स्वाती केतकर- पंडित

मराठीचे आता काही खरे नाही, अशी ओरड अनेकदा ऐकू येते. पण कोल्हापूर जिल्ह्य़ातील भुदरगड तालुक्यातील शिक्षक  गोविंद पाटील मात्र आपल्या विद्यार्थ्यांसमवेत एक वेगळी साहित्यसेवा करत आहेत. पहिली ते सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची अक्षर मशागत करत उत्तमोत्तम हस्तलिखीते आणि बालसाहित्याची निमिर्ती करत आहेत.

गेली २७ वर्षे गोविंद पाटील जिल्हा परिषद शाळा शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे घराणे शाहिराचे, त्यामुळे गाणे, कला ही रक्तातच होती. त्यामुळे त्यांना व्हायचे होते शाहीर. पण उत्तम गुण मिळत असल्याने वडिलांचा हट्ट, इंजिनीअरिंगला जावे. गोविंदना मात्र त्यात काही रस नव्हता. शेवटी शाहिरी सोडून ते शिक्षकी पेशाकडे वळले. शब्दांशी दोस्ती जुनी असल्याने नोकरी करायला लागल्यावर ती वाढवण्याचे ठरले होतेच. नोकरीच्या पहिल्या वर्षी शाळेत त्यांनी एक गमतीशीर उपक्रम सुरू केला. विद्यार्थ्यांना एक ओळ लिहून द्यायचे. पुढची ओळ त्यांनी आपली आपण पूर्ण करावी. त्यासाठी त्यांनी ओळ दिली होती, आमच्या शाळेत कोंबडा आला.. यावर एकाने लिहिले कोंबडा म्हणाला मला शिकवा, दुसरा म्हणाला, कोंबडा आला आणि पळून गेला. एक विद्यार्थी मात्र चांगलाच इरसाल निघाला. त्याने लिहिले, आमच्या शाळेत कोंबडा आला आणि शिटून गेला.. एखादे शिक्षक यावर चिडले असते, पण पाटील सरांनी त्याच्या त्या ओळीकडे एक निरीक्षण म्हणून पाहिले. कारण खरोखरच ती शाळा गावातील एका माणसाच्या घरातल्या खोलीत भरत असे. त्यांचे घर लागूनच असल्याने तिकडची कोंबडी वगैरे पळत येत, दाणे खात, कधी शाळेत घाणही करत.

यानंतर कागल तालुक्यातील विद्यामंदिर सोनाळी या शाळेत २००५ मध्ये पाटील सरांची बदली झाली. या शाळेत पाटील सर विज्ञान विषय शिकवत असत. परंतु इथे त्यांनी मराठी वाचनाचा महत्त्वाचा उपक्रमही घेतला. त्यात अगदी साने गुरुजींपासून आजच्या वीणा गवाणकरांपर्यंत अनेक उत्तम लेखकांची विविध विषयांवरील पुस्तके विद्यार्थ्यांसमोर ठेवली.  यानंतर २००९ मध्ये त्यांची बदली झाली, आश्रमशाळा पेठ शिवापूर, तालुका भुदरगड इथे. या आश्रमशाळेमध्ये पाटील सरांच्या कामाला खऱ्या अर्थाने दिशा मिळाली. ते स्वत: तर साहित्यिक आहेतच, पण विद्यार्थ्यांनी लिहावे, अशीही त्यांची इच्छा होती. गावकीर्तन, उद्ध्वस्त ऋतूंच्या कविता, धूळधाण यांसारख्या कलाकृती त्यांनी लिहिल्या आहेत. याच प्रेरणेतून पेठ शिवापूरच्या या आश्रमशाळेतही साहित्याचे रोपटे लावण्याचा निर्णय त्यांनी घेतला. ही आश्रमशाळा असल्याने निवासी शाळा होती. आसपासच्या खेडय़ांतील विद्यार्थी इथे येत असत. पाटील सरांनी सुंदर हस्ताक्षराच्या कार्यशाळा घ्यायला सुरुवात केली. हेतू हा की अक्षर सुधारल्यावर आशयाचीही गोडी लागेल. तो साध्यही झाला. या हस्ताक्षर उपक्रमानेच ‘रुजवण’ या पहिल्या दिवाळी हस्तालिखिताची बीजे रोवली. रमीजा जमादार, शिवानी वर्तक, आरमान नाईकवडे या आणि अशा अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या मनातल्या अनेक कल्पनांना सरांच्या मार्गदर्शनाखाली कागदावर उतरवले.

ही आश्रमशाळा अगदी निसर्गाच्या कुशीतली. म्हणजे झाडे भरपूर, जवळच धबधबा. मग हा निसर्ग विद्यार्थ्यांच्या शब्दांतून व्यक्त होण्याच्या तळमळीतूनच पाटील सरांनी विद्यार्थ्यांना लिहिते केले. यासोबतच विद्यार्थ्यांना इतरही अनेक चांगल्या गोष्टींचे अनुभव मिळावेत यासाठी प्रयत्न केले. बालसाहित्यिक, पत्रकार, लेखक, चित्रकार, सुलेखनकार, बासरीवादक अशा कलाकारांना शाळेच्या भेटीला आणले. या पाहुण्यांसोबतच्या गप्पांतून विद्यार्थ्यांमधला लाजरेपणा दूर पळायचा, शिवाय संभाषणकौशल्य विकसित व्हायची. नव्या कलेची ओळख तर होतच असे. त्याचाच परिणाम त्यांच्या लेखनात दिसत असे. एक दिवस पेठ शिवापूर गडावर एक फ्रान्सचा प्रवासी फिरायला आलाय, असे शाळेत कळले. त्याच्यासोबत कोल्हापूरच्याच एका इंजिनीअरिंग कॉलेजचा विद्यार्थी दुभाषा म्हणून आला होता. मग काय, आश्रमशाळेतल्या विद्यार्थ्यांनी या पाहुण्यालाही आपली शाळा पाहायला येण्याचे आवतण दिले. वर्गात आल्यावर मोडक्यातोडक्या इंग्रजीत कधी दुभाष्याची मदत घेत त्याच्यासोबत गप्पा मारल्या. तुम्ही कुठचे इथपासून सुरू झालेले प्रश्न मग तुमच्या देशात काय खातात, शिक्षणपद्धती कशी आहे.. वगैरे वगैरेपर्यंत पोहोचलो आणि बघताबघता आश्रमशाळेतल्या विद्यार्थ्यांनी त्यांची एक झक्कास मुलाखतच घेतली. त्यांच्याही नकळत मुलाखतीचे प्रश्न, माध्यम, साधने यांचा त्यांचा अभ्यास पक्का होत होता. गोविंद पाटील म्हणतात त्याप्रमाणे कोणत्याही अनुभवाला एक शैक्षणिक अनुभव कसा बनवावा, याचा परिपाठच होता तो. या सगळ्याचाच परिपाक म्हणून २००९ ते २०१२ या तीन वर्षांत पेठ शिवापूरच्या या आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी तब्बल १५-२० हस्तलिखिते तयार केली. दोन दिवाळी अंक काढले.

पण विद्यार्थ्यांना फक्त अनुभवाच्या पायरीवरच पाटील सरांनी थांबवले नाही. याबरोबर महत्त्वाचे असते ते निरीक्षण आणि वाचन. त्यामुळेच पाटील सरांनी या विद्यार्थ्यांना अनेक पुस्तके वाचायला लावली. माडगूळकर, वपु, पुलं अशा अनेक साहित्यिकांनी किती वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्तिचित्रणे केली आहेत, त्याची तुलना करायला लावली. ती पुस्तके विद्यार्थ्यांना वाचायला लावली. कधी स्वत: या विद्यार्थ्यांमधील कुणाचे व्यक्तिचित्र लिहून दाखवले याचे प्रतिबिंब हस्तलिखितामध्ये दिसले. आपल्या जवळच्या व्यक्तींची सुंदर व्यक्तिचित्रे विद्यार्थ्यांनी लिहिली. एकदा या शाळेत मैदान बनवायचे होते. त्यासाठी वाटेत येणारे विद्यार्थ्यांचे लाडके असलेले जांभळाचे झाड तोडावे लागणार होते. विद्यार्थ्यांनी ते तोडायला विरोध केला. मग पाटील सरांनी त्यांना हा विरोध शब्दांत उतरवायला लावला. विद्यार्थ्यांनी त्यातून फार छान साहित्य लिहिले. कुणी झाड गेल्याने येणारी अस्वस्थता टिपली, तर कुणी झाडाशी असलेले ऋणानुबंध व्यक्त केले. त्यांच्या रागाला योग्य अभिव्यक्तीची वाट पाटील सरांनी दाखवली आणि नकळतच एक वेगळे शिक्षणही दिले. पुढे २०१२ नंतर त्यांची केंद्र शाळा कूर, तालुका भुदरगड आणि २०१८ मध्ये विद्यामंदिर पंडिवरे या शाळांमध्ये बदली झाल्यावरही पाटील सरांनी अशाच प्रकारचे कार्य केले आहे. विद्यार्थ्यांना लिहायला प्रवृत्त केले आहे. या प्रत्येक शाळेत तेथील सहकारी शिक्षकवर्ग, कर्मचारी आणि मुख्याध्यापकांचे, शिक्षणाधिकाऱ्यांचे विशेष सहकार्य मिळाल्याचे पाटीलसर आवर्जून सांगतात.

या सगळ्या हस्तालिखितांचे वैशिष्टय़ म्हणजे यात कुठेही प्रमाणभाषेचा आग्रह नाही. प्रत्येक विद्यार्थ्यांने आपापल्या भाषेत ती लिहिली आहेत. ती कुणाची बोलीभाषा आहे, तर कुणाची पाडय़ावरची भाषा आहे. कारण प्रमाणभाषेचा आग्रह धरला असता त्यातील खरेपणा नाहीसा झाला असता, असे पाटील सरांना वाटते. फक्त शाळेतील विद्यार्थ्यांच्या साहित्याविषयक नव्हे तर आजवर पाटील सरांनी बालसाहित्यातही महत्त्वाची कामगिरी केली आहे. आजवर त्यांनी मित्रपरिवार आणि संस्थांच्या सहकार्यातून २४ पुस्तके प्रकाशित केली आहेत, त्यातील आठ पुस्तके मुलांनी स्वत: लिहिलेली आहेत. कोल्हापूर जिल्हा शिक्षक साहित्य परिषद, साहित्य सभा, पुरोगामी शिक्षक संघटना अशा विविध संघटनांशीही ते संलग्न आहेत. त्यांनी लावलेले हे साहित्याचे रोपटे वटवृक्षात रूपांतरित होवो, याच शुभेच्छा!

swati.pandit@expressindia.com