डॉ. सिद्धिविनायक बर्वे

बदलत्या जगासोबत करिअर्सही बदलत आहेत. अगदी काही वर्षांपूर्वी नॅनो तंत्रज्ञान, जीवतंत्रज्ञान, रोबोटिक्स असे केवळ शास्त्रज्ञांच्या जगातील भासणारे शब्द आज करिअर संधींसाठी परवलीचे झाले आहेत. करिअरच्या अवकाशात उदयास येणाऱ्या अशाच नवीन ‘करिअर क्षितिजां’विषयीचे हे नवे सदर.

एकविसावे शतक हे विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे शतक म्हणून ओळखले जाते,  त्याचबरोबर स्पर्धेचे युग म्हणूनही ओळखले जाते. ज्याच्याकडे तंत्रज्ञान आणि ज्ञानाची यशस्वी सांगड घातली जाईल, यश त्याचेच असेल असा या शतकाचा मंत्र.

या एकविसाव्या शतकात जागतिक स्तरावर भारताला एक वैशिष्टय़पूर्ण स्थान प्राप्त झाले आहे. आज आपला देश जगातील सर्वात तरुण देश म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. येथील १५ ते ५५ या वयोगटांतील कार्यक्षम लोकसंख्या भारतातील एकूण लोकसंख्येच्या ६५ टक्के इतकी प्रचंड असल्याने एकविसाव्या शतकात जागतिक स्तरावर एकूण काम करणाऱ्या प्रत्येक सहा व्यक्तींमधील एक व्यक्ती भारतीय असणार आहे. या लोकसंख्येसाठी नोकरी-व्यवसायाच्या योग्य संधी निर्माण करणे हे एक आव्हान ठरणार आहे.

जगात व्यावसायिक स्तरावर करिअरच्या संधी मोठय़ा प्रमाणावर उपलब्ध होताहेत. जगभर व्यावसायिक क्षेत्र विकसित होत असताना युवकांसाठी उपलब्ध असणारी करिअरची क्षितिजे मोठय़ा प्रमाणात विस्तारत आहेत. आधुनिक युगात व्यावसायिक क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी करिअरचे फंडेही झपाटय़ाने बदलत आहेत.

व्यावसायिक दृष्टीने करिअरचा विचार केल्यास युवकांपुढे करिअरच्या अमर्याद संधी असल्याने अनेकदा यातले नेमके कोणते करिअर निवडावे, याविषयी संभ्रमाची स्थिती निर्माण होऊ शकते. भारत हा एक विकसनशील देश आहे. गेल्या ५० वर्षांच्या काळात भारतात शिक्षणाची नवनवीन क्षितिजे युवकांसाठी उपलब्ध झाली आहेत. मात्र आपल्या तरुणांचा कल व्यावसायिक शिक्षणाकडे अधिक असल्याचे आढळून आले आहे. जग मात्र झपाटय़ाने बदलते आहे. जागतिक स्तरावर उपयोजित शिक्षणावर अधिकाधिक भर असल्याचे आढळून येते आहे. आंतरशाखीय शिक्षणावरही अधिकाधिक भर दिला जात आहे. भावी काळात योग्य करिअरसाठी आवश्यक असलेली कौशल्ये बदलत आहेत आणि मिळवलेले ज्ञानही झपाटय़ाने कालबाह्य़ होते आहे.

बदलत्या काळानुसार करिअरची बदलणारी क्षितिजे लक्षात घेता चाकोरीबाहेरील शिक्षण महत्त्वाचे ठरते आहे. शिक्षणासाठी देश-विदेशाची बंधने गळून पडत आहेत. भारतीयांनी आयटी क्षेत्रात आपला दबदबा निर्माण केला आहे. कॉम्प्युटर क्षेत्रातील या क्रांतीनंतर जगभरात नवीन क्रांती उलगडतेय ती जीवतंत्रज्ञानाची. शतकाचे शास्त्र म्हटले गेलेल्या जीवतंत्रज्ञानाचा अर्थात बायोटेक्नॉलॉजीचा विस्तार जगभरात झपाटय़ाने होत आहे. मानवी जीवनाला स्पर्श करणाऱ्या जवळपास प्रत्येक क्षेत्रात जीवतंत्रज्ञानाचा वापर वाढतो आहे. शेती, पशुपालन, उद्योग, औषधनिर्मिती, आरोग्य इतकेच काय पण पर्यावरण क्षेत्रातही जीवतंत्रज्ञानामुळे क्रांती घडते आहे. मानवी जीवनात आमूलाग्र बदल घडविण्याची क्षमता असलेले जीवतंत्रज्ञान युवकांसाठी करिअरचा एक उत्तम पर्याय होऊ शकते.

जीवतंत्रज्ञान हे एक उपयोजित शास्त्र आहे. अनेक ज्ञानशाखांच्या अंतर्भावातून जीवतंत्रज्ञान विकसित होते. हे शास्त्र जैविक प्रक्रियांचा मानवी कल्याणासाठी वापर करून घेणारे शास्त्र आहे. दुधाचे दही होणे ही एक जैविक प्रक्रिया आहे. तसेच मद्यार्कनिर्मितीस कारणीभूत ठरणारी किण्वन प्रक्रिया हीसुद्धा एक जैविक प्रक्रिया आहे. अशा अनेक जैविक प्रक्रियांचा मोठय़ा प्रमाणावर मानवी कल्याणासाठी वापर करण्याचे तंत्र विकसित करणारे शास्त्र आहे, जीवतंत्रज्ञान.

आपला देश कृषीप्रधान आहे. निसर्गाचे वरदान लाभलेला देश आहे. जगात आढळणारे सर्व प्रकारचे वातावरण भारतात आढळून येते. सोबतच आपल्या देशाला मोठी सागरी किनारपट्टी लाभली आहे. पावसाळ्यातील जलवर्षांवाबरोबरच वर्षांतील जवळपास आठ महिन्यांहून अधिक काळ स्वच्छ सूर्यप्रकाशाचे वरदान लाभलेला आपला देश आहे. सर्व ज्ञानशाखांचा समावेश असणारे एक आधुनिक तंत्रज्ञान म्हणून जीवतंत्रज्ञानाकडे पाहायला हवे. वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र, जीवरसायनशास्त्र, पदार्थ विज्ञान, संगणक शास्त्र, संख्याशास्त्र अशा अनेक ज्ञानशाखांच्या अंतर्भावातून निर्माण होणारे जीवतंत्रज्ञान हे शास्त्र आहे. त्यामुळे व्यक्तीबरोबरच देशाचेही भवितव्य घडवण्याचे वर्षे त्यात आहे. याच जीवतंत्रज्ञानातील संधींविषयी आपण पुढील लेखांतून माहिती घेणार आहोत.

(लेखक सायंटिफिक रिसर्च सेंटर, मुलंड येथे संचालक पदावर कार्यरत आहेत.)