16 February 2019

News Flash

शिक्षणध्यास : भारतियर विद्यापीठ, कोईम्बतूर

तामिळनाडू राज्यामधील एक महत्त्वाची शैक्षणिक संस्था म्हणून कोईम्बतूर येथील ‘भारतियर विद्यापीठा’चा विचार केला जातो.

(संग्रहित छायाचित्र)

संस्थेची ओळख – तामिळनाडू राज्यामधील एक महत्त्वाची शैक्षणिक संस्था म्हणून कोईम्बतूर येथील ‘भारतियर विद्यापीठा’चा विचार केला जातो. तामिळनाडू सरकारने फेब्रुवारी १९८२मध्ये या राज्य विद्यापीठाची स्थापना केली. या विद्यापीठाची स्थापना होण्यापूर्वीच्या काळात कोईम्बतूरमध्ये मद्रास विद्यापीठाचा पदव्युत्तर विभाग चालत असे. त्याच पायावर पुढे हे विद्यापीठ उभे राहिले. विद्यापीठ अनुदान आयोगाने १९८५ सालापासून या विद्यापीठाला मान्यता देत, अनुदानही सुरू केले. प्रसिद्ध तमिळ कवी सुब्रमण्यम भारती यांचे साहित्यिक तसेच भारतीय स्वातंत्र्यलढय़ातील योगदान विचारात घेत, त्यांच्या स्मरणार्थ ‘भारतियर विद्यापीठ’ या नावाने हे विद्यापीठ ओळखले जाते. शिक्षणसंस्था या ज्ञानमंदिर असाव्यात, या त्यांच्या विचारांप्रमाणे ‘उन्नतीसाठी शिक्षण’ हे ब्रीदवाक्य ठेवून हे विद्यापीठ दक्षिणेतील विद्यार्थ्यांसाठी ज्ञानदानाचे कार्य करत आहे. देश उभारणीसाठी, चांगला मनुष्य घडण्यासाठी आवश्यक ज्ञान, कौशल्ये, दृष्टिकोन, मूल्ये रुजवण्यासाठी विद्यापीठ प्रयत्नशील आहे. यंदा ‘एनआयआरएफ’ या राष्ट्रीय पातळीवरील मूल्यांकनामध्ये हे विद्यापीठ देशभरातील विद्यापीठांच्या क्रमवारीत तेराव्या स्थानी आहे.

विभाग आणि अभ्यासक्रम – या विद्यापीठात एकूण चौदा स्कूल्समधून विद्यापीठाचे वेगवेगळे विभाग आणि अभ्यासक्रम विभागण्यात आले आहेत. त्याअंतर्गत विद्यापीठाचे ३९ शैक्षणिक विभाग चालतात. या विभागांच्या मदतीने विद्यापीठाने आपल्या विद्यार्थ्यांसाठी निवडक असे ५९ नियमित अभ्यासक्रम उपलब्ध करून दिले आहेत. त्यामध्ये वेगवेगळ्या पदवी, पदव्युत्तर पदवी, संशोधन, पदव्युत्तर पदविका आणि प्रमाणपत्र स्वरूपातील अभ्यासक्रमांचा समावेश आहे. कला विद्याशाखांतर्गत असलेल्या इकॉनॉमॅट्रिक्स विभागामध्ये एम. एस्सी. इकॉनॉमॅट्रिक्स हा दोन वर्षे कालावधीचा पदव्युत्तर अभ्यासक्रम उपलब्ध आहे. इकॉनॉमिक्स, इकॉनॉमॅट्रिक्स, मॅथेमॅटिक्स, स्टॅटेस्टिक्स, बिझनेस इकोनॉमिक्स, कॉमर्स, मॅनेजमेंट आदी विषय शिकलेल्या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येतो. याच विद्याशाखांतर्गत असलेल्या डिपार्टमेंट ऑफ एज्युकेशनल टेक्नॉलॉजीमध्ये एम. एस्सी. ई- लìनग टेक्नॉलॉजी हा एक वेगळा अभ्यासक्रमही चालतो. कोणत्याही विद्याशाखेचे पदवीधर या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ शकतात, हे या अभ्यासक्रमाचे वैशिष्टय़ ठरते. कला विद्याशाखेमधून उपलब्ध असलेले एम. ए. करिअर गाइडन्स आणि पदवी पातळीवर उपलब्ध असलेला बी. व्होक. मल्टिमीडिया अँड अ‍ॅनिमेशन हेही याच प्रकारचे वैशिष्टय़पूर्ण अभ्यासक्रम ठरतात. विद्यापीठाच्या विज्ञान विद्याशाखांतर्गत असलेल्या डिपार्टमेंट ऑफ मेडिकल फिजिक्समध्ये एम. एस्सी. मेडिकल फिजिक्स हा अभ्यासक्रम चालतो. कोईम्बतूरमधील एका हॉस्पिटलच्या सहकार्याने चालणारा हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकांवर आधारलेल्या शिक्षणाचे महत्त्व पटवून देण्यास उपयुक्त ठरतो. याच विषयाशी संबंधित एम. फिल. आणि पीएचडीचे अभ्यासक्रमही या विभागामध्ये चालविले जातात. मॅथेमॅटिक्स आणि केमिस्ट्री या विषयांसह शिक्षण घेत फिजिक्स विषयातील पदवी पूर्ण करणारे उमेदवार या अभ्यासक्रमासाठी पात्र ठरतात. विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ बॉटनीमध्ये ‘हर्बल टेक्नॉलॉजी’ या विषयामधील पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम चालतो. दोन वर्षे कालावधीच्या या अभ्यासक्रमासाठी बायोलॉजिकल सायन्सेसमधील पदवी किंवा पदव्युत्तर पदवीधारक विद्यार्थी पात्र ठरतात. कॉम्प्युटर अ‍ॅप्लिकेशन्स विभागामध्ये चालणारा ‘डेटा अ‍ॅनालिटिक्स’ या विषयातील एम. एस्सी.चा दोन वर्षे कालावधीचा अभ्यासक्रम, अप्लाइड मॅथेमॅटिक्स विभागामध्ये चालणारा ‘एम. एस्सी. मॅथेमॅटिक्स विथ कॉम्प्युटर अ‍ॅप्लिकेशन्स’, डिपार्टमेंट ऑफ टेक्स्टाइल्स अँड अ‍ॅपरल डिझाइनमध्ये उपलब्ध असलेला याच विषयातील एम. एस्सी. हे अभ्यासक्रम विद्यार्थ्यांसाठी वेगळ्या वाटेने जाणाऱ्या करिअरचा मार्ग दाखवतात. याशिवाय विद्यापीठाच्या विभागांमधून नेहमीच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या जोडीने एम. फिल. आणि पीएचडीसाठीच्या संशोधन अभ्यासक्रमांचीही उपलब्धता करून देण्यात आली आहे. विद्यापीठाच्या ‘स्कूल ऑफ डिस्टन्स एज्युकेशन’ या माध्यमातून दूरशिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्या आधारे दूरशिक्षणाचे ४६ पदवी, १९ पदविका किंवा प्रमाणपत्र, २५ पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांचे पर्याय विद्यापीठाने उपलब्ध करून दिले आहेत. याशिवाय पदव्युत्तर पदविका आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांची सुविधाही दूरशिक्षणाच्या आधारे उपलब्ध करून देण्यात आली आहे.

संकुल आणि सुविधा

कोईम्बतूर शहरापासून जवळच असलेल्या निसर्गरम्य परिसरामध्ये या विद्यापीठाचे शैक्षणिक संकुल वसले आहे. विद्यापीठाने आपल्या विद्यार्थ्यांसाठी मूलभूत पायाभूत सुविधांची उभारणी करताना या संकुलाच्या निसर्गरम्यतेला धक्का लागणार नाही, याची पुरेपूर काळजी घेतली आहे. विद्यापीठामध्ये सध्या विद्यार्थ्यांसाठीच्या चार वसतिगृहांची सुविधा उपलब्ध आहे. तसेच, शिक्षकांसाठीच्या स्वतंत्र वसतिगृहाची सुविधाही विद्यापीठाने उभारली आहे. त्याद्वारे कामानिमित्त विद्यापीठामध्ये येणाऱ्या शिक्षकांची रहिवासाची अडचण दूर करण्यात विद्यापीठ यशस्वी ठरते आहे. विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसाठी मध्यवर्ती ग्रंथालयाची सुविधा उपलब्ध आहे. सध्या या ग्रंथालयामध्ये एकाच वेळी ३०० विद्यार्थी बसून अभ्यास करू शकतील, अशा सुविधा उपलब्ध आहेत. राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय पातळीवरील वेगवेगळी नियतकालिकेही ग्रंथालयामध्ये उपलब्ध आहेत. त्यामध्ये अगदी १८८० पासूनच्या काही खंडांचाही समावेश आहे. नागरी सेवा परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी ‘अण्णा सेंटेनरी सिव्हिल सर्व्हिसेस कोचिंग अ‍ॅकेडमी’ हे निवासी प्रशिक्षण केंद्रही विद्यापीठाने उभारले आहे. या केंद्रामधून तामिळनाडूच्या पश्चिम भागातील विविध जिल्ह्यंमधील उमेदवारांना स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी मोफत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. विद्यापीठाच्या कम्युनिटी कॉलेज कन्सल्टन्सी सेंटरच्या माध्यमातून शिक्षणाच्या मुख्य प्रवाहापासून लांब असणाऱ्या समाजघटकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहामध्ये सहभागी करून घेण्यासाठीचे व्यापक प्रयत्न केले जात आहेत. विज्ञानाच्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरू शकणाऱ्या अत्याधुनिक वैज्ञानिक उपकरणांनी सज्ज असलेले ‘सायन्स इन्स्ट्रमेंटेशन सेंटर’ही विद्यापीठाने उभारले आहे.

borateys@gmail.com

First Published on September 4, 2018 3:11 am

Web Title: article about bhartiar university coimbatore