गेल्या काही वर्षांत जगभरातील अनेक मातब्बर जनसंपर्क संस्थांचे भारतात आगमन झाल्याने आपल्याकडील जनसंपर्क क्षेत्र हे अधिकाधिक समंजस होत आहे.
या क्षेत्रातील कामाच्या वाढत्या संधी आणि मागणी लक्षात घेता जनसंपर्क क्षेत्रात
बौद्धिक कर्तृत्त्वाला विशेष संधी उपलब्ध आहे, हे या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्यांनी ध्यानात घ्यावे.
भोवतालच्या जगाच्या संपर्कात राहावे लागत असल्याने तसेच वेगवेगळ्या क्षेत्रांतील लोकांशी कामाकरता संबंध येत असल्याने जनसंपर्क सल्लागार हा पेशा खूपसा माध्यम व्यावसायिकांसारखाच आहे. अनेक दृष्टीने जनसंपर्क हा व्यवसाय म्हणजे ग्राहक, समुदाय, शासन आणि प्रसारमाध्यमे यांसारख्या संस्था आणि बाजारपेठ यांच्यातील दुवा असतो. हा दुवा बनण्याकरता जनसंपर्क व्यावसायिकाला अनेक कौशल्ये आणि ज्ञान अवगत करणे आवश्यक असते, जेणेकरून त्याला संपर्क धोरण आखण्यासाठी योजना तयार करता येते आणि त्या त्या संस्था आणि संबंधित व्यक्ती यांना जोडून देता येते.
जनसंपर्क सल्लागार हे जनसंपर्क संस्था तसेच विविध संस्था, कंपन्या, कार्यालये या ठिकाणी काम करू शकतात. प्रसारमाध्यमांशी संवाद साधणे, प्रकल्प कामाचे नियोजन करणे तसेच प्रकल्प अहवाल बनवणे हे त्यांचे प्रमुख काम आहे. गेल्या काही वर्षांत जगभरातील अनेक मातब्बर जनसंपर्क संस्थांचे आपल्याकडे आगमन झाल्याने या क्षेत्रातील स्पर्धा वाढत आहे, तसेच इथल्या जनसंपर्क क्षेत्रातील कामाचा दर्जा उंचावत आहे. या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्यांनी या क्षेत्रातील कामाच्या वाढत्या संधी आणि मागणी लक्षात घेता मेहनत करणाऱ्यांना कामाची कमतरता नाही, हे लक्षात घ्यायला हवे.

कामाचे स्वरूप
जनसंपर्क सल्लागारांचे काम विश्लेषणात्मक असते. हे काम सृजनशील तर आहेच, पण कामाचा आराखडा बनवण्यापासून ते पूर्णत्वाला जाईपर्यंत कामाच्या विविध टप्प्यांवर त्यांना सातत्याने लक्ष पुरवावे लागते. जनसंपर्क सल्लागाराकडे संवादकौशल्ये तसेच लोकांशी जुळवून घेण्याचे कौशल्य असावे लागते. कामानिमित्त त्याला वारंवार प्रवास करावा लागतो.
जनसंपर्क अधिकारी हे खासगी संस्था, सरकारी संस्था, प्रसारमाध्यमे, स्वयंसेवी संस्था अशा विविध ठिकाणी कार्यरत असतात. संस्थेच्या जनसंपर्क मोहिमेची जबाबदारी म्हणजेच त्या मोहिमेचे नियोजन, विकसन आणि अंमलबजावणी ही जनसंपर्क सल्लागारांवर अवलंबून असते. त्यांना दोन्ही बाजूंच्या व्यक्तींच्या सतत संपर्कात राहावे लागते. त्याचबरोबर जनसंपर्क प्रकल्पादरम्यान प्रसिद्धी पत्रिका, पत्रके, थेट पाठवली जाणारी ई-मेल्स, प्रमोशनल व्हिडीओज, छायाचित्रे, चित्रपट आणि मल्टिमीडिया प्रोग्राम्स या विविध प्रकारांवर देखरेख ठेवावी लागते.
जनसंपर्क सल्लागारांचे काम केवळ आयोजन आणि व्यवस्थापनाचे नसून त्यासोबत अनेक जबाबदाऱ्या सांभाळण्याचे आणि कठोर मेहनतीचे आहे. पत्रकार परिषद, प्रदर्शने, विशेष समारंभ, प्रेस टुर यांचे आयोजन करणे, अद्ययावत माहितीचे आदानप्रदान करणे, जनसंपर्काच्या दृष्टीने तयार राहणे अशा वेगवेगळ्या स्वरूपांचे काम जनसंपर्क सल्लागारांना करावे लागते.
इतर उद्योग क्षेत्रांप्रमाणे जनसंपर्क क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींचा ठोस असा दिनक्रम नसतो. त्यांच्या दिवसाची सुरुवात आणि दिवसाची अखेर ही केवळ माहितीच्या देवाणघेवाणीने होत असते. एखाद्या सर्वसाधारण दिवसाची सुरुवात बातमीच्या अथवा माहितीच्या विश्लेषणाने होते. त्यानंतर कार्यालयीन तसेच बाहेरील कामाचे नियोजन आणि प्रत्यक्ष कामाची सुरुवात होते. त्यानंतर जे काम सोपवले गेले असेल त्यानुसार ग्राहकांना सेवा प्रदान करण्याच्या कामासाठी वेळ द्यावा लागतो. या क्षेत्रात कनिष्ठ ते मध्यम स्तरावर काम करणाऱ्या व्यक्तींचे एक ठरावीक रुटीन असते, ज्यात त्यांना दस्तावेज करणे, माहिती अहवाल बनवणे अशा पद्धतीचे काम करावे लागते.

arguments with the team
ताणाची उलगड : वादाला महत्त्व किती?
Sandhya Devanathan
व्यवसाय वाढीमध्ये ‘एआयʼची महत्त्वाची भूमिका, मेटाच्या व्यवस्थापकीय संचालक संध्या देवनाथन यांचे मत
loksatta editorial on manoj jarange patil controversial statement on devendra fadnavis
अग्रलेख : करेक्ट कार्यक्रम!
good touch bad touch
मुलेही ‘गुडटच-बॅडटच’चे शिकार! सामाजिक कार्यकर्त्या दिशा पिंकी शेख म्हणतात, घराचा वंश पुढे चालवू शकत नसल्याने…

करिअरविषयी..
या व्यवसायात सृजनशील स्वातंत्र्य मिळते. जनसंपर्क अधिकाऱ्यांना संघाचे नेतृत्व करावे लागते. हे काम करताना विविध क्षेत्रांत संपर्क प्रस्थापित होतात. मात्र, या पेशात कामाचे तास प्रदीर्घ असतात, काम तणावाचे असते तसेच बहुआयामी प्रकल्पाचा समन्वय साधण्याचे काम करावे लागते.
जनसंपर्क हे असे क्षेत्र आहे ज्यात वेगवेगळ्या व्यवसायांतील व्यक्ती प्रवेश करू शकतात. या क्षेत्रात करिअर करण्याकरता तुम्ही मास कम्युनिकेशनमधील तज्ज्ञ असणे अपेक्षित नाही. मात्र सॉफ्ट स्किल्स आत्मसात करणे आणि व्यक्तिमत्त्वाचा चौफेर विकास करणे या व्यवसायात येण्याकरता आवश्यक आहे.

आवश्यक कौशल्ये
जनसंपर्क सल्लागार म्हणून काम पाहण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमांची माहिती असावी लागते. त्यात वर्तमानपत्रे, ऑनलाइन व्यासपीठ तसेच वृत्तवाहिन्या या प्रसारमाध्यमांची जाण असणे आवश्यक आहे. हे काम प्रामुख्याने संवादाचे असल्याने जनसंपर्क व्यवस्थापकांकडे उत्तम संवादाचे आणि लिखाणकौशल्य असणे आवश्यक असते. लक्ष्य असलेल्या अचूक श्रोत्यांपर्यंत योग्य वेळी पोहोचण्याकरता अचूक धोरण आखण्याची क्षमता जनसंपर्क सल्लागारांमध्ये असावी लागते. या क्षेत्रातील वावरासाठी संपर्कातील व्यक्तींचे व्यवस्थापन करण्याची क्षमता तसेच संयमाने काम करण्याची वृत्ती असणे आवश्यक आहे.

 

– योगिता माणगांवकर