04 March 2021

News Flash

शब्दबोध

समुद्रातून ये-जा करणाऱ्या मोठय़ा जहाजाला हा सुकाणू असतो जेणेकरून समुद्रप्रवासाची दिशा निश्चित करून त्यानुसार जहाज वळविता येते.

(संग्रहित छायाचित्र)

डॉ. अमृता इंदुरकर

सुकाणू

‘ज्याच्या हाती संपूर्ण जहाजाचा सुकाणू आहे तो ते जहाज कसे बरे भरकटू देईल?’ सुकाणू म्हणजे गलबत विशिष्ट दिशेस वळविण्याचे त्याच्याच मागच्या बाजूस पाण्यात असलेले एक साधन. साधारणत: गोल, चक्राकार असे हे सुकाणू असते किंवा एक मोठा दांडा असतो जो वर्तुळाकार, कुठल्याही दिशेला फिरवता येतो. समुद्रातून ये-जा करणाऱ्या मोठय़ा जहाजाला हा सुकाणू असतो जेणेकरून समुद्रप्रवासाची दिशा निश्चित करून त्यानुसार जहाज वळविता येते.

या अर्थावरून पुढे मराठीत ‘सुकाणू’ हा शब्द वाङ्मयविश्वातही लक्षाणार्थाने वापरला जाऊ  लागला. बा.सी.मर्ढेकर यांच्या कवितेतून हे स्पष्ट होते. –

त्वत्स्मृतीचे ओळखू दे

माझिया हाता सुकाणू

थोर- यत्न शांति दे गा

माझिया वृत्तीत बाणू

ईश्वराला उद्देशून मर्ढेकर म्हणत आहेत की, माझ्या हातातील आयुष्यरूपी सुकाणूला तुझ्या स्मरणाची कायमच ओळख असू दे जेणेकरून माझ्या जीवनाला योग्य दिशा मिळेल.

असा हा सुकाणू शब्द मूळ अरबी आणि संस्कृत पण आहे अशी दोन्ही मते आहेत. अरबीत मूळ ‘सुक्कान्’ यावरून सुकाणू तयार झाला आहे. ज्याचा अर्थ गलबत वळविण्याचे एक साधन असाच आहे. मराठीत मात्र हा सुकाणू शब्द चांगलाच स्थिर झाला आहे. आणि तो विविध अर्थव्याप्तीने वापरलाही जातो.

हुबेहूब

अमुक ती विविध पक्ष्यांचे हुबेहूब आवाज

काढते. बालगंधर्व चित्रपटात सुबोध भावे

हुबेहूब बालगंधर्वच दिसतो. दिसणे, वागणे, बोलणे, करणे, हसणे अशा कितीतरी लकबींसाठी, क्रियांसाठी हुबेहूब हे क्रियाविशेषण वापरतो. मूळ फारसी ‘ऊ – ब- ऊ / हु – ब – हु ’ वरून हुबेहूब हा शब्द तयार झाला. फारसी हु – ब – हु चा अर्थ जसेच्या तसे, एकसारखे, एक प्रकारचे, संपूर्ण सादृश्यता असलेले असा आहे. हाच अर्थ मराठीत पण आहे फक्त शब्दाच्या रूपात बदल झाला.

amrutaind79@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 15, 2018 3:09 am

Web Title: article about word sense 3
Next Stories
1 एमपीएससी मंत्र : जागतिक स्तरावरील भूक आणि पोषणाची स्थिती
2 यूपीएससीची तयारी : एथिक्स अँड इंटेग्रिटी एक आढावा
3 संशोधन संस्थायण : अंदाज हवामानाचा
Just Now!
X