संस्थेची ओळख

शैक्षणिक कामगिरीच्या आधारे देशांतर्गत पातळीवर दबदबा निर्माण करणारे विद्यापीठ म्हणून कोलकात्यामधील जाधवपूर विद्यापीठ ओळखले जाते. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला बंगालमध्ये झालेल्या राष्ट्रवादी चळवळीचे फलित म्हणून या विद्यापीठाच्या निर्मितीसाठीची शैक्षणिक चळवळ सुरू झाली. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर, २४ डिसेंबर १९५५ रोजी ही संस्था अधिकृतपणे विद्यापीठ म्हणून कार्य करू लागली. मात्र या संस्थेचे शैक्षणिक कार्य हे त्यापूर्वीही अनेक वर्षे सुरू होते. विद्यापीठाच्या अधिकृत स्थापनेनंतर संस्थेच्या विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी, कला, विज्ञान आणि आंतरविद्याशाखीय विषयांशी संबंधित अध्ययन आणि संशोधनाच्या क्षेत्रातील संधी मोठय़ा संख्येने उपलब्ध होत गेल्या. सध्या विद्यापीठाला राष्ट्रीय पातळीवर मिळालेल्या मानांकनामधून त्याचेच प्रतिबिंब अनुभवायला मिळत आहे. ‘एनआयआरएफ’च्या २०१८च्या मानांकनानुसार, देशात विद्यापीठांच्या यादीमध्ये सहावे, अभियांत्रिकी शिक्षणाच्या बाबतीत देशात बारावे, तर एकूण शैक्षणिक कामगिरीमध्ये देशात तेराव्या क्रमांकावर असणारे हे विद्यापीठ आपली गौरवशाली आणि ऐतिहासिक शैक्षणिक परंपरा पुढे घेऊन जाण्यासाठी जोमाने पावले टाकत आहे.

संकुले आणि सुविधा

कोलकात्याचे एक प्रमुख उपनगर असलेल्या जाधवपूरमध्ये या विद्यापीठाचे मुख्य संकुल आहे. राजा सुबोध चंद्र मलिक रोडच्या या परिसरामध्ये जवळपास ६८ एकरांच्या आवारामध्ये हे संकुल कार्यरत आहे. कोलकात्यामधील सॉल्ट लेक सिटी परिसरामध्येही २१ एकरांच्या आवारामध्ये या विद्यापीठाचे दुसरे संकुल उभारण्यात आले आहे. विद्यापीठाच्या http://www.jaduniv.edu.in/ या संकेतस्थळावरून विद्यापीठाने आपले व्हच्र्युअल जगामधील अस्तित्वही ठसठशीतपणे जगासमोर मांडले आहे. विद्यापीठामध्ये विद्यार्थ्यांसाठी एकूण तेरा वसतिगृहे उपलब्ध आहेत. त्यामध्ये विद्यार्थ्यांसाठीच्या नऊ, तर विद्यार्थिनींसाठीच्या चार वसतिगृहांचा समावेश आहे. या विद्यापीठामध्ये संशोधक विद्यार्थ्यांसाठी वेगळ्या वसतिगृहाची सुविधाही उपलब्ध आहे. विद्यापीठाचे तीन मजली मध्यवर्ती ग्रंथालय हे विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसाठीचे एक प्रमुख आकर्षण केंद्र ठरते. या ग्रंथालयामध्ये

एका वेळी ७०० विद्यार्थी बसू शकतील एवढय़ा क्षमतेचे वाचनकक्ष विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहेत. सॉल्ट लेक परिसरातील संकुलामध्येही विद्यापीठाने स्वतंत्र ग्रंथालयाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. याशिवाय विद्यार्थ्यांना आपापल्या विभागांमधील ग्रंथालयांची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.

विभाग

जाधवपूर विद्यापीठामध्ये कला, अभियांत्रिकी, विज्ञान आणि आंतरविद्याशाखीय या चार मुख्य विद्याशाखांच्या माध्यमातून एकूण ३६ विभाग चालविले जातात. त्याच बरोबरीने वेगवेगळ्या विषयांचे एकत्रित अध्ययन आणि परस्परसंबंधांमधील संशोधनाला चालना देणारे एकूण २१ आंतरविद्याशाखीय स्कूल, ४० अध्ययन केंद्रे, एक संलग्न महाविद्यालय आणि एक स्वायत्त महाविद्यालय यांचा एकत्रितपणे विचार केल्यास या विद्यापीठाच्या विस्ताराचा आढावा आपण घेऊ शकतो. कला विद्याशाखेंतर्गत बंगाली, कम्पॅरेटिव्ह लिटरेचर, अर्थशास्त्र, शिक्षणशास्त्र, इंग्रजी, फिल्म स्टडीज, इतिहास, आंतरराष्ट्रीय संबंध, ग्रंथालय आणि माहितीशास्त्र, तत्त्वज्ञान, शारीरिक शिक्षण, संस्कृत आणि सोशिओलॉजी या विषयांसाठीचे स्वतंत्र विभाग चालतात. विज्ञान विद्याशाखेंतर्गत रसायनशास्त्र, भूगोल, भूशास्त्र, उपकरणशास्त्र, जीवशास्त्र आणि जैवतंत्रज्ञान, गणित, भौतिकशास्त्र या विषयांना वाहिलेले स्वतंत्र विभाग या विद्यापीठामध्ये आहेत. अभियांत्रिकी विद्याशाखेंतर्गत अभियांत्रिकीच्या पारंपरिक विषयांसोबतच अनेक नव्या विषयांचेही सखोल अध्ययन करण्याची संधी हे विद्यापीठ उपलब्ध करून देते. आंतरविद्याशाखीय विभाग आणि केंद्रांमध्ये कॉग्नेटिव्ह सायन्स, कल्चरल टेक्स्ट्स अ‍ॅण्ड रेकॉर्डस, एज्युकेशन टेक्नॉलॉजी, इल्युमिनेशन सायन्स, इंजिनीअिरग अ‍ॅण्ड डिझाइन, लेझर सायन्स अ‍ॅण्ड इंजिनीअिरग, मटेरिअल सायन्स अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी, मोबाइल कॉम्प्युटिंग अ‍ॅण्ड कम्युनिकेशन, नॅचरल प्रॉडक्ट स्टडीज, न्युक्लिअर स्टडीज अ‍ॅण्ड अ‍ॅप्लिकेशन, ओशनोग्राफिक स्टडीज, स्कूल ऑफ लँग्वेज अ‍ॅण्ड लिंग्विस्टिक्स, विमेन स्टडीज आदी विभागांचा समावेश होतो. याशिवाय विद्यापीठामध्ये बायोइक्विव्हॅलन्स सेंटर, कॉम्प्युटर एडेड डिझाइन, काऊन्सेलिंग सव्‍‌र्हिसेस अ‍ॅण्ड सेल्फ डेव्हलपमेंट, एक्सपिरिमेंट्स इन सोशल अ‍ॅण्ड बिहेव्हिअरल सायन्सेस, ह्य़ुमन सेटलमेंट प्लॅनिंग, नॉलेजबेस्ड सिस्टीम्स, मेडिसिनल फूड अ‍ॅण्ड अप्लाइड न्युट्रिशन, प्लाझ्मा स्टडीज, क्वॉलिटी कन्स्ट्रक्शन, रिफ्युजी स्टडीज, थिएटर स्टडीज आदी विषयांशी निगडित स्वतंत्र केंद्रेही चालविली जातात.

अभ्यासक्रम

या आधारे विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना पदवी पातळीवरील ३९, तर पदव्युत्तर पातळीवरील ५७ अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तसेच, खास संशोधनासाठी म्हणून एकूण चौदा विषयांमधील एम.फिल आणि पीएच.डी.चे अभ्यासक्रम या विद्यापीठामध्ये चालविले जातात. विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या विषयांमधील आठ पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमही विद्यापीठामध्ये उपलब्ध आहेत. विद्यापीठामध्ये पारंपरिक अभ्यासक्रमांसोबत अनेकविध नव्या वाटा विद्यार्थ्यांसमोर उलगडवून दाखविणारे नवे अभ्यासक्रमही उपलब्ध आहेत. अशा अभ्यासक्रमांना मर्यादित संख्येने दिले जाणारे प्रवेश हे या विद्यापीठाचे एक महत्त्वाचे वेगळेपण ठरते. अशा अभ्यासक्रमांमध्ये दोन वर्षे कालावधीचे एम.ए. फिल्म स्टडीज, एम.ए. कम्पॅरेटिव्ह लिटरेचर, एम.ए. पॉलिटिकल सायन्स अ‍ॅण्ड इंटरनॅशनल रिलेशन्ससारख्या अभ्यासक्रमांचा समावेश आहे. विद्यापीठाच्या स्कूल ऑफ न्युक्लिअर स्टडीज अ‍ॅण्ड अ‍ॅप्लिकेशनमध्ये मास्टर ऑफ न्युक्लिअर इंजिनीअिरग हा दोन वर्षांचा पदव्युत्तर अभ्यासक्रम चालतो. स्कूल ऑफ मोबाइल कम्प्युटिंग अ‍ॅण्ड कम्युनिकेशनमध्ये दोन वर्षांचा मास्टर ऑफ टेक्नॉलॉजी इन डिस्ट्रिब्युटेड अ‍ॅण्ड मोबाइल कम्प्युटिंग हा एक वेगळा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहे. स्कूल ऑफ इन्व्हायर्न्मेंटल स्टडीजअंतर्गत विद्यार्थ्यांना इन्व्हायर्न्मेंटल बायोटेक्नोलॉजी विषयामध्ये दोन वर्षांचा एम.टेक. अभ्यासक्रम शिकण्याची संधी मिळते. स्कूल ऑफ लेझर सायन्स अ‍ॅण्ड इंजिनीअिरगअंतर्गत दोन वर्षांचा मास्टर ऑफ लेझर टेक्नॉलॉजीचा अभ्यासक्रम चालविला जातो. स्कूल ऑफ एज्युकेशन टेक्नॉलॉजीमध्ये मास्टर इन मल्टिमीडिया डेव्हलपमेंट आणि मास्टर ऑफ टेक्नॉलॉजी इन आयटी हे दोन वर्षे कालावधीचे दोन पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम चालविले जातात.