21 October 2019

News Flash

शब्दबोध : हातखंडा

एखादे काम हमखास पार पाडण्याचे कौशल्य अंगी असणे, म्हणजे हातखंडा.

(संग्रहित छायाचित्र)

डॉ. उमेश करंबेळकर

हातखंडा

एखादे काम हमखास पार पाडण्याचे कौशल्य अंगी असणे, म्हणजे हातखंडा. तर हातखंड म्हणजे मधून मधून सोडवणूक करणारा, मदतनीस (मूल, मित्र, शेजारी) तसेच अडल्यावेळी उपयोगी पडणारी अशी व्यक्ती.

एखादा कारागीर त्याच्या कलेत अतिशय निष्णात असेल, त्या कलेत त्याचा हात धरणारा दुसरा कुणी नसेल तर त्याच्या कामाचे वर्णन हातखंडा काम असे केले जाते. गालिच्यांवर नाजूक कलाकुसर करणारे, दगडी शिल्पांमधे सजीवतेचा आभास निर्माण करणारे, ताजमहालसारख्या कलाकृतीमधे संगमरवरावर सुंदर नक्षीकाम करणारे अशा विविध कलांमधे श्रेष्ठ असणाऱ्या कलावंतांचे कार्य हे हातखंडा काम म्हणून ओळखले जाते. एवढेच काय रोजच्या व्यवहारातही, स्वयंपाकातला पुरणपोळीसारखा पदार्थ करण्यात एखादी गृहिणी वाक्बगार असेल तर पुरणपोळी म्हणजे तिचे हातखंडा काम असे अभिमानाने सांगितले जाते.

पण हे सगळे असे असले तरी हातखंडा काम या वाक्प्रचारामागे एक कटू सत्य आणि भीषण वास्तवता दडली आहे, हे आपल्याला कदाचित माहितीही नसेल. पूर्वीच्या काळी राजे-महाराजे, सुलतान, जहागीरदार यांसारखे राज्यकर्ते आपल्या राज्यातील, संस्थानातील कुशल कारागिरांकडून एखादे अलौकिक शिल्प, वास्तू किंवा स्वत:चे चित्र तयार करून घेत. पण त्यानंतर भविष्यात या कारागिरांनी इतरत्र कुठेही अशा तऱ्हेचे किंवा याहून चांगलं काम करू नये म्हणून त्यांना एक आगळेवेगळे बक्षीस देत. त्यांचे हात छाटून टाकत. त्यावरून हातखंडा काम हा वाक्प्रचार तयार झाला असावा.

चि. वि. जोशींच्या ओसाडवाडीच्या देव या छोटय़ा, पण अतिशय सुंदर पुस्तकात सुरुवातीलाच ओसाडवाडीतील गणपतीच्या मंदिरातील गणपतीच्या मूर्तीचे वर्णन आपल्या वाचनात येते. ते असे, ‘ही गणपतीची मूर्ती इतकी सुंदर आहे की, ती तयार करणाऱ्या कारागिराचे हात तोडून राजाने त्याला जहागीर बक्षीस दिली होती. याला म्हणतात हातखंडा काम! पूर्वीचे राजेलोक कलेला अशा प्रकारचे उत्तेजन देत असत.’

हातखंडा काम या वाक्प्रचारामागचे हे सत्य माहीत झाल्यावर एखाद्या कलाकाराच्या कामाचे वर्णन करताना हातखंडा काम हा शब्दप्रयोग करण्यापूर्वी आपण दहादा विचार करू. नाही का?

First Published on January 10, 2019 2:01 am

Web Title: article about word sense 5