डॉ. अमृता इंदुरकर

अबर-चबर 

‘दिवाळीमध्ये फराळानिमित्त हमखास इतके अबर-चबर पदार्थ खाण्यात येतात!’ किंवा ‘संध्याकाळी चहासोबत काही तरी अबर-चबर तोंडात टाकायला हवंच असतं.’ समस्त मराठी घरांमधे ‘नमकीन’ प्रकारात मोडणाऱ्या पदार्थाना अबर-चबर संबोधले जाते. हा अबर-चबर शब्द कसा तयार झाला असावा? कारण यावरूनच ‘अर्बट-चर्बट खाणे’ असा वाक्प्रयोगही रूढ झालेला आहे. मूळ फारसी नपुंसकलिंगी शब्द आहे ‘चर्ब्’ ज्याचा अर्थ आहे रोजच्या जेवणाव्यतिरिक्त तेलकट, तळीव, खुसखुशीत पदार्थ. जरी चर्बचा उच्चार करताना ‘र’ आधी उच्चारला जात असला तरी उच्चारसुलभतेसाठी या चर्बवरून चबर तयार झाला आणि बोलभाषेत जशी सटर-फटर, अटरम-सटरम ही रूपे तयार झाली तसे अबर-चबर हे रूप तयार झाले. काही मराठी शब्दकोशात याचा अर्थ बेचव, नीरस, जाडेभरडे असाही दिला आहे. तरी ज्या उद्देशाने सध्या मराठीत हा वापरला जातो तो अर्थ मूळ फारसी अर्थाच्या अधिक जवळ जाणारा आहे.

महिरप

एखाद्या बंगलावजा इमारतीचे प्रवेशद्वार महिरपी आकाराचे असते. तर एखाद्य मंदिर/ मशिदीचे संपूर्ण स्थापत्यच महिरपी देऊन तयार केलेले असते. तर एखाद्या रांगोळीत महिरपी आकार देऊन ती रांगोळी अधिक आखीव-रेखीव केली जाते. एवढेच काय हा कमानदार महिरप शब्द गणितासारख्या विषयातदेखील ऐटीत जाऊन बसलेला आहे. लहानपणी साध्या कंसापेक्षा महिरपी कंसातील आकडे प्रत्येकालाच विशेष प्रिय असत. तर हा महिरप शब्द मूळ अरबीतून आला आहे. मूळ स्त्रीलिंगी शब्द आहे ‘मैराप’. मैराप म्हणजे विशिष्ट पद्धतीची कमान. त्याचा पुढे तयार झाला महिराप आणि यावरून पुढे महिरप. सुप्रसिद्ध शाहीर परशराम यांच्या रचनेत त्यांनी सजावटीसंदर्भात पुढील उल्लेख केला आहे- ‘मैरापीच्या सर्जा केल्या जशी दुसरी द्वारका’

amrutaind79@gmail.com