|| स्वाती केतकर- पंडित

रायगड जिल्ह्य़ातील पेण तालुक्यातली जि.प. शाळा आमटेम ही साऱ्या जिल्ह्य़ात प्रसिद्ध आहे. विज्ञान प्रदर्शनापासून ते बालबाजार, धम्माल मस्तीचे स्नेहसंमेलन या साऱ्या बाबतीत इथले विद्यार्थी पुढे आहेत. त्यामुळे इथले गावकरी अभिमानाने म्हणतात, आमटेमची पोरं हुशार! या हुशारीमागची एक प्रेरणा आहेत, त्यांच्या शिक्षिका चित्रलेखा जाधव.

चित्रलेखा जाधव या १९९७ पासून जिल्हा परिषद शाळेमध्ये सेवा करत आहेत. त्या दाखल झाल्या त्या रायगड जिल्ह्य़ातील शिहू या गावच्या शाळेत. हे पेणमधले आडवळणाचे गाव. फारसे कुणी तिथे जायला तयार नसे. चित्रलेखांची ही पहिलीच शाळा होती सातवीपर्यंतची केंद्रशाळा. या गावातील बहुतांश लोक खोल समुद्रात मासेमारी करायला जात. शिक्षणासंबंधी फारशी जागृती नाही.  पाचवी-सहावी झाल्यावर पोरांना थेट समुद्रात मासे पकडायला धाडत. एकदा शिक्षण बंद झाल्यावर पुन्हा ते सुरू होणे केवळ अशक्य असे. त्यामुळे उदरनिर्वाहासाठी मासेमारीचा एकच पर्याय राहत असे; परंतु चित्रलेखा यांनी आपल्या सहशिक्षकांच्या मदतीने हे चित्र बदलवले. या विद्यार्थ्यांसाठी खेळ, विज्ञान प्रदर्शन या गोष्टी घ्यायला सुरुवात केली. खेळामध्ये तर इथले विद्यार्थी इतके अव्वल ठरले की, आता शिहू गावाची ओळख कबड्डीसाठी आणि पोलीस भरतीसाठी होऊ लागली आहे; पण  गावात शाळेसाठी चांगली इमारत नव्हती. कधी समाजमंदिरात, कुणाच्या ओसरीवर, पडवीत, एखाद्या ‘मुंबयकरा’च्या बंद घरात असे  वेगवेगळ्या ठिकाणी शाळेचे वर्ग चालत. सर्वशिक्षा अभियान आले तेव्हा शाळेला पक्की इमारत मिळाली आणि प्रगती आणखी जोमाने सुरू झाली. चित्रलेखा म्हणतात, ‘‘गावच्या या मुलांना अभ्यासाची तितकीशी आवड नव्हती कारण अभ्यासाला पोषक वातावरण नव्हते. त्यामुळे खेळ, विज्ञानाचे प्रयोग अशा वर्गखोलीतून बाहेर पडून करता येण्यासारख्या गोष्टींतून आम्ही सुरुवात केली.’’ पण या अभ्यासेतर गोष्टींतूनच शाळेची पर्यायाने अभ्यासासाठीची विद्यार्थ्यांची आवड वाढत गेली. शिष्यवृत्ती परीक्षा, नवोदय विद्यालयाच्या परीक्षा यांसारख्या परीक्षांतून हळूहळू विद्यार्थी अभ्यासातही उत्तम यश मिळवू लागले. या शाळेनंतर २०१२ मध्ये चित्रलेखा यांची बदली झाली आमटेमला.

आमटेम शाळा सातवीपर्यंतची चांगली मोठी शाळा होती. पटही चांगला होता; परंतु इंग्रजी माध्यमाच्या आकर्षणामुळे चौथीनंतर विद्यार्थी कमी होऊ लागले होते. त्यावर उपाय म्हणून चित्रलेखांनी आपल्या सहशिक्षकांच्या मदतीने शाळा सेमी इंग्रजी करण्याचा प्रस्ताव मांडला; पण हे होण्यामध्ये अनंत अडचणी होत्या. महत्त्वाचे म्हणजे वेगळे शिक्षक मिळणार नव्हते. मग आहे त्याच शिक्षकांनी हे आव्हान स्वीकारायचे ठरवले आणि रायगड जिल्ह्य़ातील सेमी इंग्रजी माध्यमाची ही पहिली जि.प. शाळा ठरली. इंग्रजीतून शिक्षण अवघड जाऊ नये, यासाठी चित्रलेखा यांनी प्रचंड मेहनत घेतली. शाळा संपल्यावरही एप्रिल-मे महिन्यांत चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी सुट्टीतले वर्ग भरत. या वर्गामध्ये शिष्यवृत्ती परीक्षा पाचवीचे सेमी इंग्रजीचे विषय याची कसून तयारी केली जाई. मग शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यावर विद्यार्थ्यांना सेमी इंग्रजीचा ताण वाटत नसे. या कष्टाचे चीज म्हणून आमटेम शाळेतून चौथीनंतर होणारी विद्यार्थीगळती खूप कमी झाली. शिवाय शिष्यवृत्ती परीक्षेतही विद्यार्थी उत्तम यश मिळवू लागले. सुट्टीतल्या या वर्गामध्ये हळूहळू पहिलीचे विद्यार्थीही बसू लागले. त्यांच्या वयानुसार त्यांना केवळ तास-दीड तासच बसवले जात असे; पण त्याचा चांगला परिणाम शैक्षणिक वर्षांत दिसू लागला. याचबरोबर चित्रलेखा यांनी रोजच्या वर्गातही विज्ञान प्रदर्शन, इंग्रजीचे उपक्रम घ्यायला सुरुवात केली. शाळेमध्ये परिपाठाला विज्ञानाचे प्रयोग नियमित दाखवले जातात. इतकेच नव्हे तर परिपाठ झाल्यानंतरही दिवसभर तो प्रयोग तिथेच ठेवला जातो. आपापल्या वेळेनुसार दिवसभरात वेगवेगळ्या वर्गातले विद्यार्थी येऊन तो प्रयोग करून पाहतात आणि खऱ्या अर्थाने समजून घेतात.

शाळेमध्ये अगदी नेहमीचे उपक्रमही विज्ञानाची जोड देऊन साजरे केले जातात. उदा. वारकऱ्यांच्या दिंडीत वृक्षदिंडी काढली जाते. पर्यावरणपूरक दिवाळी, गणेशोत्सव साजरे होतात. या भागात साप दिसणे नवे नाही. त्यामुळे सर्पमित्रांना बोलावून सापांची माहिती दिली जाते. इथल्या शालेय सहलीचीही एक गंमत आहे. एकदा विज्ञान प्रदर्शनादरम्यान चित्रलेखा आणि शिक्षकांनी ठरवले की, पहिल्या पाच यशस्वी विद्यार्थ्यांना नेहरू सायन्स सेंटरला नेले जाईल; पण मुलांनी ते इतके मनावर घेतले की प्रत्येकानेच उत्तम प्रयोग करून दाखवले. त्यामुळे मग साऱ्यांनाच नेहरू सायन्स सेंटरला न्यायचे ठरले आणि तेव्हापासून सहली अशा ठिकाणी जाऊ लागल्या जिथे विद्यार्थ्यांना काही शिकायला मिळेल. या सहलीवर विद्यार्थ्यांनी मासिकही काढले. विद्यार्थ्यांना इंग्रजी, गणित या विषयांसोबत व्यवहारज्ञानही मिळण्यासाठी बालबाजार भरवला जाऊ लागला. कागदी, कापडी पिशव्या, आकाशकंदील, हार, पणत्या, शोभेच्या वस्तू अशा अनेक गोष्टी विद्यार्थी स्वत: तयार करू लागले. नोटा आणि नाण्यांच्या माध्यमातून चलन तर समजलेच, पण गणिती क्रियाही पक्क्य़ा झाल्या.  पुस्तकातले विषय रोजच्या जगण्याशी जोडल्याने विद्यार्थ्यांना आता अभ्यासाचा बाऊ वाटत नाही. त्यांचे प्रतििबब विविध स्पर्धा, परीक्षांतील यशामध्ये दिसतेच. आमटेमच्या पोरांच्या हुश्शारीची ही सगळी प्रगती वरच्या दोन-तीन परिच्छेदांत वाचणे सोपे असले तरी ते सारे जमवून आणण्यासाठी चित्रलेखा जाधव यांच्यासारख्या अनेक मेहनती शिक्षकांचे कष्ट आहेत, हे विसरता कामा नये.

swati.pandit@expressindia.com