13 August 2020

News Flash

यूपीएससी : अभ्यासाची अपेक्षित रणनीती

मुख्य परीक्षेचे स्वरूप लक्षात घेत अभ्यासाचे तंत्र आत्मसात करावे लागते. त्याविषयी..

यूपीएससीची तयारी करताना पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षेचे स्वरूप लक्षात घेत अभ्यासाचे तंत्र आत्मसात करावे लागते. त्याविषयी..
गतवर्षी- २०१५ च्या नागरी सेवा परीक्षेकरता ९ लाख ४५ हजार उमेदवारांनी अर्ज केले होते. यापकी ४ लाख ६३ हजार उमेदवारांनी पूर्वपरीक्षा दिली. त्यापकी पूर्वपरीक्षा उत्तीर्ण उमेदवारांची संख्या होती १५००८. पूर्व परीक्षेत यशस्वी होणाऱ्या उमेदवारांचे प्रमाण होते ३.२४% इतके. थोडक्यात यूपीएससी ‘इच्छुक’ उमेदवारांतून फक्त ‘योग्य’ उमेदवारांची निवड करते. म्हणून यूपीएससीचा अभ्यास किंवा तयारी ही फक्त ‘योग्य’तेच्या दिशेनेच झाली पाहिजे.
नागरी सेवा परीक्षेची तयारी सुरू करू इच्छिणाऱ्यांना ‘फ्रेशर्स’ म्हणता येईल. असे उमेदवार, ऑगस्ट २०१५ च्या पूर्वपरीक्षेत अनुत्तीर्ण झालेले उमेदवार, पूर्वपरीक्षेत यशस्वी झालेले व डिसेबर २०१५ मध्ये संपन्न झालेली मुख्य परीक्षा दिलेले मोजके उमेदवार, या सर्वासमोरचे समान ध्येय असेल २०१६च्या नागरी सेवा परीक्षेची तयारी. या सर्वाच्या सामायिक तयारीचा भाग असलेल्या महत्त्वाच्या बाबींविषयी या लेखात जाणून घेऊयात.
पूर्वपरीक्षेसाठी वस्तुनिष्ठ प्रश्नांची घोकंपट्टी, मुख्य परीक्षेसाठी रेडीमेड उत्तरांचा लेखन सराव किंवा मुलाखतीसाठी इन्स्टंट व्यक्तिमत्त्व विकासाचे प्रयोग अशा साचेबद्ध शिकवणीचा आणि यूपीएससी तयारीचा काडीमात्र संबंध नाही. तसा तो पूर्वीही फारसा नव्हता. २०११ साली परीक्षेच्या बदललेल्या प्रारूपानंतर मात्र नागरी सेवा परीक्षेची काठिण्यपातळी वाढत चालली आहे. अभ्यासू उमेदवारांसाठी हे सुखद आव्हान आहे आणि ज्यांना ही काठिण्यपातळी अवघड भासते, त्यांच्यासाठी ‘जास्त अभ्यास’ हा एकच मंत्र आहे.
पूर्व आणि मुख्य परीक्षेच्या अभ्यासक्रमाचा सविस्तर आणि सखोल अभ्यास, चालू घडामोडींचे भान आणि आकलन हा यूपीएससी तयारीचा महामंत्र आहे. तुमचा मूलभूत अभ्यास आणि चालू घडामोडींचे आकलन यांचा बंध किती खोल आणि व्यापक असला पाहिजे, हे जाणून घेण्यासाठी डिसेंबर २०१५ मध्ये झालेल्या नागरी सेवा मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययन विषयात विचारलेल्या प्रश्नांचे स्वरूप हा एक आदर्श नमुना आहे. काही मोजके प्रश्न पाहू :
भारतातील स्मार्ट शहरे स्मार्ट खेडय़ांशिवाय जगू शकणार नाहीत. ग्रामीण नागरी एकीकरणाच्या पाश्र्वभूमीवर या विधानावर चर्चा करा.
‘मेक इन इंडिया’ कार्यक्रमाचे यश ‘कौशल्य भारत’ कार्यक्रम आणि आमूलाग्र कामगार सुधारणांवर अवलंबून आहे. तर्कसंगत मुद्दय़ाच्या आधारे चर्चा करा.
‘नमामी गंगे’ व ‘राष्ट्रीय स्वच्छ गंगा’ अभियानाची तसेच पूर्वीच्या योजनांच्या संमिश्र परिणामांच्या कारणांची चर्चा करा. गंगा नदीच्या सध्या सौरऊर्जा उपकरणांची आदाने व शुल्क यांमध्ये झालेल्या नाटकीय पतनाची कारणे कोणती असू शकतात? या घडामोडींमुळे औष्णिक वीजनिर्मिती व संबंधित उद्योगांवर झालेला परिणाम.
‘मौसम’ योजना ही शेजारी देशांबरोबरचे संबंध सुदृढ करण्यासाठीचे भारत सरकारचे अद्वितीय पाऊल समजले जाते. या योजनेला कुठला सामरिक आयाम आहे का, चर्चा करा.
‘डिजिटल भारत’ कार्यक्रम शेतीची उत्पादकता व उत्पन्न वाढण्यासाठी शेतकऱ्यांना कशा प्रकारे मदतीचा ठरू शकतो? याबाबत शासनाकडून कोणती पावले उचलण्यात आली आहेत?
सत्यम घोटाळा (२००९) च्या संदर्भात कॉर्पोरेट प्रशासनामध्ये पारदर्शकता आणि उत्तरदायित्व सुनिश्चित करण्यासाठी करण्यात आलेल्या बदलांची चर्चा करा.
२०१५ साली निधन पावलेल्या डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या “Dream is not that which you see while sleeping it is something that does not let you sleep.” या गाजलेल्या विधानावर गेल्या वर्षी यूपीएससीने निबंधासाठी विषय दिला होता- ‘ वे सपने जो भारत को सोने न दें। (Dreams which should not let India sleep) यूपीएससीचा चालू घडामोडींविषयक दृष्टिकोन समजण्यासाठी हे आदर्श उदाहरण आहे. ऑगस्ट २०१६ मध्ये नागरी सेवा पूर्वपरीक्षा प्रस्तावित आहे. या दृष्टीने पुढील आठ महिन्यांचे नियोजन आवश्यक आहे-
तयारीची सुरुवात मुख्य परीक्षेच्या अभ्यासापासून केली पाहिजे. २०१३ पासून मुख्य परीक्षेच्या अभ्यासक्रमात व्यापक बदल झाले आहेत. त्यापूर्वी मुख्य परीक्षतील यशासाठी उमेदवारांची भिस्त वैकल्पिक विषयांवर असायची. कधी कधी निबंध किंवा मुलाखतीचे गुण यश मिळवण्यासाठी निर्णायक भूमिका वठवायचे. आता मात्र परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. मुख्य परीक्षेच्या एकूण १,७५० गुणांपकी १,००० गुण सामान्य अध्ययन या एका विषयासाठी आहेत. सामान्य अध्ययनावरील पकड, सोबत योग्य वैकल्पिक विषयाची निवड, निबंध आणि मुलाखतीसाठी प्रभावी तयारी हे सर्व घटक महत्त्वाचे ठरणार आहेत.
मुख्य परीक्षेच्या ७ प्रश्नपत्रिकांमध्ये सामान्य अध्ययनाच्या ४, वैकल्पिक विषयाच्या २ आणि निबंधाची १ प्रश्नपत्रिका समाविष्ट आहेत. मागील दोन वर्षांत मुख्य परीक्षेत थेट किंवा परंपरागत प्रश्नांपेक्षा विश्लेषणात्मक, मूल्यमापन करायला सांगणारे, चर्चा करून स्वत:चे मत मांडायला सांगणारे, तुलनात्मक अशा प्रकारचे प्रश्न विचारले गेले. आयोगाची अशी प्रश्न विचारण्याची प्रकृती पाहता मुख्य परीक्षेच्या तयारीसाठी उमेदवारांनी दोन महत्त्वाच्या बाबी लक्षात घ्याव्यात-
मुख्य परीक्षेच्या तयारीतच पूर्वपरीक्षेची तयारी समाविष्ट असते. यासाठी पायाभूत पुस्तकांचा सखोल अभ्यास आवश्यक आहे. ‘एनसीइआरटी’च्या सहावी ते बारावीच्या पुस्तकांना मूलभूत अभ्यासासाठी पर्याय नाही.
यानंतर अभ्यासक्रमातील प्रत्येक घटकविषयासाठी किमान एका संदर्भ पुस्तकाचा अभ्यास आवश्यक आहे. ज्या घटकविषयांचा अभ्यास पारंपरिक पुस्तकातून पूर्ण होऊ शकत नाही अशा विषयासाठी इंटरनेट, वर्तमानपत्रे व मासिके यांचा आधार घ्यावा.याबरोबरच मुख्य परीक्षेच्या तयारीसाठी उमेदवारांनी स्वत: नोट्स तयार करणे आणि वारंवार उजळणी करणे आवश्यक आहे.
पूर्वपरीक्षेच्या वस्तुनिष्ठ स्वरूपामुळे तयारीसाठी काही विशेष तंत्रांचा अवलंब आवश्यक आहे. वस्तुनिष्ठ स्वरूपात आकडे, तारखा किंवा तथ्ये अशा वस्तुनिष्ठ दृष्टिकोनापेक्षा (Objective approach) संकल्पनात्मक वस्तुनिष्ठतेवर (Conceptual objectivity) आधारित प्रश्नांची संख्या वाढली आहे. पूर्व किंवा मुख्य परीक्षेत नेमके प्रश्न कसे असतील याचा अंदाज बांधणे दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे. विषयानुरूप सरळसोट पारंपरिक प्रश्न मागील दहा वर्षांमध्ये खूप कमी प्रमाणात विचारण्यात आले आहेत, मात्र २०१५ च्या पूर्वपरीक्षेत पारंपरिक, थेट प्रश्नांची संख्या तुलनेने जास्त होती.
यूपीएससीच्या तयारीत महत्त्वाचे किंवा अतिमहत्त्वाचे असा प्रश्नांचा तर्क बांधून अभ्यास करणे निव्वळ अशक्यप्राय आहे. पण आयोगाची प्रश्न-प्रकृती व दृष्टिकोन समजण्यासाठी मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण उपयुक्त ठरते. प्रत्येक घटकविषयात काही उपघटक असतात. काही घटकांवर जास्त तर काही घटकांवर कमी प्रश्न विचारले जातात. उदाहणार्थ – सामान्य विज्ञान विषय घटकात जीवशास्त्रावर सर्वाधिक (६०%) प्रश्न विचारले जातात तर भौतिक आणि रसायनशास्त्रावर फार तर ४-५ प्रश्न विचारले जातात. इतिहास घटकविषयात सर्वाधिक (९०%) प्रश्न आधुनिक भारत, प्राचीन भारत आणि कला-संस्कृती या भागांवर विचारलेले असतात. म्हणून मध्यकालीन भारत हा घटकविषय कमी महत्त्वाचा ठरतो.प्रश्नपत्रिकांच्या विश्लेषणातून घटकविषयांचे महत्त्वानुसार प्राधान्यक्रम ठरवणे सोपे जाते. ठरवलेल्या प्राधान्यक्रमानुसार वेळेचे नियोजन करणे सोपे जाते.
२०१५ पूर्वपरीक्षेचा निकाल प्रसिद्ध झाल्यानंतर अनेक उमेदवारांनी आपल्या अपयशाचे कारण पेपर – २ सीसॅट असल्याचे मान्य केले. पहिल्या पेपरमध्ये चांगले गुण असूनसुद्धा सीसॅटमध्ये पासिंग कटऑफची सीमारेषा पार न करता आल्याने प्रयत्न हातातून निसटला जाणे, ही गंभीर बाब आहे. यासाठी अशा उमेदवारांनी सीसॅटसाठी योग्य वेळ दिला पाहिजे. पेपर १ आणि २ मधील आपापले कच्चे – पक्के विषय निश्चित करून त्याप्रमाणे वेळेचे नियोजन केले पाहिजे.
नव्या प्रारूपानुसार पेपर- २ सीसॅट आता फक्त अर्हता प्राप्त करण्यापुरतेच आहे. त्यामुळे २०१५ पासून पासिंग कट-ऑफ फक्त सामान्य अध्ययन पेपरच्या गुणांच्या आधारे ठरणार आहे. नागरी सेवा पूर्वपरीक्षेचा पासिंग कट-ऑफ दरवर्षी बदलत राहिला आहे. २०११ सालापासून पूर्वपरीक्षेच्या स्वरूपात बदल झाल्यानंतर खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी कट-ऑफ २०० च्या आसपास म्हणजे ५०% इतका होता. परंतु २०१३ मध्ये हे प्रमाण २४१ म्हणजे ६०% पर्यंत वाढले. सीसॅट पेपर पात्रता स्वरूपाचे झाल्याने फक्त सामान्य अध्ययन पेपर- १ चे गुण निर्णायक ठरले. २०१५ चा कट-ऑफ पाहिला तर तो ११० ते ११६ म्हणजे ५५% ते ५८% इतका असल्याचे दिसते. हा कट-ऑफ स्तर दरवर्षी बदलत राहतो. परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांची संख्या त्यांची योग्यता, परीक्षेची काठिण्यपातळी या घटकांवर कट-ऑफ निश्चित होतो, त्यामुळे तो कमी-जास्त होत राहणारच. पूर्वपरीक्षेतील प्रश्नांचे स्वरूप पाहता जर उमेदवाराने १२० ते १३० गुण मिळवायची तयारी केली तर पूर्वपरीक्षेत यश निश्चित मिळेल.
येत्या ७ ऑगस्ट २०१६ रोजी पूर्वपरीक्षा प्रस्तावित आहे. म्हणजे आजपासून सर्वसाधारण २१४ दिवस परीक्षेसाठी शिल्लक आहेत. आपल्या हातात असलेले २१४ दिवस योग्य नियोजनासह दररोज ६ तास स्व-अभ्यासासाठी दिले तरी आयएएस, आयपीएस होण्याचे स्वप्न साकार करणे अवघड नाही. या स्वप्नपूर्तीसाठी गरज आहे एक टक्के प्रेरणेची आणि ९९ टक्के कष्टांची.
एक किंवा दोन प्रयत्नांत अपयशी ठरलेल्या उमेदवारांनी खचून जाण्याची गरज नाही. यूपीएससीतील बरेचसे टॉपर्स पहिल्या किंवा सुरुवातीच्या दोन्ही प्रयत्नांत पूर्वपरीक्षा नापास झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. मीनू कुमारी (आयपीएस) यांचा २००९ सालची परीक्षा हा शेवटचा प्रयत्न होता. या शेवटच्या प्रयत्नात त्या पहिल्यांदाच पूर्वपरीक्षा पास झाल्या आणि अंतिम निकालात ८९ व्या रँकने ‘आयपीएस’साठी निवडल्या गेल्या, फक्त नावांचा उल्लेख टाळण्यासाठी महाराष्ट्रातील उमेदवारांची उदाहरणे न देता, यूपी/ बिहारची उदाहरणे दिली आहेत.
नव्या किंवा जुन्या सर्व उमेदवारांनी एक गोष्ट आवर्जून लक्षात घ्यावी, स्पर्धा परीक्षांत परीक्षेचा एक प्रयत्न म्हणजे एक वर्ष इतका अवधी द्यावा लागतो. दोन-तीन प्रयत्न म्हणजे कमीतकमी तीन ते चार वर्षांचा अवधी लागतो, या अवधीत अभ्यासात सातत्य राखणे, संयम ठेवून यश – अपयश पचवणे हा एका परीक्षेचाच भाग आहे. या परीक्षेला सामोरे जाण्याची इच्छाशक्ती असेल तर यश नक्की मिळेल!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 4, 2016 3:50 am

Web Title: article on planning of upsc exam study
टॅग Upsc
Next Stories
1 एमपीएससी : सामान्य अध्ययनाची तयारी
2 जातिव्यवस्थेचे आकलन
3 विक्रीकर निरीक्षक परीक्षा
Just Now!
X