21 October 2020

News Flash

यूपीएससीची तयारी : आंतरराष्ट्रीय संबंध

आंतरराष्ट्रीय संबंध या अभ्यास घटकामध्ये ‘भारत व शेजारी देश’ हा महत्त्वाचा उपघटक आहे.

(संग्रहित छायाचित्र)

प्रवीण चौगुले

आजच्या लेखामध्ये आपण सामान्य अध्ययन पेपर- २ मधील आंतरराष्ट्रीय संबंध या घटकाविषयी जाणून घेऊयात. मूलत: हा विषय गतिशील स्वरूपाचा आहे. मात्र या विषयावर प्रभुत्व मिळविणे अजिबात अवघड नाही. कारण या घटकामध्ये समाविष्ट असणाऱ्या उपघटकांची उकल केल्यास आपली तयारी सुलभ होते. उदा. आंतरराष्ट्रीय संबंध या अभ्यास घटकामध्ये भारताचे इतर देशांशी व आंतरराष्ट्रीय संघटनांशी असलेले संबंध, आंतरराष्ट्रीय संघटना, परदेशस्थ भारतीय व भारताशी संबंधित आणि भारताच्या हितसंबंधांवर प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष परिणाम करणाऱ्या जगभरातील घडामोडी यांचा समावेश होतो.

नागरी सेवा परीक्षेची तयारी करणारे बहुसंख्य परीक्षार्थी आंतरराष्ट्रीय संबंधांकडे दुर्लक्ष करताना दिसतात, याचे प्रमुख कारण म्हणजे हा घटक पूर्वपरीक्षेमध्ये नाही, तसेच या विषयाची गतिशीलता. जे विद्यार्थी/विद्याíथनी नव्याने सुरुवात करत आहेत त्यांनी या विषयाची पाश्र्वभूमी समजून घेणे आवश्यक आहे. उदा. भारताच्या परराष्ट्र धोरणाचा विकास; यामध्ये अलिप्ततावादी धोरण, पंचशील तत्त्वे, समाजवादाप्रति व सोव्हिएत रशियाशी असणारी जवळीक, ‘पूर्वेकडे पाहा’ धोरण, गुजराल सिद्धांत आदी बाबींचा आढावा घ्यावा. याकरिता शशी थरूर यांचे ‘पॅक्स इंडिका’ वाचणे श्रेयस्कर ठरेल. यासोबतच जगाच्या इतिहासातील काही महत्त्वाच्या घटना – पहिले व दुसरे महायुद्ध, त्यांची पार्श्वभूमी, परिणाम, युनोची स्थापना, शीतयुद्ध यांच्याविषयीची माहिती घेतल्यास सद्य:स्थितीतील आंतरराष्ट्रीय संबंधांची पार्श्वभूमी समजून घेणे सोपे होते.

आंतरराष्ट्रीय संबंध या अभ्यास घटकामध्ये ‘भारत व शेजारी देश’ हा महत्त्वाचा उपघटक आहे. यामध्ये भारताच्या चीन, पाकिस्तान, अफगणिस्तान, भूतान, नेपाळ, बांगलादेश, श्रीलंका, मालदीव या देशांशी असणाऱ्या संबंधांची पार्श्वभूमी व सद्य:स्थिती याविषयी जाणून घ्यावे. यामध्ये आर्थिक संबंध, सुरक्षाविषयक मुद्दे ध्यानात घ्यावे लागतील. उदा. भारत-पाकिस्तान या दोन देशांमधील संबंध अभ्यासताना ऐतिहासिक पार्श्वभूमी, आर्थिक संबंध व सीमावाद, दहशतवाद, काश्मीर प्रश्न, इ. बाबी अभ्यासणे क्रमप्राप्त आहे.

यानंतर या अभ्यास घटकातील दुसरा महत्त्वाचा घटक म्हणजे भारताचे जगातील इतर देशांशी असणारे द्विपक्षीय संबंध. यामध्ये अमेरिका, रशिया, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, जपान आदी प्रमुख महासत्तांशी असणारे संबंध अभ्यासावे लागतात. यासोबत पश्चिम आशियायी, मध्य आशियायी देश यांच्या सोबतचे संबंध ऊर्जा सुरक्षा व सामरिक गरजांच्या पार्श्वभूमीवर अभ्यासणे जरुरी आहे.

सार्क, इब्सा, ब्रिक्स, बिम्स्टेक, आसियान आदी प्रादेशिक गटांशी भारताच्या संबंधांचा अभ्यास करावा. तसेच जागतिक व्यापार संघटना,  G-20, संयुक्त राष्ट्रसंघ आदी आंतरराष्ट्रीय संघटनांसोबतच्या संबंधाविषयी तयारी करावी. यामध्ये बौद्धिक संपदा अधिकार, जागतिक पर्यावरणीय वाटाघाटी, व्यापारविषयक वाटाघाटी, दहशतवादाचा सामना, संरक्षण व सुरक्षाविषयक करार, जागतिक शांतता आदी बाबींचा प्रामुख्याने समावेश होईल. भारत व संयुक्त राष्ट्रसंघ संबंध अभ्यासताना, भारताचे संयुक्त राष्ट्रसंघातील योगदान, सुरक्षा परिषदेचा विस्तार, भारताचा सुरक्षा परिषदेतील कायमस्वरूपी सदस्यत्वावर असणारा दावा या बाबी महत्त्वपूर्ण ठरतात.

या अभ्यास घटकांमध्ये विकसित व विकसनशील देशांच्या धोरणांचा भारताच्या हितसंबंधावर होणारा परिणाम हा उपघटकही परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. यामध्ये अमेरिकेचे एच वन बी व्हिसा, बौद्धिक संपदा धोरण या बाबींवर लक्ष केंद्रित करावे. विविध देशांमध्ये वास्तव्यास असणारे परदेशस्थ भारतीय नागरिक, त्यांच्यासंबंधीच्या डउक, ढकड, ठफक या संकल्पना समजून घ्याव्यात. त्याचबरोबर भारतातील त्यांचे सांविधानिक अधिकार व इतर वैधानिक तरतुदी उदा. मतदानाचा अधिकार आदी बाबी अभ्यासणे आवश्यक ठरते. परदेशस्थ भारतीयांचे भारतासाठीचे योगदान, ते वास्तव्य करत असलेल्या देशातील समस्या, धोरणे, घडामोडी, राजवटी कशा प्रकारे भारताच्या हितसंबंधांना प्रभावित करतात हे अभ्यासणे आवश्यक आहे.

आंतरराष्ट्रीय पातळीवर कार्यरत असणाऱ्या महत्त्वपूर्ण संघटना, संस्था व फोरम उदा. संयुक्त राष्ट्रसंघ व त्याअंतर्गत कार्यरत असणाऱ्या संघटना, त्यांची रचना, उद्दिष्टे पाहावीत. जागतिक व्यापार संघटना, जागतिक बँक, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी यांसारख्या संघटना अभ्यासणे परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे.

या घटकाची तयारी सुरू करताना इंडिया सिन्स इंडिपेंडन्स या एनसीईआरटीच्या क्रमिक पुस्तकाबरोबरच इंडियाज फॉरेन पॉलिसी चॅलेंज अ‍ॅण्ड स्ट्रॅटेजी – रिथिकींग – राजीव सिक्रीह्ण हे संदर्भग्रंथ महत्त्वाचे आहेत. विविध वृत्तपत्रांमधून प्रसिद्ध होणारी आंतरराष्ट्रीय संबंधांवरची सदरे, वर्ल्ड फोकस मासिक, परराष्ट्र मंत्रालयाचे संकेतस्थळ आदी स्रोत या अभ्यास घटकांच्या तयारीकरिता पुरेसे आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 11, 2018 2:38 am

Web Title: article about international relations
Next Stories
1 संशोधन संस्थायण : तंत्रज्ञान आणि सामाजिक विकास
2 एमपीएससी मंत्र : इंग्रजी  (प्रश्नांचे विश्लेषण)
3 ‘प्रयोग’ शाळा : अक्षरचांदणे
Just Now!
X