फारुक नाईकवाडे

राज्यसेवा पूर्व परीक्षा १७ फेब्रुवारी रोजी पार पडली. उमेदवारांनी विश्लेषण केले असेल, आडाखे बांधले असतील, कमी महत्त्वाचे, अति महत्त्वाचे असे ठरवून अभ्यास केला असेल. पण जेव्हा प्रत्यक्ष प्रश्नपत्रिका हातात येते, तेव्हा लक्षात येते की, आयोगाची प्रश्नपत्रिका आपल्या अंदाजाच्या एक तर दोन पावले पुढे आहे किंवा दोन पावले मागे आहे. उमेदवार आणि आयोग एकाच पातळीवरून चालत आहेत असा अनुभव एक तर फार कमी वेळा किंवा फार कमी प्रश्नांबाबत येतो. कधी मागे, कधी पुढे तर कधी बरोबर या अनुभवालाच परीक्षा म्हणतात. उमेदवारांचे कर्तव्य अभ्यास करून परीक्षा देणे आणि आयोगाची जबाबदारी परीक्षा घेणे. राज्यसेवा पूर्व परीक्षेचा पेपर काहींना अवघड तर काहींना सोपा गेला असेल. मात्र कट ऑफ, नवीन मराठा आरक्षणाचा त्यावर होऊ शकणारा परिणाम याबाबत जास्त चर्चा न करता पुढची तयारी सुरू झाली पाहिजे.

परीक्षा देणाऱ्या लाखो उमेदवारांत मोठी संख्या नव्या म्हणजे पहिल्यांदा परीक्षा देणाऱ्या उमेदवारांची असते. दोन्ही पेपर अवघड गेले असतील, केलेल्या अभ्यासापेक्षा वेगळाच पेपर होता अशी भावना झाली असेल तर अशा उमेदवारांनी अपेक्षाभंगाचे ओझे वाहून घेण्याचे कारण नाही. पहिल्या परीक्षेच्या अनुभवाला सर्वानाच सामोरे जावे लागते. कधी ना कधी प्रत्येकानेच पहिली परीक्षा दिलेली असते. या नराश्य अनुभवातून सगळेच गेलेले असतात. अनुभवातून गेलेले असण्यापेक्षा अनुभवातून शिकलेले असणे महत्त्वाचे. कारण असे उमेदवारच पुढे यशस्वी झालेले असतात.

पहिलाच प्रयत्न असणाऱ्या उमेदवारांनी नव्या उमेदीने तयारी सुरू केली पाहिजे. सर्वप्रथम हे समजून घ्या की परीक्षेच्या तयारीसाठी गांभीर्य आवश्यक आहे.

पूर्व – मुख्य – मुलाखत या अशा परीक्षा प्रक्रियेसाठी एक वर्षांचा कालावधी लागतो. परीक्षेपूर्वी तयारीसाठी किमान सहा महिने दिले तरी एका प्रयत्नासाठी दीड वर्ष, दोन प्रयत्नांसाठी अडीच वष्रे असा कालावधी द्यावा लागतो. वरवरचा अभ्यास, मोजके गाइड्स किंवा रेडीमेड नोट्स असा अभ्यास उपयुक्त नाही. त्यासाठी मूलभूत पुस्तकांपासून अभ्यास करावा लागेल. जाणकारांचे मार्गदर्शन घ्यावे लागेल. तरच तुमच्या तयारीला दिशा मिळेल. नव्या उमेदवारांची तयारीची सुरुवात मुख्य परीक्षेच्या अभ्यासापासून झाली पाहिजे.

जुने उमेदवार ज्यांनी यापूर्वी एक-दोन वेळा परीक्षा दिल्या आहेत अशा उमेदवारांनी जास्त वेळ पूर्व परीक्षेनंतरच्या रोमॉंटीसिझममध्ये न अडकता तात्काळ मुख्य परीक्षेची तयारी सुरू  केली पाहिजे. नव्या आणि जुन्या उमेदवारांसाठी कॉमन मिनिमम प्रोग्राम मुख्य परीक्षेची तयारी हाच असला पाहिजे.

निकालाची चिंता न करता आपण मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरणारच आहोत असे गृहीत धरून मुख्य परीक्षेच्या अभ्यासाला सुरुवात करायला हवी. ज्यामुळे पूर्व परीक्षेत यशाने हुलकावणी दिली तरी, मधला काळ मुख्य परीक्षेच्या अभ्यासासाठी वापरल्याने पुढच्या प्रयत्नांची आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठीची तयारी सुरक्षित होते व स्पध्रेत आपली दावेदारीसुद्धा! स्पर्धा परीक्षांच्या तयारीचे काही अतिरिक्त नियम आहेत. त्यापकी हा महत्त्वाचा नियम आहे, आयोगाच्या वेळापत्रकानुसार आपल्या अभ्यासाचे वेळापत्रक नेहमी गतिशील ठेवायला हवे. राज्य लोकसेवा आयोगाच्या प्रसिद्ध झालेल्या परीक्षांच्या अंदाजित वेळापत्रकात बदल होऊ शकतो. पण म्हणून ‘जेव्हा होईल तेव्हा बघू’ असे धोरण आपल्या वेळापत्रकाचा भाग कधीच असू नये.

काही उमेदवार इतर स्पर्धा परीक्षाही देणार असतील. किंबहुना त्यांनी त्या द्यायलाच हव्यात असा आम्ही नेहमीच सल्ला देतो. या परीक्षांचे अद्ययावत वेळापत्रक अभ्यासाच्या नियोजनासाठी देत आहोत.

हे वेळापत्रक आणि तुम्ही देणार असलेल्या परीक्षा यांचा व्यवस्थित अभ्यास करून पुढचे वेळापत्रक आखून घ्यावे. या सर्व परीक्षांच्या अभ्यासक्रमामध्ये कॉमन असणाऱ्या मुद्दय़ांची

(उदा. भारताची राज्यघटना) तयारी एकत्रितपणे आधी करावी. त्यानंतर त्या त्या परीक्षेच्या वेळेप्रमाणे विशिष्ट घटक विषयांची उजळणी करता येईल.

तेव्हा राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या मूडमधून बाहेर येऊन या परीक्षांची तयारी सुरू झाली पाहिजे. पुढील परीक्षांसाठी सर्वाना शुभेच्छा!

महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २४ मार्च

महाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा संयुक्त पेपर (पेपर क्र. १) २८ जुलै

पोलीस उपनिरीक्षक मुख्य परीक्षा  (पेपर क्र. २) ४ ऑगस्ट

राज्य कर निरीक्षक (पेपर क्र. २) ११ ऑगस्ट

सहायक कक्ष अधिकारी मुख्य परीक्षा (पेपर क्र. २) २५ऑगस्ट

सहायक मोटर वाहन निरीक्षक पूर्व परीक्षा २८ एप्रिल

सहायक मोटर वाहन निरीक्षक मुख्य परीक्षा  १ सप्टेंबर

महाराष्ट्र कृषी सेवा पूर्व परीक्षा १९ मे

महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षा २९ सप्टेंबर

महाराष्ट्र गट क सेवा पूर्व परीक्षा १६ मे

महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा संयुक्त पेपर (पेपर क्र. १) ६ ऑक्टोबर

लिपिक टंकलेखक मुख्य परीक्षा  (पेपर क्र. २) १३ ऑक्टोबर

दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क  (पेपर क्र. २) २० ऑक्टोबर

कर सहायक मुख्य परीक्षा (पेपर क्र. २) ४ नोव्हेंबर

महाराष्ट्र वन सेवा पूर्व परीक्षा २६ मे

महाराष्ट्र वन सेवा मुख्य परीक्षा १५ सप्टेंबर

महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा २६ जून

महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा

महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा (यांत्रिकी )   २ नोव्हेंबर

महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा (यांत्रिकी/ विद्युत) ९ डिसेंबर

महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा (विद्युत) २४ नोव्हेंबर

महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा (स्थापत्य) २४ नोव्हेंबर