सुरेश वांदिले

एमबीए प्रवेशासाठीची कॉमन एन्ट्रस एक्झामिनेशन – कॅट आणि कॉमन मॅनेजमेंट अ‍ॅप्टिटय़ूड टेस्ट – सीमॅटनंतर महत्त्वाची परीक्षा म्हणजे नरसी मोनजी मॅनेजमेंट अ‍ॅप्टिटय़ूड टेस्ट – एनमॅट.

*     परीक्षेचे स्वरूप

एनमॅट ही परीक्षा नरसी मोनजी इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स युनिव्हर्सटिीसाठी ग्रॅज्युएट मॅनेजमेंट अ‍ॅडमिशन कौन्सिलमार्फत घेतली जाते. हीच संस्था जीमॅट म्हणजेच ग्रॅज्युएट मॅनेजमेंट अ‍ॅप्टिटय़ूड टेस्ट घेते. एनमॅट ही संपूर्णरीत्या संगणकावर आधारित परीक्षा आहे. व्यवस्थापन शाखेच्या अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांच्या बौद्धिक कल तपासणीसाठी या परीक्षेची संरचना केली जाते.

या परीक्षेचे महत्त्वाचे वैशिष्ट म्हणजे या परीक्षेचा कालावधी ७५ दिवसांचा असून या कालावधीत ही परीक्षा प्रत्येक उमेदवारास तीनदा देता येते. समजा, एखाद्या उमेदवाराची पहिली परीक्षा समाधानकारक गेली नसेल तर तो दुसऱ्यांदा किंवा तिसऱ्यांदासुद्धा ही परीक्षा देऊ शकतो. या तीनपैकी ज्या परीक्षेत सर्वोच्च गुण मिळाले असतील ते अंतिम गुण म्हणून स्वीकारले जातात. तसेच या तीन प्रयत्नांसाठी विद्यार्थी मोबाइलद्वारे आपल्या सोयीनुसार वेळ, तारीख व जागांच्या उपलब्धतेनुसार परीक्षा केंद्र निवडू शकतात. देशात त्यांची ४८ केंद्रे आहेत. त्यापैकी महाराष्ट्रात नागपूर, मुंबई, नाशिक, पुणे ही केंद्रे आहेत. तसेच या परीक्षेत नकारात्मक गुणपद्धती नाही, म्हणजेच चुकलेल्या उत्तरांचे गुण कापले जात नाहीत.

वेळापत्रक – या परीक्षेच्या ७५ दिवसांचे वेळापत्रक घोषित झाले आहे. ४ ऑक्टोबर २०१८ पासून त्याची सुरुवात होत असून १७ डिसेंबर २०१८ ला शेवटची परीक्षा घेण्यात येईल. अंतिम निकाल जानेवारी २०१९च्या तिसऱ्या आठवडय़ात घोषित केला जाईल.

या परीक्षेतील गुणांद्वारे खालील संस्था विद्यार्थ्यांना प्रवेशाच्या प्रारंभिक टप्प्यासाठी निवडतात.

(१)    एस.पी.जैन इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च-मुंबई,

(२)    बेनेट युनिव्हर्सटिी – ग्रेटर नॉयडा,

(३)    व्हीआयटी युनिव्हर्सटिी-वेल्लोर,

(४)    बीएसई-बॉम्बे स्टॉक एक्सचेंज इन्स्टिटय़ूट,

(५)    नरसी मोनजी इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स,

(६)    अथेना इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स- मुंबई,

(७)     अलायन्स युनिव्हर्सटिी – बेंगळूरु,

(८)     एल.एम. थापर स्कूल ऑफ मॅनेजमेंट,

(९)    युनिव्हर्सटिी ऑफ पेट्रोलियम स्टडिज स्कूल ऑफ मॅनेजमेंट – देहरादून,

(१०)    हैदराबाद स्कूल ऑफ बिझिनेस,

(११)    झेवियर युनिव्हर्सटिी-भुवनेश्वर,

(१२)    आयबीएस बिझिनेस स्कूल- हैदराबाद/मुंबई,

(१३)    स्कूल ऑफ पेट्रोलियम मॅनेजमेंट – गांधीनगर, अहमदाबाद,

(१४)     अहमदाबाद युनिव्हर्सटिी,

(१५)     बीएमल मुंजाळ युनिव्हर्सटिी,

(१६)     शिव नादर युनिव्हर्सटिी, गौतमबुद्धनगर,

(१७)     ओ.पी.जिंदाल युनिव्हर्सटिी, दिल्ली,

(१८)     मोदी युनिव्हर्सटिी,

(१९)     ऑक्सन स्कूल ऑफ मॅनेजमेंट, हैदराबाद,

(२०)     इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट, मुंबई,

(२१)     एसडीए बोकोनी एशिया सेंटर, मुंबई

(२२)    आयएसबीआर बिझिनेस स्कूल, बेंगळूरु,

(२३)    अ‍ॅमिटी युनिव्हर्सटिी,

(२४)    गितम स्कूल ऑफ इंटरनॅशनल-विशाखापट्टण

(२५)    एसआरएम युनिव्हर्सटिी-चेन्नई बिझिनेस यांचा समावेश आहे.

उपरोक्त नमूद ज्या कोणत्या पाच बिझिनेस स्कूलमध्ये प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी पर्याय दिला असेल त्या संस्थेला या विद्यार्थ्यांचे गुण प्रारंभिक नोंदणी रकमेमध्येच (रजिस्ट्रेशन फी)मध्ये पाठवले जातात. मात्र त्यानंतरच्या इतर संस्थांना हे गुण संबंधित संस्थेचे प्रवेश शुल्क भरून विद्यार्थ्यांना पाठवावे लागते. तीनही प्रयत्नांचा निकाल विशिष्ट कालावधीत घोषित केला जातो. हे गुण विद्यार्थ्यांना कळू शकतात. त्यानुसार विद्यार्थी कोणत्या बिझिनेस स्कूलसाठी पात्र ठरू शकतात याचा अदमास घेऊन संबंधित संस्थेसाठी अर्ज करू शकतात.

*     अशी असते परीक्षा –

या परीक्षेत भाषा कौशल्य, संख्यात्मक /परिणामात्मक कौशल्य (क्वांटिटेटिव्ह स्किल्स), ताíकक कौशल्य (लॉजिकल स्किल्स) या तीन घटकांचे तीन विभाग असतात. या तीन घटकांवर आधारित बहुपर्यायी वस्तुनिष्ठ पद्धतीचे प्रश्न विचारले जातात. प्रत्येक भागासाठी पुढीलप्रमाणे वेळ दिला जातो व प्रश्न विचारले जातात. भाषा कौशल्य – ३२ प्रश्न, वेळ २२ मिनिटे, संख्यात्मक / परिणामात्मक कौशल्य – ४८ प्रश्न, वेळ ६० मिनिटे, तार्किक कौशल्य- ४० प्रश्न, वेळ ३८ मिनिटे. दिलेल्या वेळेतच हे प्रश्न सोडवणे आवश्यक असतात. एखादा विभाग पूर्ण झाल्यावर विद्यार्थी दुसऱ्या विभागामध्ये गेल्यास त्याला पुन्हा आधीच्या विभागात जाता येत नाही. किंवा आधीचे विभाग अपूर्ण राहिल्यास त्याला त्याचे प्रश्न सोडवता येत नाही.

सोडवलेली उत्तरे प्रत्येक विभागासाठी दिलेल्या वेळेमध्ये पुन्हा तपासता येतात. हा वेळ संपल्यानंतर त्याला अशी तपासणी करता येत नाही. एखाद्या विभागामधील प्रश्न दिलेल्या वेळेआधीचे पूर्ण झाले तरी तो वेळ दुसऱ्या विभागासाठी वापरता येत नाही. विद्यार्थी कोणताही विभाग सर्वात आधी सोडवायला घेऊ शकतो.

*    सरावासाठी साहाय्य

या परीक्षेच्या सरावासाठी एक मोफत सराव परीक्षा देण्याची सुविधा देण्यात आली आहे. त्यातील १२० प्रश्नांच्या उत्तरांचे विश्लेषणही मोफत उपलब्ध करून दिले जाते. तसेच आणखी दोन सराव प्रश्नपत्रिका सोडवण्याची सुविधा विशिष्ट शुल्क आकारून उपलब्ध करून दिली जाते. यातील प्रश्नांच्या उत्तरे आणि त्याच्या विश्लेषणाचा यामध्ये समावेश असतो. ( संपर्क – दूरध्वनी- ८२१ ४२८ २०००, ईमेल – NMATSupport@excelindia.com) या परीक्षेच्या तयारीसाठी एनमॅटने एक अधिकृत पुस्तकही तयार केले आहे. पुस्तकाचे नाव, एनमॅट बाय जीएमएसी, ऑफिसिअल गाइड-२०१८ असे असून ते ऑनलाइन खरेदीसाठी उपलब्ध आहे.

*   एनएमआयएमएस – नरसी मोनजी इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज

एनमॅटमधील गुण प्रारंभिक चाळणीसाठी निवडणारी महत्त्वाच्या संस्था म्हणजे एनएमआयएमएस. या बिझनेस स्कूलच्या मुंबई, नवी मुंबई, इंदौर, हैदराबाद आणि बेंगळूरु येथे  शाखा आहेत. प्रारंभिक चाळणीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांची समूह चर्चा आणि मुलाखतीनंतर अंतिम निवड केली जाते.मुंबईतील कॅम्पसमध्ये एमबीए अभ्यासक्रम चालविला जातो.

एमबीए (जनरल)

अर्हता – कोणत्याही विषयातील ५० टक्के गुणांसह पदवी (एकूण जागा- ५००),

एमबीए (फार्मास्युटिकल मॅनेजमेंट)

अर्हता- ५० टक्के गुणांसह

पदवी – विज्ञान, औषधीनिर्माणशास्त्र / एमबीबीएस / बीडीएस / बीएचएमएस / बीएएमएस / बीएस्सी इन बायोटेक्नॉलॉजी किंवा एम.एस्सी. इन बायोटेक्नॉलॉजी

पदव्युत्तर पदवी – अर्थशास्त्र, मानसशास्त्र, समाजशास्त्र. बीटेक / बीई इन बायोटेक्नॉलॉजी/बायोमेडिकल

(एकूण जागा-६०)

एमबीए (ह्य़ुमन रिसोर्स)

अर्हता- कोणत्याही विषयातील ५० टक्के गुणांसह पदवी (एकूण जागा- ६०)

एमबीए हा अभ्यासक्रम या तीन शाखांमध्ये करता येतो. यापकी ३० टक्के जागा महिलांसाठी राखीव असतात.

नवी मुंबई, हैदराबाद, इंदोर आणि बेंगळूरु येथे पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मॅनेजमेंट हा अभ्यासक्रम करता येतो.

हे सर्व अभ्यासक्रम दोन वर्षांच्या कालावधीचे आहेत.

संपर्क- हेल्प डेस्क- ०१२० ४३९७८५५

ईमेल – nmatbygmacsupport@pearson.com

संकेतस्थळ – http://www.nmat.org.in