18 July 2019

News Flash

शब्दबोध : भारूड

‘भारूड’ या शब्दाची निश्चित उत्पत्ती सांगणं कठीण आहे. काहींच्या मते ‘बहुरूढ’ या शब्दापासून भारूड शब्द तयार झाला असावा.

(संग्रहित छायाचित्र)

डॉ. उमेश करंबेळकर

सामान्य लोकांना सोप्या भाषेत अध्यात्माची शिकवण देण्यासाठी संतांनी ओवी, अभंग,भारूड अशा वेगवेगळ्या काव्यरचना केल्या. त्यातील जनसमुदायासमोर नाटय़मय रीतीने सादर केली जाणारी रूपकात्मक रचना म्हणजे भारूड. एकनाथपूर्व कालात ज्ञानेश्वर आणि नामदेव यांनी तर एकनाथांच्या पश्चात तुकाराम आणि रामदास यांनीही भारुडे रचली. असे असलं तरी एकनाथांचीच भारुडे सर्वात लोकप्रिय झालेली आढळतात. त्यामुळेच ‘ओवी ज्ञानेशाची’ , ‘अभंग तुकयाचा’ तसं ‘भारूड नाथांचं’ असं म्हटलं जातं.

‘भारूड’ या शब्दाची निश्चित उत्पत्ती सांगणं कठीण आहे. काहींच्या मते ‘बहुरूढ’ या शब्दापासून भारूड शब्द तयार झाला असावा. भारुडांचे विषय जोशी, पिंगळा, सन्यासी, माळी, जंगम अशा विविध समाजरूढींवर आधारलेले आहेत म्हणून ते बहुरूढ समजले जाते. याशिवाय ‘भा’ म्हणजे तेज त्यावर आरूढ झालेले ते भारूड किंवा भिरूंड नावाच्या द्विमुखी काल्पनिक पक्ष्याप्रमाणे एकाच वेळी दोन भिन्न अर्थ अभिव्यक्त करणारे म्हणून भारूड अशीही व्युत्पत्ती मानली जाते. यासोबतच भराडी जमातीत परंपरेने रूढ झालेले गीत म्हणजे भारूड असाही एक समज प्रचलित आहे.

एकनाथांच्या भारुडाचे वर्णन ‘आध्यात्मिक आणि नतिक शिक्षण देणारे मराठीतील रूपकात्मक नाटय़-गीत’ असे केले जाते. नाथांच्या भारुडांची संख्या जशी विपुल आहे तसेच त्यांचे विषयही विविध आहेत. बायला, दादला, भुत्या, वाघ्या, विंचू, कुत्रा, एडका इत्यादी विविध विषयांचे एकनाथ जे अचूक वर्णन करतात त्यावरून त्यांच्या सूक्ष्म आणि चौफेर निरीक्षणाची कल्पना येते. शिवाय अशा साध्या साध्या विषयांतून अध्यात्माचा गहन आशय ते ज्या प्रकारे व्यक्त करतात त्यातून त्यांची अलौकिक कल्पनाशक्ती आणि बुद्धिमत्ता प्रकट होते.

विंचू, दादला अशा बहुतेक भारुडांना विनोदाची झालर आहे. त्यामुळे भारुडाचे सादरीकरण लोकांना नेहमीच मनोरंजक वाटते. पण त्यातील आध्यात्मिक आशय साऱ्यांनाच उलगडतोच असे नाही. त्या दृष्टीने ‘कोडे’ हे भारूड बघा –

नाथाच्या घरची उलटी खूण। पाण्याला मोठी लागली तहान।

आत घागर बाहेर पाणी। पाण्याला पाणी आले मिळोनी।

यातील ‘पाण्याला मोठी लागली तहान’ याचा अर्थ आहे, ‘नाथांच्या आत्म्याला लागलेली परमात्म्याची ओढ.’ आता हा अर्थ साऱ्यांनाच सहज समजेल असे नव्हे. तरीही एकंदरीत नाथांची भारुडे रंजक आणि उद्बोधक आहेत, यात शंका नाही. या भारूड शब्दावरून आणखी एक वाक्प्रचार रूढ आहे. एखाद्या कार्यक्रमात एखादा माणूस फार वेळ कंटाळवाणे बोलू लागला की त्याला म्हणतात, काय भारूड लावलंय. आता ही अर्थछटा या शब्दाला नक्की कोणाच्या भारूड लावण्यामुळे मिळाली, ते काही माहिती नाही. पण आता या शब्दाबद्दल बोलणे इथेच थांबवायला हवे, नाहीतर वाचक हो, तुम्हीच म्हणाल, काय भारूड लावलंय!

First Published on March 7, 2019 12:00 am

Web Title: article about word sense bharud