सुनील शेळगावकर

पहिला संयुक्त पेपर आणि दुसरा पदनिहाय पेपर अशा स्वरूपात ही पहिलीच परीक्षा होत आहे. संयुक्त पेपर १मध्ये मराठी व इंग्रजी विषयांचा समावेश आहे. यातील मराठी घटकाच्या तयारीबाबत या लेखामध्ये चर्चा करण्यात येत आहे.

 अभ्यासपूर्व विश्लेषण –

परीक्षा योजना पाहता मराठी या विषयावर परीक्षेत विचारला जाणारा एक प्रश्न एका गुणासाठी आहे. प्रश्नांचा दर्जा बारावी असा दिल्यामुळे एखाद्या संकल्पनेचे किंवा व्याकरण घटकाचे उप-उपप्रकार अभ्यासले नाही तरी चालतील असे लक्षात येते. वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न स्वरूप असल्यामुळे पाठांतराला जास्त महत्त्व द्यावे लागेल यात शंका नाही. या ठिकाणी पाठांतर म्हणजे संकल्पना समजून घेऊन लक्षात ठेवणे होय.

अभ्यासक्रम – मराठीच्या या ६० प्रश्नांसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने पुढील अभ्यासक्रम निश्चित केला आहे.

सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्प्रचार यांचा अर्थ आणि उपयोग तसेच उताऱ्यावरील प्रश्नांची उत्तरे.

अभ्यासपूर्ण प्रश्नसंख्या विश्लेषण –

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मागील इतर परीक्षांचे व समान काठिण्यपातळीच्या अभ्यासक्रमाचे अवलोकन केले असता असे लक्षात येते की, सर्वसामान्य शब्दसंग्रहावर विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची संख्या सर्वाधिक आहे (सुमारे २० प्रश्न), त्या खालोखाल मराठी व्याकरणावर प्रश्न विचारलेले आढळतात (सुमारे १५-२० प्रश्न), तद्नंतर वाक्यप्रकार आणि म्हणी व वाक्प्रचार यावर समसमान (सुमारे १० प्रश्न) विचारलेले आढळतात, तर एका उताऱ्यावरील पाच प्रश्न विचारले जातात. (हा आयोगाच्या मागील प्रश्नपत्रिका पाहून व्यक्त केलेला अंदाजे विचार आहे.)

अभ्यासक्रमातील घटक व उपघटक – वरील अभ्यासक्रमात पुढील घटक व उपघटकांचा समावेश असतो.

सर्वसामान्य शब्दसंग्रह – या घटकांतर्गत शब्दसिद्धी (सिद्ध व साधित शब्द संकल्पना आणि उदाहरणे) वैशिष्टय़पूर्ण शब्द, शब्द समूहाबद्दल एक शब्द, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, शब्दार्थ, शुद्ध शब्द, अशुद्ध शब्द, पारिभाषिक शब्द या उपघटकांचा समावेश होतो.

वाक्यरचना – या विषयीचा व्याकरण शिकण्याचा भाग पूर्ण केल्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या शक्य तेवढय़ा जास्तीत जास्त प्रश्नपत्रिका यातील उपघटकांनुसार सरावासाठी सोडवा.

व्याकरण – या घटकांतर्गत वर्णविचार (वर्णमाला, वर्णप्रकार, वर्णाची उच्चारस्थाने), शब्दविचार (शब्दाच्या जाती, शब्दाचे विकरण म्हणजे लिंग, वचन, विभक्ती व काळ.)

म्हणी व वाक्प्रचार आणि त्यांचा वाक्यातील उपयोग – या घटकांतर्गत ५ वी ते १२ वीपर्यंतच्या मराठी पुस्तकातील यांचा साठा, दैनंदिन व्यवहार व बोली भाषेतील शब्दसामर्थ्यांचा समावेश होतो.

उताऱ्यावरील प्रश्नांची उत्तरे- आपल्या परीक्षेसाठी काठिण्यपातळी बारावी असल्यामुळे उताऱ्यातील भाषा सोपी असते, मात्र उताऱ्याची लांबी जास्त असेल असा अंदाज आहे. आपणास परीक्षेत एका उताऱ्यावरीलच प्रश्नांची उत्तरे द्यावयाची आहेत. (यात बदल होऊ शकतो.)

असा करावा अभ्यास – मराठी हा विषय आपल्या स्पर्धापरीक्षेतील पकीच्या पकी गुण देणारा विषय आहे. जाणीवपूर्वक आणि नियोजनपूर्वक प्रयत्न केल्यास त्यात आपण नक्की यशस्वी होऊ. चला तर मग मराठीचा अभ्यास पुढीलप्रमाणे करा.

सर्वसामान्य शब्दसंग्रह – डिक्शनरीप्रमाणे त्या त्या उपगटातील शब्दांची मांडणी वर्णाच्या चढत्या क्रमाने करून ते शब्द स्वत लिहून काढा. लिहिल्यानंतर त्यांचे वर्गीकरण करून समजून घेऊन रोज थोडय़ा थोडय़ा शब्दधनाचे पाठांतर करा.

वाक्यरचना – याविषयीचा व्याकरण शिकण्याचा भाग पूर्ण केल्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या शक्य तेवढय़ा जास्तीत जास्त प्रश्नपत्रिका यातील उपघटकांनुसार सरावासाठी सोडवा.

व्याकरण – व्याकरणातील घटक व उपघटक यांचा कोणत्याही एका चांगल्या व्याकरणाच्या पुस्तकातून सर्वप्रथम अभ्यास पूर्ण करा. नंतर झालेला अभ्यास टिपणांच्या व तक्त्यांद्वारे पुनर्वाचनासाठी तयार करा. मागील आयोगाच्या प्रश्नपत्रिकांच्या माध्यमातून प्रश्नाचे स्वरूप, प्रश्नाची काठिण्यपातळी समजावून घ्या. नंतर तत्सम सराव करण्यावर भर द्या.

म्हणी व वाक्प्रचार – सर्वप्रथम याची एक यादी तयार करून घ्या. अर्थ लक्षात आल्यानंतर त्यांचा वाक्यातील योग्य उपयोग कसा करावा किंवा ओळखावा हे लक्षात येईल. यासाठी वाक्याचा अर्थ समजणे महत्त्वाचे असते.

उताऱ्यावरील प्रश्न – यासाठी सराव अधिक महत्त्वाचा आहे. सरळ सेवा भरती, दुय्यम सेवा, इतर गट ‘ब’, व

गट ‘क’ पदांच्या परीक्षेत आलेली उतारे पहिल्यांदा वेळ न लावता सोडवा. नंतर उतारे सोडविण्याची तुमची पद्धती पक्की झाल्यास वेळ लावून उतारे सोडविण्याचा प्रयत्न करा.

यशाची चतु:सूत्री – अभ्यासक्रमातील घटक व उपघटक यांचे पहिल्यांदा आकलन होईपर्यंत वाचन करा. वाचनानंतर शब्दधनाचे आकलन होईपर्यंत वाचन करा. वाचनानंतर शब्दधनाचे संकलन व पाठांतर वाढवा. जुन्या आयोगाच्या प्रश्नपत्रिकांतून घटकवार प्रश्न सोडविण्याचा सराव करा. सरावाअंती स्वत:ची घटकवार टिपणे तयार करा.

अभ्याससाहित्य  –

सर्वसामान्य शब्दसंग्रह, म्हणी व वाक्प्रचार आणि शब्दविचार – शब्दधन, लाइफ पब्लिकेशन, पुणे.

वाक्यरचना व मराठी व्याकरण – मो. रा. वाळिंबे, नितीन प्रकाशन, पुणे.

उताऱ्यावरील प्रश्नांची उत्तरे – महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या जुन्या प्रश्नपत्रिका.

सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे अभ्याससाहित्य कोणाचे वाचतो यापेक्षा महत्त्वाचे आहे, की त्यात चुका तर नाहीत ना. शिवाय  पूर्ण अभ्यासक्रम सापडणे महत्त्वाचे असते.

महाराष्ट्र ‘गट-क’ सेवा संयुक्त मुख्य परीक्षा – २०१८

गट क सेवेच्या बदललेल्या स्वरूपाबाबत तसेच नव्या अभ्यासक्रमाबाबत या स्तंभामध्ये यापूर्वी चर्चा करण्यात आली आहे. लिपिक टंकलेखक, दुय्यम निरीक्षक-राज्य उत्पादन शुल्क व कर सहाय्यक या गट क सेवांसाठीच मुख्य परीक्षा ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत प्रस्तावित आहे.