17 July 2019

News Flash

एमपीएससी मंत्र : बौद्धिक संपदा आणि भारत

बौद्धिक संपदा हा एकूण आíथक उलाढाली व अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा घटक बनत आहे.

(संग्रहित छायाचित्र)

फारुक नाईकवाडे

बौद्धिक संपदा हा एकूण आíथक उलाढाली व अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा घटक बनत आहे. संपूर्ण अर्थव्यवस्था तंत्रज्ञानावर आधारित नवोपक्रम आणि नव्या व्यवस्थेच्या आधारावर आपले स्वरूप बदलत आहेच, शिवाय तिचा वेगवेगळ्या पलूंनी अभ्यासही सुरू आहे. या सगळ्या बाबींच्या मुळाशी बौद्धिक संपदा हा मुद्दा कोणत्या ना कोणत्या स्वरूपात असतोच. त्यामुळे एकूणच हा विषय समजून घेणे राज्यसेवा, केंद्रीय नागरी सेवा आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक आहे. या लेखामध्ये या मुद्दय़ांबाबत सविस्तर चर्चा करण्यात येत आहे.

जागतिक बौद्धिक संपदा निर्देशांक

जागतिक बौद्धिक संपदा संघटनेच्या अहवालानुसार भारतामध्ये देण्यात आलेल्या बौद्धिक संपदा अधिकारांमध्ये सन २०१६ च्या तुलनेत सन २०१७ मध्ये ५० टक्क्यांनी वाढ झाली आहे. सन २०१६ मध्ये भारतात एकूण ८,२४८ बौद्धिक संपदा अधिकार बहाल करण्यात आले होते. त्यामध्ये वाढ होऊन सन २०१७मध्ये एकूण १२,३८७ बौद्धिक संपदा अधिकार देण्यात आले आहेत.

सन २०१६ मध्ये एकूण १,११५ भारतीय आणि ७,१३३ परदेशी नागरिकांना / घटकांना बौद्धिक संपदा अधिकार देण्यात आले होते. तर सन २०१७ मध्ये एकूण १,७१२ भारतीय आणि १०, ६७५ परदेशी नागरिकांना / घटकांना बौद्धिक संपदा अधिकार देण्यात आले आहेत. म्हणजेच भारतीय नागरिकांपेक्षा परदेशी नागरिक किंवा घटकांना देण्यात आलेले बौद्धिक संपदा अधिकार जास्त प्रमाणात आहेत.

विविध प्रकारच्या बौद्धिक संपदांच्या निर्मितीस, नवोपक्रमांस प्रोत्साहन देणे हा बौद्धिक संपदा कायद्याचा मुख्य हेतू आहे. व्यक्ती किंवा /आणि व्यवसायांनी निर्माण केलेले बौद्धिक मालमत्तेचे व्यावसायिक अधिकार त्यांना बहाल केले जातात. यातून संबंधितांना त्याच्या निर्मितीवर काही काळासाठी एकाधिकार प्राप्त होतो. हे अधिकार इतरांना विकून किंवा स्वत:च त्यांचा व्यावसायिक वापर करून त्यांना आíथक लाभ मिळवता येतो. यामुळे बौद्धिक संपदा निर्मितीस चालना मिळते.

बौद्धिक संपदा अधिकारांचे महत्त्व व त्याबाबतच्या कायदेशीर तरतुदी याबाबत पुढील लेखामध्ये चर्चा करण्यात येईल.

बौद्धिक संपदांचे प्रकार

बौद्धिक संपत्ती अधिकारांमध्ये पेटंट, कॉपीराइट, औद्योगिक डिझाइन अधिकार, ट्रेडमार्क, पिकांच्या वाणांवरील अधिकार, व्यावसायिक दृश्यमाने, भौगोलिक निर्देशांक तसेच व्यावसायिक गुपिते यांचा समावेश होतो.

पेटंट – एखाद्या उत्पादनाच्या शोधासाठी शोधकर्त्यांना ठरावीक कालावधीसाठी त्याच्या उत्पाद, विक्री, आयातीस प्रतिबंध किंवा वगळण्याचा अधिकार देण्यात येतो. पेटंट प्राप्त करण्यासाठी लावलेल्या शोधातून औद्योगिक उत्पादन करण्याची क्षमता असणे आवश्यक असते.

कॉपीराइट – एखाद्या नवनिर्मितीवर निर्मात्यास अनन्य अधिकार प्रदान करतो. हा अधिकार सर्जनशील, बौद्धिक किंवा कलात्मक स्वरूपाच्या नवनिर्मितीस लागू होतात. पण कोणतीही संकल्पना किंवा माहिती यांवर नव्हे तर त्यांच्या वैशिष्टय़पूर्ण मांडणीसाठी हे अधिकार देण्यात येतात.

औद्योगिक डिझाइन – वस्तूंची दृश्यरचना वापरण्याचा हक्क. सर्वसामान्यपणे यास रचना अधिकारही म्हटले जाते. औद्योगिक डिझाइनमध्ये सौंदर्यमूल्य असलेली रंग, रंगांची व आकारांची वैशिष्टय़पूर्ण रचना, आकार, कॉन्फिगरेशन, त्रिमितीय रचना असते. एक उत्पादन, औद्योगिक वस्तू किंवा हस्तकला निर्मितीसाठी दोन व त्रिमितीय रचना उत्पादन आकर्षक करण्यासाठी वापरण्यात येते.

ट्रेडमार्क – विशिष्ट व्यावसायिक, उत्पादक किंवा सेवा प्रदात्यांच्या उत्पादनांची किंवा सेवांची इतर उत्पादनांपेक्षा वेगळी ओळख निर्माण करणारे एक ओळखण्यायोग्य चिन्ह, डिझाइन किंवा सांकेतिक रचना म्हणजे ट्रेडमार्क.

पिकांच्या वाणांवरील अधिकार – यांना पीक संवर्धकांचा अधिकार असेही म्हणतात. पिकांचे नवे वाण शोधणाऱ्या संशोधकास त्याच्या वाणावर आणि उत्पादनावर काही कालावधीसाठी अनन्य अधिकार देण्यात येतो. यामध्ये पिकाचे बियाणे, टिश्यू कल्चर, फळे, फुले, इतर भाग या सर्वावर शोधकर्त्यांचा अनन्य अधिकार असतो.

व्यावसायिक दृश्यमाने – एखाद्या उत्पादनाच्या दृश्य स्वरूप, बांधणी, रचना, वेष्टने ज्यावरून त्या उत्पादनाची ओळख पटते अशा दृश्य वैशिष्टय़ांचा यामध्ये समावेश होतो. समान दृश्यमानामुळे मूळ उत्पादनाऐवजी नकली उत्पादन विकले जाऊ नये यासाठीही हे अधिकार देण्यात येतात.

व्यावसायिक गुपिते – एखाद्या व्यवसाय किंवा उद्योगाचे सामान्यपणे इतरांना माहीत नसलेले एखादे सूत्र, कार्यपद्धती, प्रक्रिया, डिझाइन, उपकरण, नमुना किंवा माहितीचे संकलन ज्याचा संबंधितांना त्यांच्या क्षेत्रातील इतर स्पर्धकांपेक्षा जास्त आíथक फायदा मिळण्यासाठी उपयोग होतो. या गुपितांना शासकीय व कायदेशीर संरक्षण नसते आणि त्यांनी आपली गुपिते स्वत:च सुरक्षित ठेवायची असतात.

First Published on December 7, 2018 1:51 am

Web Title: article about intellectual property and india