येत्या १० एप्रिलला होणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये सामान्य अध्ययन पेपर २ अर्थात सीसॅट या पेपरचा अभ्यासक्रम, प्रश्नपत्रिकेचे स्वरूप आणि अभ्यासाची व्यूहनीती यासंबंधीचे मार्गदर्शन-
मित्रांनो, येत्या १० एप्रिलला महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणारी राज्यसेवा पूर्वपरीक्षा आहे. राज्याच्या प्रशासनामध्ये स्वत:चा ठसा उमटविण्याचे ध्येय बाळगणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीने ही परीक्षा अत्यंत महत्त्वाची आहे. पूर्वपरीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतरच मुख्य परीक्षेसाठी संधी प्राप्त होत असल्यामुळे ही परीक्षा महत्त्वाची ठरते. या परीक्षेमध्ये प्रत्येकी २०० गुणांचे एकूण दोन पेपर असतात. त्यांपकी सामान्य अध्ययन पेपर १ बद्दल यापूर्वीच्या लेखात माहिती घेतलीच आहे. इथे आपण सामान्य अध्ययन पेपर- २ म्हणजेच उरअळ CSAT ( Civil services Aptitude Test) बाबत माहिती घेऊ या.
पेपरचे स्वरूप
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने २०१३ पासून राज्यसेवा पूर्व परीक्षेचे स्वरूप बदलून सामान्य अध्ययन या पेपरसोबत सीसॅटचा पेपर समाविष्ट केला आहे. या पेपरमध्ये एकूण २०० गुण व ८० प्रश्न समाविष्ट असतात. प्रत्येक प्रश्नाला अडीच गुण असतात. सर्वसाधारणपणे मराठी आणि इंग्रजी भाषेतील उताऱ्यांवर ५० प्रश्न तसेच गणित व बुद्धिमत्ता आणि माहितीचे आकलन या विभागावर २५ प्रश्न असतात आणि निर्णयक्षमता, संभाषण कौशल्य या विभागावर ५ प्रश्न असतात. यापकी उताऱ्यांवरील प्रश्न आणि गणित, बुद्धिमत्तेवरील प्रश्नांसाठी ऋणात्मक गुण पद्धतीचा (Negative Marking) अवलंब केला जातो. तर निर्णयक्षमता, संभाषणकौशल्य या विभागातील प्रश्नांसाठी ऋणात्मक गुणपद्धती वापरली जात नाही. या पद्धतीमध्ये प्रत्येक तीन चुकीच्या उत्तरांसाठी बरोबर असणाऱ्या एका प्रश्नाचे गुण वजा केले जातात.
परीक्षेचा अभ्यासक्रम
आकलनक्षमता, संभाषणकौशल्य, तर्क अनुमान आणि विश्लेषणक्षमता, निर्णयक्षमता, सामान्य बुद्धिमानक्षमता, मूलभूत अंकगणित, माहितीचे आकलन, मराठी व इंग्रजी आकलनक्षमता.
हा अभ्यासक्रम साधारणपणे खालील तीन टप्प्यांत विभागता येईल-
आकलन क्षमता :
या विभागामध्ये उतारे आणि त्यावरील प्रश्नांचा समावेश असतो. हे उतारे मराठी तसेच इंग्रजी या दोन्हीही भाषांमध्ये असतात. (अपवाद फक्त मराठी व इंग्रजी आकलनक्षमता. या विभागांतर्गत येणारे उतारे एकाच भाषेत असतात.) उतारे आणि उताऱ्यावरील प्रश्न सोडविण्याचे एक मूलभूत तंत्र असते. सर्वसाधारणपणे पाहिले असता उताऱ्यावरील प्रश्न हे खालील प्रकारचे असतात-
उताऱ्याला योग्य शीर्षक द्या किंवा उताऱ्याचा मुख्य आशय स्पष्ट करा.
उताऱ्यामध्ये दिलेली वस्तुनिष्ठ माहिती शोधा.
लेखकाचा दृष्टिकोन स्पष्ट करा.
उताऱ्यावरून योग्य तो निष्कर्ष काढा.
उताऱ्यामध्ये उल्लेखित म्हणी, वाक् प्रचार, अवघड शब्द यांचा अर्थ सांगा.
असे प्रश्न सोडवण्यासाठी खालील दोन तंत्रांपकी एका तंत्राचा वापर करता येतो-
तंत्र-१ :
प्रथम उतारा वाचून नंतर प्रश्न सोडवणे. या तंत्राचा वापर करताना विद्यार्थ्यांनी खालील मुद्दे लक्षात घ्यावेत-
उताऱ्यातील प्रत्येक वाक्याचा अर्थ समजल्याशिवाय पुढच्या वाक्याकडे जाऊ नये.
उताऱ्यामधील ज्या वस्तुनिष्ठ माहितीवर प्रश्न विचारला जाऊ शकतो, ती अधोरेखित करावी.
उतारा वाचताना त्याचा सारांश लक्षात घ्यावा.
उताऱ्याचे पूर्ण आकलन झाल्यानंतर प्रश्नांकडे वळवावा.
तंत्र- २ :
प्रथम प्रश्न वाचून नंतर उतारा वाचणे. या तंत्राचा वापर करताना विद्यार्थ्यांनी खालील मुद्दे लक्षात घ्यावेत-
प्रथम प्रश्न वाचताना थेट उत्तर शोधण्याचा प्रयत्न न करता प्रश्नाचे नेमके स्वरूप समजून घ्यावे.
प्रश्नामधील असे काही महत्त्वाचे शब्द अधोरेखित करावेत, ज्यांच्या मदतीने नंतर उतारा वाचताना त्यातील महत्त्वाच्या ओळी अधोरेखित करता येतील.
जेव्हा एखाद्या वस्तुनिष्ठ स्वरूपाच्या प्रश्नाचा संदर्भ उतारा वाचताना येतो, तेव्हा अशा प्रश्नाचे उत्तर लगेच नमूद करावे.
यानंतर जेव्हा संपूर्ण उतारा वाचून होईल तेव्हा आशयाशी निगडित असणारे प्रश्न सोडवणे सुलभ होते.
सीसॅटचा पेपर सोडवताना आकलनक्षमता या विभागाला जास्तीत जास्त ६० ते ७० मिनिटेच देता येतात. या ठरावीक वेळेमध्ये जवळपास १० ते ११ उतारे वाचून त्यावरील प्रश्नांची उत्तरे शोधावी लागतात. यासाठी ठरावीक वेळेत उतारे सोडविण्याचा सराव करणे अत्यंत आवश्यक आहे, तसेच वाचनाचा वेग वाढणे आवश्यक आहे.
संदर्भग्रंथ :
सिनर्जी पब्लिकेशनचे मराठी आकलनक्षमता, इंग्रजी उताऱ्यांसाठी अरिहंत पब्लिकेशनचे English Comprehaension या पुस्तकांतील उताऱ्यांचा सराव करावा.
बुद्धिमापन व अंकगणित :
या विभागातील प्रश्न सोडवताना घातांक, सरासरी, शेकडेवारी, नफा-तोटा, भागीदारी, गुणोत्तर प्रमाण, काळ-काम-वेग, वेग-वेळ-अंतर, सरळव्याज, चक्रवाढव्याज, कालमापन, इनपुट-आऊटपुट, तर्कशास्त्र, बठकव्यवस्था, माहितीचे आकलन या घटकांना सरावादरम्यान अधिक महत्त्व द्यावे. या घटकांवर आधारित साधारणपणे २५ प्रश्न सोडविण्यासाठी जास्तीत जास्त ३० मिनिटे मिळू शकतात. त्यामुळे पेपर सोडवताना त्याचे भान राहण्यासाठी या घटकांचा जास्तीत जास्त सराव करणे गरजेचे आहे.
संदर्भपुस्तके :
विजेता पब्लिकेशनचे सीसॅटचे पुस्तक, वा. ना. दांडेकर यांची गणित व बुद्धिमत्तेची पुस्तके, पंढरीनाथ राणे यांचे क्लृप्त्या आणि सूत्रे हे पुस्तक किंवा या घटकांचा समावेश असणारे कोणतेही पुस्तक वापरता येईल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे जास्तीत जास्त सराव होय.
निर्णयक्षमता :
या विभागातील प्रश्नांद्वारे उमेदवार त्याच्या दैनंदिन आयुष्यातील समस्या कशा प्रकारे हाताळतो, तसेच नागरी सेवांमध्ये काम करताना येणाऱ्या समस्यांना सोडवण्याची त्याची क्षमता, नीतिमत्ता व मूल्ये या गोष्टी तपासण्याचा आयोगाचा हेतू आहे. हे प्रश्न सोडवताना खालील गोष्टींचा विचार करावा.
दिलेल्या समस्येमध्ये उपलब्ध असलेली संसाधने उदा. मानवी संसाधन, वित्तीय संसाधने, नसíगक संसाधने
दिलेल्या समस्येमध्ये समाजातील समाविष्ट घटक
एक अधिकारी / सामान्य व्यक्ती म्हणून नीतिमूल्ये, पारदर्शकता, जबाबदारी, प्रामाणिकपणा, सहानुभूती, कर्तव्ये.
शेवटी अंतिम उत्तरापर्यंत येताना दिलेली समस्या पूर्णपणे समजावून घेऊन उपलब्ध पर्यायांचा समस्येला अनुरूप संबंध लावावा. उत्तरांचा प्राधान्यक्रम निश्चित करून अचूक उत्तरापर्यंत यावे. अशा प्रकारे आपल्या अभ्यासाची व्यूहरचना प्रारंभीच करून जास्तीत जास्त सराव चाचण्या सोडवून विद्यार्थ्यांनी
प्रश्नपत्रिका सोडवण्याचे स्वत:चे तंत्र विकसित करावे.
आयोगाचे पेपर सुमारे ४८ ते ५६ पानांचे असतात. यावरून आयोगाचा उद्देश हाच आहे, की विद्यार्थ्यांला ८० व्या
प्रश्नापर्यंत पोहोचू द्यायचे नाही. याचा विचार केल्यास
विद्यार्थ्यांनी स्वत:च्या जमेच्या बाजू पाहून जे घटक स्वत:ला अवघड जाणार असतील ते परीक्षेच्या वेळी
प्रामाणिकपणे बाजूला ठेवले आणि आपल्या उत्तरांची अचूकता वाढवली तर सीसॅटमध्ये जास्तीत जास्त गुण मिळविणे निश्चितच शक्य आहे.
अभ्यासाचा श्रीगणेशा
अभ्यासाचा श्रीगणेशा करताना विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम आयोगाच्या अपेक्षांचे विश्लेषण केले पाहिजे. आयोग विद्यार्थ्यांशी केवळ तीन माध्यमांतून संवाद साधत असतो- अभ्यासक्रम, प्रश्नपत्रिका, निकाल. या तीन माध्यमांतून आयोगाने दिलेला संदेश विद्यार्थ्यांच्या ध्यानात आला की, अर्धी लढाई तिथेच जिंकली जाते. आयोगाने दिलेल्या अभ्यासक्रमावरून नेमका अभ्यास कोणता करायचा हे लक्षात येते; परंतु किती खोलात जाऊन अभ्यास करायचा हे ठरविण्यासाठी जुन्या प्रश्न पत्रिकांचा योग्य तो आधार घ्यावा लागतो. त्या आधारे आपण आपल्या अभ्यासाची व्यूहनीती ठरवू शकतो. परीक्षाभिमुख अभ्यास करण्यासाठी मात्र आपल्याला जुने निकाल मार्गदर्शक ठरतात. या निकालांचे विश्लेषण केले असता प्रत्येक पेपरमध्ये जर ५० टक्के गुण मिळाले तर आपण महाराष्ट्रात पहिले येऊ शकतो याचे आकलन होते आणि साधारणपणे आपले लक्ष्य ५० ते ६० टक्क्यांपर्यंत निर्धारित करता येते. या विश्लेषणामुळे विद्यार्थ्यांच्या मनात असणारी ‘सीसॅट’बाबतची भीती कमी होऊन विद्यार्थी गोडीने अभ्यासाचा प्रारंभ करू शकतात.