फारुक नाईकवाडे

अखेर बहुप्रतीक्षित राज्य सेवा पूर्वपरीक्षेची तारीख (१४ मार्च) जाहीर झाली. मागील वर्षी जानेवारी महिन्यापासून या परीक्षेची वाट पाहत उमेदवारांची तयारी सुरू आहे. जुन्या आणि नव्या उमेदवारांसाठी तयारीच्या दृष्टिकोनातून परीक्षोपयोगी मुद्दय़ांची विषयवार चर्चा या लेखापासून सुरू करण्यात येत आहे.

राज्य सेवा पूर्वपरीक्षा पेपर -२ हा पेपर एकपेक्षा जास्त अवघड, जास्त आव्हानात्मक समजला जातो. कारण पाठांतराच्या वा स्मरणशक्तीच्या आधारावर या पेपरमधील प्रश्नांची उत्तरे देणे शक्य नाही. ऐनवेळी समोर आलेल्या प्रश्नांचा विचार करून प्रतिसाद द्यायचा असतो आणि उत्तीर्ण व्हायचे तर हा प्रतिसाद, उत्तर बरोबर असणे गरजेचे असते. त्यामुळे साहजिकच बऱ्याच उमेदवारांसाठी हा पेपर त्यांच्या कम्फर्ट झोनच्या बाहेरचा असतो.

खरेतर रूढार्थाने जास्त आव्हानात्मक वाटणारा पेपर दोन हा सन २०१३पासून परीक्षा उत्तीर्ण होण्यामध्ये पेपर एकपेक्षा जास्त योगदान देत आला आहे. एकूण २०० गुणांच्या या पेपरामध्ये प्रत्येकी २.५ गुणांसाठी ८० प्रश्न विचारण्यात येतात. सन २०१३ पासूनच्या राज्य सेवा पूर्वपरीक्षेतील कट ऑफ लाइनचे विश्लेषण केले असता उमेदवारांना पेपर एकमध्ये सर्वसाधारणपणे २०० पैकी ६० ते ८५ तर पेपर दोनमध्ये २०० पैकी ७० ते १२० पर्यंत गुण मिळाले आहेत. त्यामुळे सी सॅट हा विषय कोणतेही दडपण न घेता अभ्यासायचा आणि सोडवायचा विषय आहे हे नेहमी लक्षात ठेवावे.

नव्या – जुन्या उमेदवारांच्या सी सॅट पेपर सोडविण्याच्या अनुभवांचे विश्लेषण केल्यावर पुढील बाबी लक्षात येतात. वेगवेगळ्या कट ऑफचा विचार करता उत्तीर्ण होण्यासाठी सी सॅटमध्ये १०० ते १२० गुण मिळवायचे उद्दिष्ट व्यवहार्य ठरते. हे ३५ ते ४० प्रश्नांचे गुण आहेत. निगेटिव्ह मार्किं गचे गुण वजा करून इतके गुण मिळणे आवश्यक आहे. या दृष्टीने ५ निर्णयक्षमतेचे प्रश्न सोडून ७५ पैकी ६० ते ६५ प्रश्न सोडविणे हे उद्दिष्ट असायला हरकत नाही. म्हणजे किमान ४० ते ५० प्रश्न बरोबर सोडविले जाऊन उरलेल्या चुकीच्या उत्तरांचे गुण वजा होतील आणि नकारात्मक गुण नसलेल्या प्रश्नांचे किमान ६ ते १० गुण असे एकत्रितपणे कट ऑफपर्यंत पोचता येते.

असे गणित मांडून ठरावीक गुण मिळविण्याचे उद्दिष्ट ठेवून पेपर सोडविणाऱ्या उमेदवारांना तुलनेने कमी प्रश्न सोडवूनही चांगले गुण मिळाले आहेत.

ठरावीक गुणांचे उद्दिष्ट ठरविले की, किती प्रश्न सोडवायचे याची मर्यादा आखून घेता येते. आणि ताण कमी होऊन नकारात्मक गुण ओढवून घेणाऱ्या छोटय़ा छोटय़ा चुका टाळता येतात.

जास्तीतजास्त पेपर कव्हर करण्याचे उद्दिष्ट ठेवून पेपर सोडविणाऱ्या विद्यार्थ्यांकडून अगदी क्षुल्लक, अनवधानाने होणाऱ्या चुका जास्त होतात आणि जास्त प्रश्न सोडवूनही नकारात्मक गुणपद्धतीमुळे गुण खूप कमी होतात.

ज्या उमेदवारांनी आपल्या सरावाचे विश्लेषण करून त्यावर आधारित सराव केला त्यांना या पेपरमध्ये चांगले गुण मिळाले आहेत.

वरील विश्लेषणाच्या अनुषंगाने विभागवार तयारी आणि पेपर सोडविणे या दोन्हीसाठी योजना ठरवायला हवी.

पेपर दोनमध्ये ५६ पानी पेपर आणि ऐनवेळी आकलन आणि विश्लेषण करून सोडविण्याचे प्रश्न असे स्वरूप असल्याने हा उजळणीपेक्षा सरावाच्या आधारे सोडविण्याचा पेपर आहे. जितका पेपर सोडविण्याचा सराव जास्त असेल तितकी यशाची खात्री जास्त असते. हा सराव केवळ बरोबर उत्तरे शोधण्यापुरता मर्यादित असून चालणार नाही. वेळेचे नियोजन करून बरोबर उत्तरे शोधण्याचे तंत्र आत्मसात करावे लागेल.

यासाठी सर्वात सोपा आणि परिणामकारक पर्याय म्हणजे मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका. या प्रश्नपत्रिका वेळ लावून सोडवून पाहाव्यात. सोडविलेल्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण करणे आणि अजून किती आणि कोणती तयारी गरजेची आहे याचा वारंवार आढावा घेत राहणे या पेपरच्या तयारीसाठी अत्यंत आवश्यक आहे. यातून कोणत्या घटकावर आपले प्रभुत्व आहे, कोणता घटक अजून तयारी केल्यास जमू शकतो, कोणता घटक खूपच अवघड वाटतो या बाबी व्यवस्थित समजून घेता येतील आणि त्या दृष्टीने तयारीचे नियोजन करता येईल.

खूपच कठीण वाटणाऱ्या प्रश्नांची तयारी करण्यासाठी थोडा जास्त वेळ लागतो आणि ऐनवेळच्या सरावामध्ये हे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करणे आव्हानात्मक ठरते. अशा घटकांचा समावेश दीर्घकालीन व्यवस्थापनामध्ये असणे आवश्यक असते. मात्र अचूकपणे सोडविता येणाऱ्या प्रश्नांचे प्रमाण सरावाने वाढविणे आवश्यक आहे.

आयोगाचा ५६ पानांचा पेपर १२० मिनिटांत वाचून सोडवायचा असतो. सलग सोडवत गेले तर ८० व्या प्रश्नापर्यंत पोचण्यासाठी दिलेला वेळ कधीच पुरणार नाही. यासाठी अवघड वाटणारे उतारे आणि प्रश्न बाजूला ठेवून गुण मिळवून

देणारे प्रश्न आधी सोडविणे आवश्यक असते. पुरेसा सराव केलेला असेल तर उतारा किंवा प्रश्नाच्या सुरुवातीलाच तो वेळेत सोडविता येईल की नाही हे चटकन लक्षात येते. अवघड प्रश्न / उतारा बाजूला ठेवून मार्क देणाऱ्या प्रश्नाकडे वळता येते.

ऐनवेळीचा सराव करताना थोडय़ा फार तयारीने आत्मविश्वास वाढू शकेल अशा घटकांच्या सरावावर सर्वात जास्त भर द्यावा, त्यानंतर आत्मविश्वास असलेल्या घटकांच्या सरावावर.

या पेपरला सी सॅट (Civil Services Aptitude Test – CSAT) नागरी सेवा अभिवृत्ती चाचणी म्हटले जाते. उमेदवार ज्या सेवेमध्ये प्रवेश घेऊ इच्छित आहे तिथल्या कामाच्या स्वरूपास त्याची अभिवृत्ती कितपत मिळतीजुळती आहे हे तपासणारा असा हा पेपर आहे. उमेदवारांची तर्क करण्याची, विश्लेषण करण्याची आणि निर्णय घेण्याची क्षमता तसेच त्यांची आकलनक्षमता या पेपरमधून तपासली जाते. या पेपरमधील घटकांच्या तयारीबाबत उपघटकनिहाय सविस्तर चर्चा पुढील लेखामध्ये करण्यात येत आहे.