News Flash

एमबीएची तयारी : ‘प्लेसमेंट’ची चिंता नको, पण पूर्वतयारी हवी!

संस्थेमध्ये जे विविध उपक्रम चालवले जातात तसेच जे वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात

एमबीए अभ्यासक्रमाला प्रवेश घेतानाच विद्यार्थ्यांकडून उपस्थित केले जाणारे प्रश्न म्हणजे संस्थेमध्ये प्लेसमेंट किती टक्के आहे?, प्लेसमेंटचे पॅकेज किती आहे?.. याचाच अर्थ की एमबीएला करणाऱ्यांसाठी प्लेसमेंट अर्थात नोकरी या घटकाला प्रचंड महत्त्व असते, किंबहुना ‘एमबीए करायचे तर फक्त प्लेसमेंटसाठीच’ असेही समीकरण बनले आहे. एखादे स्पेशलायझेशन घेतले तर चांगली प्लेसमेंट मिळेल अथवा एखाद्या स्पेशलायझेशनमुळे नोकरी मिळणार नाही असे अनेक गैरसमज अनेक विद्यार्थ्यांच्या मनात असतात. या लेखात अशा काही प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करूयात.
सर्वात पहिल्यांदा म्हणजे एमबीए अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर मिळणाऱ्या नोकरीचा विचार सुरुवातीसच करण्यात चुकीचे काही नाही. कारण शेवटी प्रत्येक जण आपापल्या करिअरचा विचार करतोच आणि त्यांनी तो केलाच पाहिजे. करिअरचे नियोजनसुद्धा त्यांनी केले पाहिजे. मात्र केवळ प्लेसमेंटचा विचार केला आणि इतर गोष्टींकडे दुर्लक्ष केले तर मात्र शेवटी आपले नुकसानच होते. प्लेसमेंटच्या मागे धावल्यास अभ्यासक्रमातील वेगवेगळ्या विषयांचा पाया कच्चा राहतो आणि मग शेवटी कसे तरी करून एमबीएची फक्त पदवी मिळते. आजच्या स्पर्धात्मक जगामध्ये केवळ पदवी मिळवणे परवडणारे नाही. नुसत्या पदवीची बाजारातील किंमत ही शून्य आहे हे लक्षात घेतले पाहिजे. एमबीएला फायनान्स घेऊन पदवी मिळवलेल्या विद्यार्थ्यांला जर कंपनीचे नफा-तोटा पत्रक आणि ताळेबंद समजत नसेल तर त्या पदवीला काय किंमत राहील हे प्रत्येकाने लक्षात घ्यावे. असा अनुभव आहे की, प्लेसमेंटच्या मागे जे पहिल्या दिवसापासून धावतात ते अभ्यासात कच्चे राहतात आणि मग शेवटी धड प्लेसमेंटही नाही व ज्ञानही नाही अशी अवस्था होते. अर्थात अशी अवस्था आपली होऊ नये, म्हणून आधीपासूनच योग्य ती दक्षता घेऊन अभ्यासाचे नियोजन करायला हवे. चांगली प्लेसमेंट हवी असल्यास उत्तम तयारी करावी लागते. अशी तयारी नसेल तर नुसत्या एमबीए पदवीच्या जोरावर प्लेसमेंट मिळणार नाही आणि मिळालीच तर मनासारखी मिळणार नाही हे लक्षात घेणे अत्यावश्यक आहे.
एमबीए झाल्यानंतर प्लेसमेंटसाठी अगदी पहिल्या दिवसापासून पूर्वतयारी करायला हवी. यामध्ये अभ्यासविषयक म्हणजेच आपण घेणार असलेल्या स्पेशलायझेशनची तयारी हा एक भाग आणि अभ्यासाव्यतिरिक्त इतर आवश्यक बाबींची तयारी हा दुसरा भाग. या दुसऱ्या भागाचा विचार केल्यास असे दिसते की, नोकरी मिळवण्यासाठी आवश्यक असणारे नेतृत्व गुण, संवादकौशल्ये, नोकरीच्या संधी, विविध क्षेत्रांची माहिती करून घेणे तसेच सर्वसाधारण व्यवस्थापनाची जी कामे आहेत ती समजून घेणे आदी अनेक बाबींचा समावेश होतो. नेतृत्व गुण वाढवण्यासाठी विविध उपक्रमांमध्ये सहभागी होणे तसेच संवाद कौशल्ये विकसित करणे यांसारख्या गोष्टी करता येतील.
संस्थेमध्ये जे विविध उपक्रम चालवले जातात तसेच जे वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात यामध्ये सहभागी व्हायला हवे. अनेक संस्थांमध्ये परिसंवाद, व्याख्याने, सांस्कृतिक कार्यक्रम इत्यादी उपक्रम आयोजित केले जातात. यामध्येही विद्यार्थ्यांनी पुढाकार घेऊन आयोजनात मदत करणे उपयोगी ठरते. यामुळे आत्मविश्वास वाढतो, नवनव्या गोष्टी कळतात, मोठय़ा व्यक्तींशी, त्यांच्या विचारांशी परिचय होतो. कार्यक्रमामध्ये निवेदनाची संधी मिळाल्यास आपोआपच सादरीकरणाचा (प्रेझेंटेशन) सराव होतो. महाविद्यालयातील हे उपक्रम सॉफ्ट स्किल्स अंगी बाणवण्याकरता उपयुक्त ठरतात. अशा उपक्रमांविषयी जर विद्यार्थ्यांनी उत्सुकता दाखवली नाही किंवा ते अनुपस्थित राहिले तर त्यात विद्यार्थ्यांचेच नुकसान होते.
जर विद्यार्थ्यांना अशा उपक्रमांमध्ये प्रत्यक्ष सहभागी होता आले नाही किंवा तशी त्यांना संधी मिळाली नाही तरी किमान या कार्यक्रमांना उपस्थित तरी राहावे. परिसंवादात किंवा व्याख्यानात मांडलेल्या विषयाद्वारे नव्या गोष्टींची निश्चितच माहिती होते. नोकरी मिळविण्यासाठी तसेच करिअरमध्ये प्रगती करण्यासाठी संघभावना, नेतृत्वक्षमता, संवादकौशल्य यांसारखी सॉॅफ्ट स्किल्स आवश्यक असतात. त्याकरता स्वत: पुढाकार घ्यायला हवा आणि वाया जाणारा वेळही वाचवायला हवा.
वृत्तपत्रांचे नेमाने वाचन केल्याचाही उपयोग होतो. आर्थिक विषयावरील वृत्तपत्रे तर जरूर वाचायला हवी. देशाच्या आर्थिक घडामोडींसंबंधी माहिती घ्यायला हवी. अशा प्रकारे प्लेसमेंटची तयारी करताना विद्यार्थ्यांना खरे तर वेळ अपुरा वाटायला हवा.
प्रत्यक्षात एमबीए किंवा कोणताही अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायला हवं की, शेवटी आपण करीत असलेल्या विविध गोष्टी ही वेळेची गुंतवणूक आहे आणि गुंतवणूक चांगली असेल तर त्यापासून उत्तम लाभ मिळेल.
प्लेसमेंटची तयारी करताना हे विसरून चालणार नाही की, अभ्यासक्रमातील विविध विषयांची तयारीही तितकीच महत्त्वाची आहे. गेल्या काही लेखांमध्ये नमूद केल्यानुसार, अभ्यास केवळ परीक्षा आणि मार्कापुरता मर्यादित न ठेवता, विषयांचा अभ्यास मुळापासून करायला हवा. स्पेशलायझेशन निवडताना आपला कल आणि आवड बघून काळजीपूर्वक निर्णय घ्यावा. केवळ आपल्या मित्र-मैत्रिणीने एखादा विषय घेतला आहे, म्हणून आपणही तो विषय घेतला पाहिजे असे नाही तसेच एखादे स्पेशलायझेशन अवघड किंवा एखादे सोपे असे काही नसते. बीकॉम किंवा बीबीए/ बीएमएम अभ्यासक्रम ज्यांनी केला आहे त्यांनीच फायनान्स हे स्पेशलायझेशन घ्यावे हा समजही खरा नाही. असंही म्हटलं जातं की, अभियांत्रिकी किंवा विज्ञान शाखेच्या पदवीधारकांनी फायनान्स स्पेशलायझेशन घेऊ नये, पण हाही समज खरा नाही. शेवटी कोणतेही स्पेशलायझेशन निवडले आणि त्यात सखोल अभ्यास केला तर यश हमखास मिळते. मात्र, त्यासाठी फक्त वरवरचा अभ्यास पुरेसा नाही हेही तितकेच खरे आहे. आपण निवडलेल्या स्पेशलायझेशनमधील नवीन बाबी समजून घेऊन आपले विषयाचे ज्ञान अद्ययावत ठेवता येते आणि त्याचा उपयोग नोकरीच्या ठिकाणी मुलाखत देताना निश्चितच होतो.
नोकरी मिळवताना आणखीही काही बाबींचा विचार करावा लागतो. जवळपास सर्वच संस्थांमध्ये प्लेसमेंटसाठी स्वतंत्र विभाग आहे आणि प्लेसमेंट ऑफिसर किंवा प्लेसमेंट इनचार्ज यांची नेमणूकही केलेली असते. मात्र, याबाबतची वस्तुस्थिती अशी आहे की, प्लेसमेंटची विविध कामे करण्यासाठी म्हणजे उदा. कंपन्यांची माहिती गोळा करणे (डेटा बेस), कंपनीच्या भेटींची वेळ ठरवणे, योग्य तो पत्रव्यवहार करणे यासाठी विद्यार्थी-विद्यार्थिनींचा सहभाग मिळणे हे आवश्यक असते. परंतु दुर्दैवाने असा प्रतिसाद समाधानकारक पद्धतीने मिळत नाही. प्लेसमेंट ही महत्त्वाची गोष्ट असूनही त्याबाबतच विद्यार्थी-विद्यार्थिनींची उदासीनता दिसते याचे खरोखर आश्चर्य वाटते. दुसरे महत्त्वाचे निरीक्षण म्हणजे एखाद्या कंपनीत मिळालेली नोकरी नाकारणे. साधारणपणे असा अनुभव आहे की, मुंबई-पुण्याबाहेर नोकरीची संधी असेल तर बऱ्याच वेळा ती नाकारली जाते. एक लक्षात ठेवले पाहिजे की, राष्ट्रीय पातळीवरील काही संस्था सोडल्या तर बाकीच्या संस्थांतील विद्यार्थी-विद्यार्थिनींना नोकरीच्या बाबतीत फार पर्याय नसतात. म्हणून नोकरीचा विचार करताना आपले पाय जमिनीवरच हवे. अर्थातच याचा अर्थ असा नव्हे की, मिळेल ती नोकरी मिळेल त्या वेतनावर स्वीकारावी. पण जर कंपनी चांगली असेल आणि सुरुवातीचे वेतन जर अपेक्षेपेक्षा थोडे कमी असेल तर भविष्यकाळातील करिअर संधीवर नजर ठेवून नोकरी स्वीकारावी. केवळ कंपनी मुंबई-पुण्यात नाही किंवा मुंबई-पुण्यात आहे, पण घरापासून लांब आहे किंवा आपल्या पसंतीच्या क्षेत्रात नाही म्हणून नोकरी नाकारणे हे अक्षरश: हास्यास्पद आहे. पण अशीही उदाहरणे आढळतात, म्हणून याबाबतीत दक्ष राहणे योग्य ठरते.
शेवटी असे म्हणता येईल की, एमबीए झाल्यानंतर जर सर्वच जण प्लेसमेंटच्या मागे लागले तर
उद्योजक कोण होणार? म्हणून स्वत: उद्योजक बनण्याचा प्रयत्न का करू नये? मात्र याकरता धोका पत्करण्याची तसेच ठरावीक वेळेतच काम
करण्याची मनोवृत्ती न ठेवणे अशा गोष्टी कराव्य लागतील.
सारांशाने असे म्हणता येईल की, एमबीए झाल्यानंतर चांगली प्लेसमेंट मिळणे हे संपूर्णपणे आपल्या स्वत:च्या मेहनतीवर अवलंबून आहे. आजचे युग स्पर्धात्मक आहे आणि म्हणून यश मिळवण्यासाठी स्वत:ची क्षमता वाढवणे हा एकमेव पर्याय आहे. याला कोणताही शॉर्टकट नाही. एमबीएच्या अभ्यासक्रमाच्या दोन वर्षांतील प्रत्येक क्षण योग्य प्रकारे वापरणे हे अत्यंत आवश्यक आहे. म्हणून प्लेसमेंटच्या बाबतीत संस्थांना दोष देत बसण्यापेक्षा तयारीला लागणे हाच खरा राजमार्ग ठरतो.

– नचिकेत वेचलेकर
nmvechalekar@yahoo.co.in

(लेखक पुण्याच्या इंडसर्च संस्थेचे अधिष्ठाता आहेत.)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 4, 2016 3:53 am

Web Title: article how to prepare for mba examination
टॅग : Mba
Next Stories
1 यूपीएससी : अभ्यासाची अपेक्षित रणनीती
2 एमपीएससी : सामान्य अध्ययनाची तयारी
3 जातिव्यवस्थेचे आकलन
Just Now!
X