14 October 2019

News Flash

शब्दबोध : ‘ख’

आपले शरीरही पंचमहाभूतांनी बनलेले असते असे आयुर्वेदात सांगितले आहे.

(संग्रहित छायाचित्र)

डॉ. उमेश करंबेळकर

‘ख’ हे वर्णमालेतील एक अक्षर असले तरी ‘ख’ हा एकाक्षरी शब्दही आहे. ख म्हणजे आकाश हा अर्थ अनेकांना माहीत असतो. आपले विश्व पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचमहाभूतांनी निर्माण झाले आहे. त्यातील आकाश महाभूत म्हणजेच ख. यावरून आकाशातील ग्रहांना खगोल आणि त्यांच्या अभ्यासाला खगोलशास्त्र म्हटले जाते.  ख म्हणजे आकाशात ग म्हणजे गमन करणारा तो खग (पक्षी). ज्याच्यातील ख म्हणजे आकाश शं म्हणजे शुभ असते तो शंख. आकाशात दिव्यासारखा चमकणारा खद्योत म्हणजे काजवा. खगंगा म्हणजे आकाशगंगा, खवल्ली म्हणजे आकाशवेल. खनगर (गंधर्वनगर), खस्थानं (घरटे, ढोली), खद्रु:(चारोळी) तर खहर: म्हणजे शून्याने भागलेली संख्या (अनंत) असे अनेक शब्द खपासून तयार झाले आहेत.

याशिवाय ख शब्दाचे सूर्य, स्वर्ग, इंद्रिय, हदयाकाश, छिद्र, पोकळी, शून्य टिंब, जखम, कर्म, ब्रह्म, ज्ञान, शेत, अभ्रक आणि शहर असे अर्थ गीर्वाणलघुकोशात दिले आहेत.

आपले शरीरही पंचमहाभूतांनी बनलेले असते असे आयुर्वेदात सांगितले आहे. शरीरातील सूक्ष्म पोकळ्या म्हणजेच स्रोतसं ही आकाश महाभुताने व्यापलेली असतात. आपल्या शरीराची दोन कान, दोन डोळे, दोन नाकपुडय़ा, तोंड, गुदद्वार आणि मूत्रद्वार ही नऊ द्वारे आहेत. ही द्वारेही आकाश महाभूताने व्यापलेली असतात. त्यातील सर्वात मोठे आणि मुख्य ख म्हणजे मुख किंवा तोंड तर शरीरात जेथे ख अजिबात नसते असा अवयव म्हणजे नख. शरीरातील या पोकळ्यांच्या अवस्थेवर शरीराची अवस्था अवलंबून असते. जेव्हा पोकळ्यांत दोष साठतात, त्यांच्यात अवरोध निर्माण होतो तेव्हा शरीर अस्वस्थ होते आणि व्याधी अवस्था निर्माण होते.

शरीरातील आकाश बिघडल्यामुळे रोग निर्माण होतात म्हणून रोगाला दु:ख असे म्हटले जाते. तर शरीरातील सर्व स्रोतसे म्हणजेच आकाश महाभूत सुस्थितीत असेल तर आपण निरोगी अवस्था अनुभवतो. यालाच सुख असे म्हटले आहे. समर्थानी ‘जगी सर्व सुखी असा कोण आहे?’ असा प्रश्न आपल्या मनाला विचारून त्याचा शोध घेण्यास सांगितले आहे.  या प्रश्नाचे उत्तर अर्थातच कुणीही नाही असे आहे. त्याचे कारण निरोगी अवस्था म्हणजेच सुखावस्था सदा सर्वकाळ टिकवणे जवळ जवळ अशक्य असते. अनेक व्याधींची मूळे जन्मजात असतात. तसेच काल, आहार-विहार, वय अशा अनेक कारणांनी शरीरातील त्रिदोषांची साम्यावस्था सतत बिघडत असते

आणि त्यामुळे आपण व्याधि अवस्था म्हणजेच दुख अनुभवत असतो. हे सर्व समजून घेतल्यानंतर एक गोष्ट आपल्या ध्यानात येते की, सुख आणि दुख: या दोन्ही गोष्टी ‘ख’ महाभूतावर अवलंबून असतात हेच खरे!

First Published on May 16, 2019 12:17 am

Web Title: article on word sense 4