डॉ. उमेश करंबेळकर

अक्षता हा शब्द आपल्या अगदी चांगला परिचयाचा. लग्नाच्या वयाचा तरुण मुलगा किंवा मुलगी घरात असेल तर यांच्या डोक्यावर कधी एकदा अक्षता पडतात, अशी काळजी बहुतांश माता-पित्यांना लागलेली दिसते. लग्नाच्या हंगामात तर कधी कधी एकाच तिथीची दोन आमंत्रणं येतात. अशा वेळी एका लग्नाच्या पहिल्या मंगलाष्टकाला अक्षता टाकून मंडळी दुसऱ्या लग्नाचं शेवटचं मंगलाष्टक गाठण्याची चतुराई दाखवतात. ही झाली गमतीची बाब पण लग्न आणि अक्षता यांचे नाते असे अतूट.

अक्षता या शक्यतो अखंड तांदळाच्याच घेण्याची एक पद्धत आहे. तुकडा तांदूळ त्याला चालत नाही, कारण अक्षत म्हणजे जे क्षत किंवा भंगलेले नाही ते. अक्षता हे प्रतीक आहे. काहींच्या मते त्यातून वधूचे कौमार्य सूचित होते. म्हणून अक्षतांचे तांदूळ अखंड असतात. गीर्वाणलघुकोशात याचा अर्थ पुरुषसंबंधरहित स्त्री असा दिलेला आहे. या शब्दाला अक्षतयोनि: असा पर्यायी शब्दही दिला आहे. काही मान्यतांच्या आधारे, यातून वधूच्या घरची सुबत्ता सूचित होते. तांदूळ हे भारतीयांचे मुख्य अन्न. लग्नाला उपस्थित असलेले नातेवाईक, आप्त, मित्र-परिवार तांदळाच्या अक्षता वधू-वरांच्या डोक्यावर टाकतात. वधूच्या घरी अन्नाची कमतरता नाही, म्हणून ते अशा अक्षता टाकू शकतात. पण याहीपुढे जाऊन एक वेगळाच विचारही आहे, अक्षतांचे तांदूळ हे एकप्रकारे बीजच असते. हे बीज रुजले की तांदळाचे रोप तयार होते. तांदळाच्या एका दाण्यापासून असे अनेक दाणे, पर्यायाने अनेक रोपे तयार होतात. म्हणजेच वंशवृद्धी होते. जैवसातत्य राखले जाते. लग्नात वधू-वरांच्या संसारवेलीलाही अशीच फलधारणा होऊन वंशवृद्धी व्हावी, असा भावही या अक्षतांमागे असावा असे वाटते.

निसर्गातही अक्षतांचा एक सोहळा चालू असतो. खरं म्हणजे निसर्ग स्वत:च अशी अक्षतांची उधळण दर वर्षी करत असतो. वसंत ऋतूत रानातील विविध प्रजातींच्या झाडांना फुलोरा येतो. त्यांना शेंगा, फळे लगडतात. पावसाळ्याच्या आधी काहींमधून कापसाच्या म्हाताऱ्या तयार होतात. वाऱ्यासवे त्या दूरवर पोहोचतात. पशू-पक्षी काही फळे खातात. त्यांच्या विष्ठेतून या फळांच्या बियांचा प्रसार होतो. निसर्ग अशा प्रकारे लक्षावधी अक्षता ग्रीष्मात उधळत असतो. त्यानंतर वर्षां ऋतू येतो आणि सृष्टीचा सृजनकाळ सुरू होतो.

जाता जाता एक छोटीशी गंमत म्हणजे, निसर्गाचा अक्षता उधळण्याचा काळ एप्रिल-मे महिन्यात असतो. आणि लग्नसराईचा म्हणजेच अक्षता उधळण्याचा आपला हंगामही तेव्हाच असतो. आहे की नाही गंमत!