डॉ. अमृता इंदुरकर

बेफाम

‘चालकाने बेफामपणे गाडी चालवत दोघांना चिरडले.’ हे वाक्य अपघाताच्या बातम्यांमध्ये हटकून वाचायला मिळते. आपल्या रोजच्या वाचण्या-बोलण्यातला हा शब्द अरबी, फारसी दोन्हींमध्ये प्रचलित आहे.  मूळ शब्द आहे  ‘फहम्/ फाम’ म्हणजे समजूत, अक्कल, चित्तस्थिरता. यावरूनच जो अक्कलवन्त असतो त्यासाठी फामिन्दा हा शब्द वापरतात. अशी चित्तस्थिरता ज्याच्यामध्ये नाही, अक्कल नाही, समजूतदारपणा नाही त्यासाठी या ‘फाम’ ला ‘बे’ हा पूर्वप्रत्यय लागला. अरबी, फारसीमध्ये ‘बे’ हा पूर्वप्रत्यय लागून तयार होणारे शेकडय़ाने शब्द आहेत. त्यावरून तयार झाला ‘बेफाम.’ जो गाफिल, बेसावध, निश्चिन्त, अनावर, शुद्ध नसलेला आहे तो म्हणजे बेफाम. खरे यांच्या ऐतिहासिक लेखसंग्रहामध्ये ‘शत्रू माघारा गेला म्हणून बेफाम नाही, सावधच आहो’ असा उल्लेख आहे. तर चित्रगुप्ताच्या बखरीत ‘लोक बेफाम पाहून शहर मारिले’ असा शब्द आहे. यावरून गाफिल असल्याचे बघून आक्रमण करून शहर मारले या अर्थाचा उल्लेख आढळतो.  वर्तमान मराठीत मात्र गाफिल या अर्थापेक्षाही बेजबाबदार, बेछूट वागणे या अर्थासाठी बेफाम शब्द वापरला जातो.

मातब्बर

एखादे व्यक्तिमत्त्व मातब्बर आहे, म्हणजे वजनदार आहे. (किलोचे वजन नव्हे.)ज्याच्या शब्दाला वजन, किंमत आहे, ज्याच्याकडे एक सकारात्मक सत्ता आहे. उदा. खेडेगावातील सरपंच, पोलीस पाटील इ.  याचा मूळ अरबी शब्द आहे, मुअतबर. याचा अर्थ विश्वसनीय, थोर, श्रीमंत, प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्व. ज्याची त्या गावात, प्रदेशात मातब्बरी चालते. अरबीमध्येसुद्धा मुअतबरी म्हणजे मातब्बरी असे स्त्रीलिंग विशेषण आहे.  खरे यांच्या ऐतिहासिक लेखसंग्रहामध्ये याचा उल्लेख आहे – ‘जे कर्तव्य ते सलाबतीने मातबरीने आपली इभ्रत शह याजवरी पडोन नक्ष होय ते करावे.’ म्हणजेच आपली पत, प्रतिष्ठा, महत्त्व, थोरवी याला शोभेल असे कर्तव्य करावे असे सुचविले आहे. हा शब्द मातबर / मातब्बर किंवा  मातबरी/ मातब्बरी अशा दोन्ही पद्धतीने लिहिला जातो.

amrutaind79@gmail.com