18 November 2019

News Flash

प्रश्नवेध एमपीएससी : अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा

मराठी भाषा सराव प्रश्न

(संग्रहित छायाचित्र)

रोहिणी शहा

अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा ही २३ जून रोजी होत आहे. पूर्व परीक्षेच्या अभ्यासक्रम व पॅटर्ननुसार मराठी भाषा १० गुण, इंग्रजी भाषा १० गुण, सामान्य अध्ययन २० गुण व अभियांत्रिकी अभिवृत्ती ६० गुण असे विभाजन आहे. या लेखामध्ये मराठी भाषेसाठी सराव प्रश्न देण्यात येत आहेत.

प्रश्न १- विकारी शब्दांपकी सर्वनामास पुढीलपैकी कोणते विकार होतात?

अ. लिंग        ब. वचन        क. विभक्ती     ड. पुरुष

१) अ सोडून सर्व २) ब सोडून सर्व  ३) क आणि ड   ४) वरील सर्व

प्रश्न २ – वडिलांनी मुलांना व्यायामास पाठवावे. या वाक्यातील प्रयोग कोणता आहे?

१) सकर्मक भावे प्रयोग

२) अकर्मक कर्तरी प्रयोग

३) शक्य कर्मणी प्रयोग

४) प्रधानकर्तृक कर्मणी प्रयोग

प्रश्न ३ – पुढीलपकी कोणता/ ते शब्द नत्र बहुव्रीही समासाचे उदाहरण नाही / त?

अ. निळकंठ     ब. निर्धन

क. अनिकेत ड. निरोगी

१) अ आणि ब   २) ब आणि क   ३) अ आणि ड   ४) ब आणि ड

प्रश्न ४ – कुडी तशी पुडी या म्हणीचा अर्थ असणारा पर्याय कोणता?

१) देहाप्रमाणे आहार असणे        २) क्षुद्र माणसांसाठी क्षुद्र गोष्टी

३) एका माळेचे मणी             ४) देश तसा वेश

प्रश्न ५ – अव्यापारेषु व्यापार या शब्दप्रयोगाचा नेमका अर्थ दर्शविणारा पर्याय कोणता?

१) तोटय़ाचा व्यवहार

२) नसती उठाठेव

३) अवघड कार्य

४) वरील सर्व

प्रश्न ६ – चिरकालीन या शब्दाचा / चे समानार्थी शब्द कोणता / ते?

अ. अखंड  ब. क्षणभंगुर     क. सतत   ड. अशाश्वत   इ. निमिषार्ध

१) अ आणि क   २) ब आणि क   ३) ब आणि ड    ४) ड आणि इ

प्रश्न ७ – एखादी क्रिया नुकतीच पूर्ण झालेली असल्याचे दर्शविणाऱ्या वाक्याचा काळ कोणता असतो?

१) साधा भूतकाळ २) पूर्ण भूतकाळ ३) पूर्ण वर्तमानकाळ     ४) चालू भूतकाळ

प्रश्न ८ – पुढीलपकी कोणत्या वाक्यांमध्ये कालवाचक क्रियाविशेषण अव्ययाचा समावेश केलेला नाही?

अ. जिकडे तिकडे पाणी साठले आहे.

ब. आजकाल तिच्या सरावात चुका वाढत आहेत.

क. त्याला अद्यापि मुलाखतीचे आमंत्रण मिळालेले नाही.

ड. पुढारी क्वचित कार्यकर्त्यांना भेटतात.

१) अ आणि क   २) ब आणि ड    ३) अ आणि ड   ४) ब आणि क

उत्तरे व स्पष्टीकरणे

प्र. क्र.     १ – योग्य पर्याय क्र. ४

नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद हे विकारी शब्द आहेत. यातील नाम, सर्वनाम आणि विशेषणास लिंग, वचन, विभक्ती आणि पुरुष यांचे विकार होतात. म्हणजेच त्यांचा वाक्यात प्रयोग करताना त्यांच्या मूळ रूपात लिंग, वचन, विभक्ती आणि पुरुष यांच्या आधारे बदल होतात. क्रियापदास काळ व अर्थ यांच्या प्रत्ययांचे विकार होतात.

प्र. क्र. २ – योग्य पर्याय क्र.(१)

वाक्यामध्ये कर्ता किंवा कर्माच्या लिंग अथवा वचनातील बदलामुळे क्रियापद बदलत नाही. त्यामुळे हा भावे प्रयोग आहे.

प्र. क्र.     ३ – योग्य पर्याय क्र.(३)

निळकंठ – नील आहे कंठ ज्याचा असा तो (षष्ठी ) विभक्ती बहुव्रीही समासाचे उदाहरण

निर्धन – नाही धन ज्याकडे असा तो. नत्र बहुव्रीही समासाचे उदाहरण

अनिकेत – नाही निकेत ज्याला असा तो. नत्र बहुव्रीही समासाचे उदाहरण

निरोगी – रोग नसलेला. – नत्र  तत्पुरुष समासाचे उदाहरण.

प्र.क्र.४ – योग्य पर्याय क्र.(१)

प्र.क्र.५. – योग्य पर्याय क्र.(२)

प्र.क्र.६ – योग्य पर्याय क्र. (१)

प्र.क्र.७ – योग्य पर्याय क्र. (३)

एखादी क्रिया नुकतीच पूर्ण झालेली असल्याचे दर्शविणाऱ्या वाक्याचा काळ पूर्ण वर्तमानकाळ असतो. नुकतीच पूर्ण झालेली क्रिया असल्याने तो वर्तमानकाळ असतो. उदा. शिक्षकांनी चाचणी घेतली आहे.

साधा भूतकाळ असणाऱ्या वाक्यातील क्रिया घडून काही काळ लोटलेला असतो. उदा. शिक्षकांनी चाचणी घेतली.

तर पूर्ण भूतकाळामध्ये एखादी क्रिया काही काळापूर्वी म्हणजेच भूतकाळामध्ये पूर्ण झाली असल्याचे दर्शविण्यात येते. उदा. शिक्षकांनी चाचणी घेतली होती.

प्र.क्र.८ – योग्य पर्याय क्र. (३)

जिकडे तिकडे हे स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय आहे तर क्वचित हे रीतीवाचक क्रियाविशेषण अव्यय आहे. कालवाचक क्रियाविशेषण अव्ययांमध्ये कालदर्शक, सातत्यदर्शक आणि आवृत्तीदर्शक असे उपप्रकार पडतात. काल, आज, उद्या, परवा, आधी, सध्या, तूर्त, दिवसा, रात्री, लगेच, आजकाल, नेहमी, सदा, सतत, नित्य, रात्रभर, अद्याप, वारंवार, क्षणोक्षणी, दररोज, सालोसाल, एकदा, दोनदा, तीनदा ही कालवाचक क्रियाविशेषण अव्ययांची काही उदाहरणे आहेत.

First Published on May 25, 2019 12:02 am

Web Title: article on engineering service pre examination