20 November 2019

News Flash

यूपीएससीची तयारी : मुख्य परीक्षेची तयारी

केंद्र लोकसेवा आयोगाने म्हटल्याप्रमाणे मुख्य परीक्षा ही संपूर्णत: लेखी स्वरूपाची परीक्षा आहे.

(संग्रहित छायाचित्र)

तुकाराम जाधव

विद्यार्थी मित्र-मत्रिणींनो, गेल्या महिन्यात ‘यूपीएससी २०१८’ परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर झाला. त्यात यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांकडून प्रेरणा घेऊन अनेक नव्या विद्यार्थ्यांनी या परीक्षेची तयारी करण्याचा निर्णय घेतला असणार, यात शंका नाही. म्हणूनच या विद्यार्थ्यांना समोर ठेवून आजपासून यूपीएससी मुख्य परीक्षेची सविस्तर चर्चा करणार आहोत.

यूपीएससी परीक्षेतील पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत या तिन्ही टप्प्यांसाठी अभ्यासक्रमातील विषयांचे पद्धतशीरपणे केलेले ‘आकलन’ ही मूलभूत बाब ठरते यात शंका नाही. तथापि, या परीक्षेच्या प्रत्येक टप्प्यात आकलनक्षमतेबरोबरच दुसरी एखादी विशिष्ट क्षमता व कौशल्य अत्यावश्यक ठरते. त्या दृष्टीने विचार करता यूपीएससी मुख्य परीक्षेत लेखनक्षमतेचा विकास केवळ आवश्यकच नाही तर निर्णायकही ठरतो.

केंद्र लोकसेवा आयोगाने म्हटल्याप्रमाणे मुख्य परीक्षा ही संपूर्णत: लेखी स्वरूपाची परीक्षा आहे. विद्यार्थ्यांचे पात्र होणे अथवा अपात्र ठरणे हे मुख्य परीक्षेतील गुण आणि मुलाखतीत प्राप्त केलेले गुण यावरच ठरते. मुख्य परीक्षेसाठी १७५० तर मुलाखतीसाठी २७५ गुण निर्धारित केले आहेत. स्वाभाविकच, मुख्य परीक्षा हा अनन्यसाधारण व निर्णायक टप्पा आहे, यात दुमत असण्याचे कारण नाही. त्यामुळे या टप्प्यासाठी आवश्यक लेखनक्षमतेचा विकास करणे अत्यंत जरुरीचे ठरते. मुख्य परीक्षेचे स्वरूप नेमकेपणाने लक्षात येण्यासाठी तिच्या महत्त्वपूर्ण आयामांचा व वैशिष्टय़ांचा परामर्श घेणे उपयुक्त ठरेल.

मुख्य परीक्षेतील प्रत्येक प्रश्नासाठी गुणमर्यादा नमूद केलेली असते. संबंधित प्रश्न किती गुणांसाठी आहे, यानुसारच उत्तर लिहिणे श्रेयस्कर ठरते. एखाद्या घटकाविषयी आपल्याकडे असणारी अतिरिक्त माहिती उत्तरात लिहिणे कटाक्षाने टाळावे. प्रत्येक प्रश्नाचे उत्तर किती शब्द मर्यादेत लिहायचे आहे, हे देखील प्रश्नपत्रिकेत नमूद केलेले असते. या शब्दमर्यादेचे भान ठेवूनच उत्तराचा आकार ठरवावा लागतो.

मुख्य परीक्षेत विचारले जाणारे प्रश्न विविध स्वरूपाचे असतात. स्पष्ट करा, वर्णन करा, उलगडून दाखवा, भाष्य करा, टिप्पणी करा, परीक्षण करा, मूल्यमापन करा, मीमांसा करा, चिकित्सक चर्चा करा, तुम्हास मान्य आहे का, भवितव्य सांगा, उपाययोजनांचा आढावा घ्या. अशा कमालीच्या विविध तऱ्हांनी प्रश्न विचारले जातात. त्यामुळे उत्तर लिहिताना संबंधित प्रश्न काळजीपूर्वक वाचून, त्याची मागणी लक्षात घेऊन त्याच्याशी सुसंगत प्रतिपादन तयार करावे लागते. त्यासाठी प्रश्नातील मध्यवर्ती शब्द काय आहे, त्याचा रोख काय आहे हे समजून घेणे महत्त्वाचे ठरते. अर्थात, यामध्ये प्रश्न योग्य रीतीने समजून घेण्याची आकलन शक्ती जशी महत्त्वाची ठरते, तसेच त्यानुसार लेखन करण्याची क्षमतादेखील अत्यावश्यक ठरते.

निबंधाच्या स्वतंत्र पेपरमध्ये दोन विषयांवर निबंध लिहायचे असतात. या पेपरसाठी आवश्यक लेखनशैली प्राय: वर्णन – स्पष्टीकरण – विश्लेषणात्मक असते. तांत्रिकतेला यात फारसा वाव नसतो. त्यामुळे निबंधाची रचना प्रस्तावनेपासून मुख्य गाभा ते समारोपापर्यंत परिच्छेदाच्या स्वरूपात करून आपल्या प्रतिपादनात सुसूत्रता, सुसंगती, सलगता या बाबींची हमी द्यावी लागते.

मुख्य परीक्षेतील वैकल्पिक विषयावरील प्रश्नांची उत्तरेदेखील प्राय: निबंधवजा लिहिणे अभिप्रेत असते. म्हणजेच प्रत्येक उत्तर मुद्दय़ांच्या स्वरूपात, तांत्रिकपणे लिहिणे अपेक्षित नसते. त्यातील बऱ्याच प्रश्नांची उत्तरे निबंधाप्रमाणे परिच्छेदाच्या स्वरूपात सुरुवातीपासून समारोपापर्यंत सलगता व सुसंगती राखत विकसित करावी लागतात. अर्थात काही वैकल्पिक विषयांमध्ये मुद्दय़ांच्या स्वरूपातील उत्तराची अपेक्षा असते, मात्र वैकल्पिक विषयातील सर्वच प्रश्नांची उत्तरे सामान्य अध्ययनाप्रमाणे मुद्दय़ांच्या स्वरूपात लिहिणे गरजेचे नसते.

सामान्य अध्ययनाच्या चार पेपर्सपकी पहिले तीन पेपर निराळ्या स्वरूपाचे (ज्यात विषय, त्याचा अभ्यासक्रम, त्यावर आधारित प्रश्न अशी एक चौकट असते) असतात आणि ‘नतिकता, सचोटी आणि दृष्टिकोन’ हा चौथा पेपर बऱ्याच अंशी भिन्न असतो. पहिल्या तीन पेपरमध्ये अनुक्रमे २५, २० आणि २० तर चौथ्या पेपरमध्ये १४ प्रश्न विचारले जातात. चौथ्या पेपरमध्ये प्रश्नांची संख्या कमी असते. कारण या पेपरचा अभ्यासक्रम आणि त्यावर विचारले जाणारे प्रश्न विद्यार्थ्यांच्या विचारक्षमतेचा पुरेपूर कस पाहणारे असतात. विद्यार्थी अभ्यासक्रमातील संकल्पना आणि विचार यांचे उपयोजन करू शकतो का? आजच्या स्थितीत त्यांचे महत्त्व प्रस्थापित करू शकतो का? परिस्थितीजन्य प्रश्नांची उत्तरे देऊ शकतो का? विविध प्रसंग आणि प्रकरणात कसा निर्णय घेतो? अशा विविध प्रकारे विद्यार्थ्यांची विचारशक्ती तपासली जाते. म्हणूनच सामान्य अध्ययनाचा चौथा पेपर हा विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व आजपर्यंत कसे घडले आहे, याचे मूल्यमापन करू पाहतो. त्यामुळे या पेपरमधील उत्तरे निराळ्या पद्धतीने लिहावी लागतात.

एकंदर मुख्य परीक्षेचा विचार करता प्रश्नासाठी निर्धारित गुण, शब्दमर्यादा आणि प्रश्नाचे स्वरूप या बाबी लक्षात घेऊन तीन तासांत संपूर्ण पेपर सोडवणे महत्त्वाचे ठरते. त्यासाठी लेखनाचे कसब विकसित करावे लागते.

येत्या २ जूनला यूपीएससीची पूर्वपरीक्षा होत आहे. ज्याबद्दल भरपूर तयारी आणि अभ्यास आपण या सदरातून केला आहेच. तेव्हा या शेवटच्या आठवडय़ात भरपूर तयारी करा आणि परीक्षेला आत्मविश्वासाने सामोरे जा! शुभेच्छा

First Published on May 23, 2019 12:01 am

Web Title: article on preparation of the main test
Just Now!
X