सर्वसाधारणपणे परीक्षेची भीती वाढवण्यात मोठा हातभार लावणारा विषय म्हणजे गणित. गणितासाठी खासगी शिकवणी लावणाऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. कितीही टाळले तरी जगभरातील अभ्यासक्रमाच्या चौकटीत बीजगणित, अंकगणित यांचा अभ्यास कधी ना कधीतरी करावाच लागतो. एकीकडे गणिताचा धसका घेणारा वर्ग मोठा असला तरी दुसरीकडे जगभरात सर्वाधिक अभ्यासला जाणारा विषयही गणितच आहे.

‘केंब्रिज असेसमेंट’ या यूकेमधील शिक्षणसंस्थेने केलेल्या अभ्यासातून हे निष्कर्ष समोर आले आहेत. या संस्थेने ‘ग्लोबल एज्युकेशन सेन्सस रिपोर्ट’ प्रसिद्ध केला आहे. त्यामध्ये विद्यार्थ्यांच्या पसंतीचे विषय, शिकवण्या अशा वेगवेगळ्या मुद्दय़ांवर हा अहवाल तयार करण्यात आला आहे. त्यानुसार जगात सर्वाधिक खासगी शिकवण्या या गणितासाठी लावल्या जातात. त्याचे प्रमाण ६६ टक्के आहे. त्यानंतर भौतिकशास्त्राचा क्रमांक असून त्याचे प्रमाण ४३ टक्के आहे. त्यातही आशिया खंडातील देशांमध्ये त्याचे प्रमाण अधिक आहे. भारताचा विचार करायचा झाल्यास ५५ टक्के विद्यार्थी खासगी शिकवण्यांवर अवलंबून आहेत.

गणित हे कठीण आहे असा सार्वत्रिक समज असला तरी सर्वाधिक अभ्यासाला जाणारा विषयही गणितच आहे. अगदी पूर्वी शास्त्र, शस्त्र आणि कौशल्यांचा अभ्यास करतानाही गणिताचा अभ्यास करावाच लागत होता.

या अहवालानुसार गणितानंतर अभ्यासला जाणारा विषय म्हणजे इंग्रजी. देशानुसार यात काही बदल होतात. म्हणजे चीनमध्ये इंग्रजीपेक्षा इतिहास आणि स्थानिक भाषांच्या अभ्यासाला अधिक महत्त्व दिले जाते. अमेरिका, अर्जेटिना या देशांमध्ये मानव्यविज्ञान, सामाजिक शास्त्र या विषयाना महत्त्व दिले जाते. परंतु गणिताचे स्थान अबाधित आहे.

या अहवालात आणखी एक महत्त्वाचे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे. ते काहीसे पालकांच्या डोळ्यात अंजन घालणारे आहे. जागतिकीकरणाच्या ओढय़ात नोकरीसाठीच फक्त शिक्षण अशा काहीशा मानसिकतेत शास्त्र विषयाच्या अभ्यासाकडे ओढा वाढला. मात्र आवडणाऱ्या विषयाचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अल्प असल्याचे निरीक्षण या अहवालात नोंदवण्यात आले आहे. कला आणि सामाजिक शास्त्र विषय आवडत असूनही विद्यार्थी त्याचे शिक्षण घेत नाहीत. या अहवालासाठी करण्यात आलेल्या सर्वेक्षणात २२ टक्के मुलांना संगीत आवडत असल्याचे समोर आले. २१ टक्के मुलांना कला आवडत होती, १७ टक्के मुलांना नाटय़ात रुची होती, तर १३ टक्के मुलांना साहित्य आवडत होते. असे असतानाही ही मुले शिक्षण मात्र वेगळ्याच विषयातील घेत असल्याचे समोर आले.

विद्यार्थी सर्वाधिक संख्येने गणित शिकत असले तरी ती त्यांची आवड असतेच असे नाही, मात्र ते शिकणेही तेवढेच महत्त्वाचे असल्याचे हा अहवाल नमूद करतो.

संकलन – रसिका मुळ्ये