डॉ. उमेश करंबेळकर

उखाणा हा शब्द महिला वर्गाच्या चांगलाच परिचयाचा असतो. लग्नात जेवणाच्या पंक्तीत नवरा-नवरीला किंवा इतरही समारंभात जोडीदाराला घास भरवण्याचा आग्रह होतो. मग घास भरवण्यापूर्वी उखाण्याचाही आग्रह होतो. सगळ्याच लग्नात नाही पण बहुतांश ठिकाणी उखाणा घेण्याची ही पद्धत दिसतेच. खेडय़ापाडय़ांत तर उखाण्याच्या अगदी स्पर्धाच लावतात बायाबापडय़ा. अनेकानेक गोष्टी या उखाण्यात गुंफून त्याचे एक वेगळे काव्यच तयार होते. अशा वेळी उखाण्यात नाव घेणे हा कौतुकाचा विषय ठरतो.

खरे म्हणजे उखाणा या शब्दाचा अर्थ आहे कोडे किंवा कूट प्रश्न. म्हणी, वाक्प्रचार यांच्याप्रमाणेच उखाण्यांनाही फार प्राचीन मौखिक परंपरा आहे. कूट, प्रवेल्हिकी, प्रहेलिका हे उखाण्याचे प्रतिशब्द आहेत. ग्रामीण भागात उखाण्यांना आहणा असे म्हणतात.

उखाण्यांबाबत दुर्गा भागवत म्हणतात की, ‘अत्यंत प्राचीन अशा वेद वाङ्मयात आढळणाऱ्या ‘आह’ या धातूपासून उखाणा शब्दाची निर्मिती झाली आहे. आज मराठीत ‘आह’ हा धातू वापरात नसला तरी आहणा या शब्दात तो बोलीभाषेत वापरला जातो. खानदेशातल्या अहिराणी भाषेत उखाण्याला आहणा असेच म्हणतात.

अहिराणी ही एका विशिष्ट जाती-जमातीची बोलीभाषा नसून खानदेशात वास्तव्य करणाऱ्या सर्व सामान्य लोकांची (सर्व जाती-जमातींची) लोकभाषा आहे. अहिराणी भाषेवर अनेक जाती-जमातींच्या पोटभाषांचा प्रभाव पडत राहिला. म्हणून ही भाषा आज सर्वसमावेशक झाली आहे. पश्चिम खानदेशातील म्हणजेच धुळे, नंदुरबार जिल्ह्य़ांतील आदिवासींच्या पावरी भाषेचाही त्यात समावेश आहे. (संदर्भ – भारतीय भाषांचे लोक सर्वेक्षण, महाराष्ट्र अरुण जाखडे, गणेश देवी)

उखाण्यांमधून त्या त्या प्रदेशातील पशू, पक्षी, फुले, फळे, वनस्पती यांबरोबरच भौगोलिक वैशिष्टय़ांचेही प्रतिबिंब उमटलेले दिसते. उखाणे हे त्या समाज मानसाची उच्च आकलनक्षमता आणि त्या लोकांची कल्पनाशक्ती व अनुभव व्यक्त करतात.

वानगीदाखल खानदेशातील अक्कलकुवा तालुक्यातील पावरा आदिवासींच्या पावरी बोलीभाषेतील काही उखाणे बघा.

उपर आडे भाय मह (बाहेरून टणक आत मऊ) याचे उत्तर आहे नवल्य म्हणजे नारळ.

जगम दरवाजू नी मदे (ज्याला कुठेच दार नाही) याचे उत्तर आहे इंड म्हणजे अंड.

‘ची आवी ची गोयी’ ? म्हणजे ‘ही आली ही गेली’ असा हा आहणा किंवा उखाणा आहे. या कोडय़ाचं उत्तर आहे ‘नजर’.

तसेच दुसरे एक कोडे आहे  ‘एक पग हौ हाथ’ म्हणजे ‘एकच पाय आणि शंभर हात’. या कोडय़ाचे उत्तर आहे ‘सावरीचे झाड’. सावरीच्या सरळसोट खोडाला सर्व बाजूंनी फांद्या फुटलेल्या असतात. त्यामुळे खोड म्हणजे एक पाय आणि त्याच्या अनेक फांद्या म्हणजे शंभर हात. सावरीचे झाड पाहिले की आदिवासींच्या या निरीक्षणास नक्कीच दाद द्यावीशी वाटते. पण सगळ्यात गमतीदार वाटेल असेही एक कोडे आहे. ते म्हणजे – काय दादा मुवडा गांडा मी निमदे गांडू (काय करू दादा मोहाची फुलं वेड लावतात, मी नाही वेडा) याचं उत्तर आहे हुरू म्हणजे दारू. मोहाची दारू ही आदिवासींच्या जीवनातील एक अविभाज्य घटकच समजला जातो.

मोहाची फुले खरेच मोहात पाडतात आणि ती दारू पिऊन माणूस सारासार विवेक विसरतो हेही तितकेच खरे. पण वेडय़ाला पावरी भाषेत गांडू म्हणतात हे त्या कोडय़ातून आपल्याला समजते आणि त्यावरूनच पावरी भाषा किती ताकदीची आहे तेही पुरेपूर कळते. अशा तऱ्हेने बुद्धीला चालना देण्याचं काम उखाणे करतात आणि जरा विचार केला की, ही अशी उखाणारूपी कोडी सुटतात.