात्र समजले जाते. इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ आर्किटेक्ट्स यांच्यातर्फे घेतल्या जाणाऱ्या आर्किटेक्चरच्या बहिस्थ विद्यार्थी म्हणून परीक्षा देता येतात.

‘एए’नंतरचे व्यावसायिक पर्याय: हा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांला सरकारी तसेच निमसरकारी कार्यालयांमध्ये ड्राफ्टस्मन म्हणून नोकरी मिळू शकते. शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षण सेवक म्हणून काम करता येऊ शकते. अशा विद्यार्थ्यांना पी.डब्ल्यू.डी., पब्लिक हेल्थ, इरिगेशन, टाऊन प्लानिंग, पालिका कार्यालये, गृहनिर्माण संस्था, शासकीय व खासगी, तसेच आर्किटेक्ट्सच्या खासगी ऑफिसमध्ये अशा अनेक पर्यायांतून विविध संधी उपलब्ध असतात. अर्थात त्या त्या ठिकाणची गरज, अपेक्षा आणि त्या त्या विद्यार्थ्यांची पात्रता यावर निवड ठरत असते. स्वत:च एक स्वतंत्र व्यवसाय करणं हे तर कोणीही ठरवू शकतं.

व्यावसायिक संधीची ठिकाणे : मोठी शहरं, विकसनशील गावं, रिअल इस्टेट, बिल्डिंग इंडस्ट्री, बिल्डर्स, आर्किटेक्ट्स, विकास होत असलेली लहान गावं, शहरं अर्थात या देशाच्याच नव्हे, तर जगाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात ज्या ठिकाणी विकासाची कामं सुरू आहेत, अशा सर्वच ठिकाणी ‘एए’चा अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्यांसाठी संधीची अनेक विविध दालने उघडी आहेत.

‘ए’ अभ्यासक्रम निवडण्याचे निश्चित कारण : या अभ्यासक्रमामुळे संकल्पचित्रकृतीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्यांच्या कल्पनांना मूर्त स्वरूप देता येतं. ओरल व रिटर्न कम्युनिकेशप्रमाणेच ग्राफिकल कम्युनिकेशनची भाषा त्यांना शिकता येते, नव्हे तर ती अवगत होते. त्यांच्यात व्यावसायिक पातळीवर काम करण्यासाठी लागणाऱ्या सर्व गुणांची वाढ या अभ्यासक्रमामुळे होते. एकूणच बिल्डिंग इंडस्ट्रीविषयीचे त्यांचे ज्ञान वाढते. शिवाय इमारतीसंबंधीच्या कायद्याचं ज्ञान होतं, अगदी लहान वयात आणि अल्पावधीत जे काही शिकल्या- अनुभवण्याच्या दृष्टीने मिळतं. त्यामुळे हे विद्यार्थी खऱ्या अर्थाने स्वत:च्या पायावर उभे राहू शकतात.

अपेक्षित वार्षिक उत्पन्न : नोकरी करणाऱ्यांना सुमारे रुपये आठ हजारपासून २० हजारांपर्यंत मासिक म्हणजेच रुपये एक लाख ते दोन लाख ४० हजार वार्षिक उत्पन्न मिळू शकते. स्वत:चा स्वतंत्र असा व्यवसाय करण्याचे ठरविल्यास उत्पन्नाची मर्यादा काम करण्यासाठी सतत घेतलेल्या मेहनतीवर ठरत असते.

अधिक माहितीसाठी महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण महामंडळाच्या http://www.msbte.com या संकेतस्थळावर ‘‘एए’’ या अभ्यासक्रमासंबंधित सविस्तर माहिती, मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्था, अभ्यासक्रम शुल्क इत्यादी सर्व उपलब्ध आहे.