News Flash

एमबीए: संभ्रम दूर करा..

सर्वप्रथम लक्षात घ्यायला हवे की, एमबीए हा पूर्णवेळ अभ्यासक्रम आहे.

एमबीए अभ्यासक्रमास प्रवेश घेणे हे आपल्या करिअरच्या नियोजनाच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वाचे पाऊल आहे. एमबीए अभ्यासक्रम हा एक चांगला अभ्यासक्रम आहे.

एमबीए अभ्यासक्रमास प्रवेश घेणे हे आपल्या करिअरच्या नियोजनाच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वाचे पाऊल आहे. एमबीए अभ्यासक्रम हा एक चांगला अभ्यासक्रम आहे. यात शंकाच नाही. तसेच एमबीए पूर्ण झाल्यानंतर नोकरीच्या किंवा स्वतंत्र व्यवसाय सुरू करण्याच्या अनेक संधी उपलब्ध आहेत हेही खरे आहे. मात्र याकरता हा अभ्यासक्रम योग्य प्रकारे पूर्ण करणे हे तितकेच आवश्यक आहे हेही लक्षात ठेवायला हवे.
या ठिकाणी सर्वप्रथम लक्षात घ्यायला हवे की, एमबीए हा पूर्णवेळ अभ्यासक्रम आहे, अर्धवेळ नाही. अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी वर्गात सर्व तासांना उपस्थिती असणे हे अत्यावश्यक आहे. वर्गातील हजेरीबाबत प्रत्येक विद्यापीठाचे व संस्थांचे नियम असतातच, पण या ठिकाणी सांगावेसे वाटते की, केवळ नियम आहेत म्हणून उपस्थित राहिले तर त्यापासून फायद्याऐवजी तोटाच होतो. म्हणून आपण स्वत:च सकारात्मक दृष्टिकोन ठेवून उपस्थितीकडे पाहिले पाहिजे. प्रत्येक विषयाची मूलभूत तत्त्वे ही समजून घेणे आवश्यक आहे. त्याशिवाय या विषयांचा व्यवहारातील उपयोग (प्रॅक्टिकल अ‍ॅप्लिकेशन) हे समजूच शकत नाही. उदा. व्यवस्थापकीय अर्थशास्त्र या विषयाची मूलभूत तत्त्वे समजल्याशिवाय त्याचा प्रत्यक्ष व्यवहारात कसा वापर होतो हे समजणारच नाही. म्हणून एमबीए हा पूर्णवेळच करणे हे अत्यंत आवश्यक आहे. आज व्यवस्थापन शिक्षण देणाऱ्या संस्थांची संख्या प्रचंड वाढल्यामुळे प्रत्येक संस्थेमध्ये जागा भरण्यासाठी स्पर्धा आहे. या स्पर्धेत आपल्या संस्थेत प्रवेश घ्यावा म्हणून अनेक आमिषे दाखवली जातात. यामध्ये वर्गात उपस्थितीतून सवलत, अंतर्गत गुणांची खात्री इ. अनेक आमिषे सामील असतात. एमबीएला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या सर्वानी अशा संस्थांपासून दूर राहणे हे त्यांच्या हिताचे आहे. वर्गात उपस्थित न राहता फक्त परीक्षेपुरती उपस्थिती ठेवली तर एमबीएची पदवी मिळेल पण नुसती पदवी मिळवणे हे अजिबात महत्त्वाचे नाही. त्यामुळे अशा संस्थांमध्ये प्रवेश घेऊन आपण स्वत:चेच नुकसान करून घेत आहोत हे जितक्या लवकर समजेल तेवढे चांगले. जे विद्यार्थी-विद्यार्थिनी नोकरी करतात त्यांनी पूर्ण वेळ एमबीएला प्रवेश घेण्यापेक्षा जे अर्धवेळ पदविका अभ्यासक्रम आहेत त्यांना प्रवेश घेणे फायद्याचे आहे. अनेक विद्यापीठांमध्ये असे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. यालाही पर्याय म्हणून इग्नूसारख्या मान्यताप्राप्त संस्थेचे पत्राद्वारे चालवले जाणारे (कॉरस्पॉन्डन्स) अभ्यासक्रमसुद्धा करता येतात. नोकरी करणाऱ्यांपैकी ज्यांना पूर्ण वेळ अभ्यासक्रमच करायचा आहे त्यांनी नोकरी सोडून पूर्ण वेळ अभ्यासक्रम करावा. अर्थात यामध्ये धोका पत्करण्याची तयारी हवी. धोका पत्करण्याची तयारी नसेल तर मात्र पूर्ण वेळ अभ्यासक्रम न करता अर्ध वेळ किंवा दूरशिक्षण यापैकी एक पर्याय निवडता येतो. मात्र कोणत्याही परिस्थितीत वर्गातील उपस्थितीबाबत तडजोड करू नये. अशी तडजोड करणे किंवा सवलत घेणे आपल्या हिताच्या विरुद्ध आहे हे समजण्याची परिपक्वता पाहिजे.
एमबीए करू इच्छिणाऱ्यांच्या मनामध्ये असणारा एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे कोणत्या पदवीनंतर एमबीए करणे अधिक लाभदायक ठरते? म्हणजे एमबीए, बीईनंतर का बीकॉम, बीबीए, बीएस्सी. किंवा अन्य पदवीनंतर? हा आतंरशाखीय स्वरूपाचा अभ्यासक्रम असल्यामुळे अमुक एका पदवीनंतर तो करणे फायद्याचे आहे असे नाही. कोणत्याही पदवीनंतर एमबीए अभ्यासक्रम हा करिअरच्या दृष्टिकोनातून फायद्याचा ठरतो. बीईनंतर एमबीए करून यशस्वी करिअर केलेली जशी अनेक उदाहरणे आहेत तशीच बीकॉम, बीए, बीएस्सी इत्यादी इतर पदवी प्राप्त करून नंतर एमबीए केल्याचीसुद्धा अनेक उदाहरणे आहेत. त्यामुळे अमुक एकच पदवी असावी असे नाही. कित्येक वेळा बीई झाल्यानंतर एमबीए करावे का असा प्रश्न निर्माण होतो. एमबीए झाल्यानंतर अभियांत्रिकीचे ज्ञान वापरता येईल का, असेही विचारले जाते. याचे उत्तर असे आहे की, एमबीए झाल्यानंतर कामाचे स्वरूप हे व्यवस्थापकीय स्वरूपाचे असते हे जरी खरे असले तरी अभियांत्रिकीचे ज्ञान अजिबातच वापरता येत नाही असे नाही. उदा. एखाद्याने बीई झाल्यानंतर एमबीए- मार्केटिंगमध्ये केले तर त्याला वस्तुंविषयी अधिक चांगल्या पद्धतीने समजू शकते (प्रॉडक्ट नॉलेज) तसेच स्पर्धात्मक बाजारपेठेमध्ये स्पर्धकांच्या वस्तूंची रचनासुद्धा चांगल्या पद्धतीने समजू शकते. हीच गोष्ट इतर स्पेशलायझेशनसाठीसुद्धा लागू आहे. त्यामुळे मुळात व्यवस्थापकीय क्षेत्रामध्ये करिअर करायचे असल्यास विशिष्ट पदवीच पाहिजे, असे मुळीच गरजेचे नाही.
एमबीएला प्रवेश घेताना कोणत्या संस्थेमध्ये प्रवेश घ्यावा हाही एक प्रश्न विद्यार्थी- विद्यार्थिनींच्या मनात असतो. पुढील नोकरीच्या दृष्टीने संस्थेला किती महत्त्व आहे ही एक शंका असते. आज अगदी तालुका पातळीवरही व्यवस्थापन देणाऱ्या संस्था स्थापन झाल्यामुळे साहजिकच कोठे प्रवेश घ्यावा हा प्रश्न निर्माण होतो. या प्रश्नाचा विचार करताना समजून घेतले पाहिजे की साधारणपणे १९९४ च्या पूर्वी आपल्या राज्यात व्यवस्थापन शिक्षण देणाऱ्या मोजक्याच संस्था होत्या आणि साहजिकच त्या वेळी विद्यार्थीवर्गही मर्यादित होता. आता परिस्थिती बदलल्यामुळे संस्थांची संख्या वाढली आहे. साहजिक सर्वच संस्थांना आपला स्वत:चा एक ब्रॅण्ड प्रस्थापित करणे शक्य होतेच असे नाही; परंतु याचा अर्थ अशा संस्थांमध्ये प्रवेश घेतल्यानंतरच नोकरीच्या बाबतीत काही प्रमाणात फायदा निश्चित होतो पण शेवटी लक्षात ठेवले पाहिजे की कोणत्याही संस्थेत प्रवेश घेतल्यानंतर मिळणाऱ्या संधी या शेवटी आपल्या वैयक्तिक क्षमतेवर अवलंबून असतात. एखाद्या नामवंत संस्थेत प्रवेश घेतला आणि दोन वर्षे नुसतीच घालवली तर नुसत्या पदवीच्या आधारावर नोकरी मिळणे अवघडच असते. याउलट एखाद्या नवीन संस्थेमध्ये प्रवेश घेऊन एम.बी.ए.च्या दोन वर्षांचा पुरेपूर वापर करून आपली क्षमता वाढवली तर यशस्वी करिअर करता येते. त्यामुळे नामवंत संस्थेत प्रवेश मिळाला नाही तर निराश होण्यापेक्षा ज्या संस्थेत प्रवेश मिळाला आहे त्या संधीचा फायदा घेतला पाहिजे. काही जण मनासारख्या संस्थेत प्रवेश मिळाला नाही म्हणून एम.बी.ए.चा नादच सोडून देतात. हेही चुकीचे आहे. शेवटी करिअर आपली आहे व कोणत्याही परिस्थितीत यशस्वी करिअर करायचीच असे पक्के ठरवण्यावर कोणतीच अडचण येत नाही. या ठिकाणी अजून एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की एम.बी.ए.ला प्रवेश घेण्यासाठी प्रवेश परीक्षेतील टक्केवारी लक्षात घेतली पाहिजे. प्रवेश हे केंद्रीय पद्धतीने असल्यामुळे प्रवेश परीक्षेतील गुण हे महत्त्वाचे असतात.
या प्रवेश परीक्षा साधारणपणे नोव्हेंबरपासून सुरू होतात. आपल्याला पाहिजे त्या
संस्थेत प्रवेश घ्यायचा असल्यास प्रवेश परीक्षेची तयारी उत्तम हवी. पदवी परीक्षेतील गुण महत्त्वाचे आहेत, पण जास्त महत्त्व प्रवेश परीक्षेतील गुणांनाच आहे
आणि म्हणूनच प्रवेश परीक्षेची तयारी महत्त्वाची ठरते.

– नचिकेत वेचलेकर
nmvechalekar@yahoo.co.in
(लेखक पुण्याच्या इंडसर्च संस्थेचे
अधिष्ठाता आहेत.)

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 7, 2015 12:33 am

Web Title: article on mba education
Next Stories
1 सशस्त्र सीमा पोलीस दल: वैद्यकीय अधिकारी परीक्षा
2 ‘कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट’विषयक अभ्यासक्रम
3 कृषी विस्तार व्यवस्थापन अभ्यासक्रम
Just Now!
X